DNA मराठी

Maharashtra BJP: भाजपची मोर्चेबांधणी; 2029 विधानसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय

Maharashtra BJP :  आगामी काळातील राजकीय आव्हाने आणि पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण यांनी राज्याच्या सहा महत्त्वाच्या विभागांसाठी नवीन समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाचे ध्येयधोरण तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि विभागवार कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ही या नियुक्त्यांमागची मुख्य भूमिका आहे.

या नव्या निवडीनुसार, मुंबई विभागाच्या समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते मुंबई भाजप समन्वयक म्हणून काम पाहतीलच, शिवाय त्यांच्याकडे प्रदेश कार्यालयाच्या समन्वयाचीही अतिरिक्त जबाबदारी असेल.

ठाणे-कोकण विभागासाठी आमदार योगेश सागर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार प्रमोद जठार संयोजक म्हणून, तर संजय वाघुले सहसंयोजक म्हणून कार्यभार सांभाळतील.पश्चिम महाराष्ट्रात आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे समन्वयाची धुरा देण्यात आली आहे. त्यांना विक्रम पावसकर (संयोजक) आणि विक्रम देशमुख (सहसंयोजक) यांची साथ लाभणार आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या जबाबदारीत प्रदेश सरचिटणीस आमदार माधवी नाईक समन्वयक असतील. त्यांच्या सोबतीला विजय चौधरी संयोजक म्हणून आणि आमदार मंगेश चव्हाण सहसंयोजक म्हणून काम पाहतील.

मराठवाडा विभागासाठी प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांची समन्वयक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या पथकात अ‍ॅड. नितीन काळे संयोजक, तर राहुल लोणीकर सहसंयोजक म्हणून कार्यरत राहतील.

विदर्भासाठी आमदार संजय कुटे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, प्रा. दिनेश सूर्यवंशी संयोजक आणि आमदार प्रवीण दटके सहसंयोजक म्हणून जबाबदारी पार पाडतील.

या सर्व नियुक्त्या 5 मे 2026 पासून तात्काळ लागू करण्यात आल्या आहेत. या फेरबदलांमुळे आगामी काळात भाजपची संघटनात्मक ताकद वाढण्यास आणि कार्यकर्त्यांचे जाळे अधिक घट्ट होण्यास मदत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *