Vaishali Nagwade : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या पदमुक्तीनंतर हे पद रिक्त होते. आज मुंबई येथे पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नागवडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
वैशाली नागवडे या मूळच्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असून, अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणून त्यांची पुणे जिल्ह्यात ओळख आहे.
यापूर्वी अजित पवार यांनी त्यांच्यावर महानंदा दूध संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती. पुणे ग्रामीण भागात महिला कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
दरम्यान, पक्षातील विविध घडामोडींमध्ये रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेविरोधात अनेकदा भूमिका घेतल्यामुळे वैशाली नागवडे या चर्चेतही राहिल्या होत्या. त्यांच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीत नव्या राजकीय समीकरणांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






