Uddhav Thackeray : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून नीट पेपर फुटीवरून चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या प्रकरणावरून दिल्लीत आंदोलन देखील होत असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामान्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मोठी घोषणा केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी संयुक्तपणे 26 जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबवावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ही लढाई कोणत्याही पक्षाची नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याची असल्याचे स्पष्ट केले. लाखो विद्यार्थी वर्षभर कठोर परिश्रम करून परीक्षेला सामोरे जातात. मात्र पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. त्यामुळे अशा घटनांबाबत सरकारने कठोर भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.
मोर्चा मुंबईतील शिवाजी पार्क येथून सुरू होणार असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संस्था सहभागी होण्याची शक्यता आहे. या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारवर दबाव निर्माण करून नीट पेपरफुटी प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात आंदोलनाची लाट उसळली असून विविध राज्यांमध्ये विद्यार्थी आणि राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रस्तावित मेगा मोर्च्याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून होणारे हे आंदोलन आगामी काळातील शिक्षण व्यवस्थेवरील चर्चेला नवी दिशा देऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






