Petrol Price : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली असून आज पेट्रोल २ रुपये ६१ पैसे तर डिझेल २ रुपये १७ पैशांनी महागले आहे. यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल ११३.१७ रुपये तर डिझेल ९९.८३ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. मशागतीच्या कामांना वेग आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज भासत असताना अनेक पेट्रोल पंपांवर तासन्तास रांगा लागत आहेत.
वाढत्या दरवाढीमुळे शेतकरी व सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे. दरम्यान, राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका सुरू असताना सतत होणाऱ्या इंधन दरवाढीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते मनीष जाधव यांनी थेट सरकारवर हल्लाबोल केला आहे. “विधान परिषद निवडणुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या खिशातून काढायचा आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तर दुसरीकडे केंद्र सरकारने १५ मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३ रुपये प्रति लिटर वाढ केली होती. तर १९ मे रोजी ८७ पैसे पेट्रोलच्या दरात तर ९१ पैसे डिझेलच्या दरात वाढ केली होती. तर २३ मे रोजी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती.






