Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईकडे जाण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. मुंबईतच आंदोलन करण्याबाबत समाजामध्ये चर्चा सुरू असून, आगामी काळात मुंबईकडे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईतच आंदोलन करण्याचा विचार
यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजामध्ये पुन्हा मुंबईला जाण्याची चर्चा सुरू आहे. मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो. तसेच समाजातील अनेकजण मुंबईतच आंदोलन करण्याच्या भूमिकेवर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आंदोलनासाठी आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा मोठ्या प्रमाणावर उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राबाहेरूनही आंदोलक येणार?
जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्राबाहेरील भागांतूनही मराठा समाजाचे लोक मुंबईकडे येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरत, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बडोदा तसेच गोव्याच्या समुद्रमार्गातूनही काही लोक मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंदोलनाचा विस्तार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता व्यापक स्वरूप घेऊ शकतो, असा संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळतो.
नेमकी मागणी काय?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही वर्षांपासून आंदोलन करत आहेत. विशेषतः मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र आणि त्यातून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, हा त्यांच्या आंदोलनातील प्रमुख मुद्दा राहिला आहे.
कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरूनही जरांगे यांनी अलीकडे सरकारला इशारा दिला आहे. कुणबी नोंदी रद्द होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा मुंबईकडे जाण्याचे संकेत दिल्याने सरकारसमोर मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.






