Radhakrishnan Vikhe Patil : अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे राहाता तालुक्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने व अचूक पंचनामे करून अहवाल सादर करावेत, तसेच बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मौजे पाथरे (बु.) येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
पाथरे (बु.) येथील शेतकरी संजय भाऊसाहेब घोलप यांच्या शेताला भेट देऊन पालकमंत्र्यांनी नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. वादळामुळे विजेची तार अंगावर पडून आणि विद्युत धक्का बसल्याने ९ गायी दगावल्याच्या घटनेचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांना धीर दिला व प्रशासनाने संवेदनशीलतेने कार्य करावे, असे निर्देश दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, नायब तहसीलदार हेमंत पाटील, मंडळ कृषी अधिकारी रमेश चौपडे, सहायक कृषी अधिकारी श्रीमती मीना जाधव तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दौऱ्यात तालुक्यातील विविध भागांतील नुकसानीची प्राथमिक माहिती सादर करण्यात आली. बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून आवश्यक ती मदत तातडीने मिळवून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या.






