Dhule Crime : धुळे जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधांच्या रागातून एका पतीने आपल्या नात्यातील तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने पत्नी आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने मृतदेह सायकलवरून नेऊन विहिरीत फेकला. सुमारे नऊ दिवस पाण्यात राहिल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, त्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र हातावरील टॅटूमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला.
अवधान एमआयडीसी परिसरातील विहिरीत सापडलेल्या मृतदेहाच्या छातीवर “RAVI” आणि हातावर “Radha” असे टॅटू आढळले. यावरून मृत व्यक्ती दिवाणमळा येथील रवी मालचे असल्याचे निष्पन्न झाले.
तपासात उघड झाले की, रवीचे आरोपी बापू मालचे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याच रागातून १८ मार्चच्या रात्री बापू मालचे यांनी पत्नीच्या मदतीने रवीची हत्या केली आणि कुटुंबाच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकाने वेगाने तपास करत अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा उलगडा केला. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपास सुरू आहे.






