DNA मराठी

Pune Crime : प्रवचनाच्या नावाखाली धर्मांतराचा प्रयत्न ; पुण्यात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायद्यात गुन्हा दाखल

crime

Pune Crime : प्रवचनाच्या माध्यमातून धर्मांतराचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या तक्रारीनंतर पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात एका ब्रिटिश नागरिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम लागू झाल्यानंतर या कायद्याअंतर्गत पुण्यात दाखल झालेला हा पहिला गुन्हा असल्याचा दावा करण्यात येत आहे.

पुण्यातील गुरुवार पेठ परिसरातील एका चर्चमध्ये ब्रिटनहून आलेल्या एका धर्मगुरूकडून प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रम घेतले जात होते. संबंधित व्यक्ती मागील काही दिवसांपासून पुण्यात वास्तव्यास असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रवचनाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला.

या प्रकरणी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी खडक पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ब्रिटिश नागरिकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या व्यक्तीकडून चर्चमध्ये प्रवचनासोबत भजन आणि इतर धार्मिक कार्यक्रमही घेतले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, महाराष्ट्रात नव्याने मंजूर झालेल्या धर्म स्वातंत्र्य कायद्याचा उद्देश बळजबरी, फसवणूक किंवा प्रलोभनाच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालणे हा आहे. विधेयकाच्या चर्चेदरम्यानही अशा प्रकारच्या धर्मांतराला प्रतिबंध करण्यासाठी कायदेशीर तरतुदी करण्याची भूमिका सरकारकडून मांडण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, संबंधित ब्रिटिश नागरिकाने प्रत्यक्षात धर्मांतराचा प्रयत्न केला होता की नाही, तसेच प्रवचनामध्ये काय मजकूर किंवा संदेश देण्यात आला होता, याबाबत पोलिस तपासातून अधिक स्पष्टता होणार आहे.

खडक पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपांची सत्यता तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *