Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्याचा शब्द सरकारने दिला असून, तो पाळलाच पाहिजे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
जालना येथे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडली.“सरकारने दिलेला शब्द पाळावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, “आतापर्यंत आंदोलन करून ८५० पेक्षा जास्त गुन्हे मागे घ्यायला लावले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत, “ते शब्दापासून बदलले तरी मी बदलणार नाही,” असे जरांगे म्हणाले.
राहिलेल्या गुन्ह्यांबाबत विभागीय समितीचा अहवाल सरकारकडे जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “आरक्षण मिळवणारच आणि उर्वरित गुन्हेही मागे घ्यायला लावणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.मराठा आरक्षण उपसमितीवरही त्यांनी टीका करत, समाजाला अवमानकारक वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. उपसमिती बरखास्त करण्याची मागणी करत, “मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय देणे ही समितीची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.याशिवाय, कुणबी आणि मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली.






