Shahaji Bapu Patil : अशोक खरातवर आधारित महाराष्ट्राची एल्फिन्स्टन फाईल या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सांगोल्यातील एका कथित पूजेचा प्रसंग समाविष्ट करण्यात आला आहे का? असा थेट सवाल माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना केला.
सांगोला येथे शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंत्री भरत गोगावले, मंत्री योगेश कदम आणि दिपाली सय्यद यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शहाजी बापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत अशोक खरात वर टीका करत सांगोल्यात घडलेल्या कथित पूजेचा किस्सा सांगितला.
शहाजी बापू पाटील यांच्या म्हणण्यानुसार, अशोक खरातने सांगोला तालुक्यात येऊन कथितरित्या उघड्या-नागड्या पद्धतीने धिंगाणा घालत पूजा केली होती. ही पूजा माझा भाचा अतुल पवार यांचा निवडणुकीत पराभव व्हावा आणि त्यांना जीवे मारण्याचा अनिष्ट प्रकार घडावा, या उद्देशाने करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी शहाजी बापूंनी अतुल पवार यांना आपण दिलेला धीर सांगत, “तुझा मामा या महाराजाच्या बापाचा बाप आहे. तू मरत नाहीस, काळजी करू नको,” अशा आपल्या खास शैलीतील वक्तव्याचा उल्लेख केला.
दरम्यान, अशोक खरात यांच्यावर आधारित चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सांगोल्यातील या कथित पूजेचा प्रसंग दाखवण्यात आला आहे का, असा सवाल शहाजी बापूंनी दिपाली सय्यद यांना केला. या मुद्द्यावरून त्यांनी माजी आमदार दीपक साळुंखे यांनाही आपल्या खास शैलीत टोला लगावला. या संपूर्ण प्रकारावर शहाजी बापू पाटील यांनी केलेली फटकेबाजी मेळाव्यात चर्चेचा विषय ठरली.






