IND vs WI: आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. या शानदार विजयासह भारतीय संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे.
कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर मोठी धावसंख्या उभारली होती.मात्र भारताकडून संजू सॅमसनने संयम आणि आक्रमकतेचे उत्तम मिश्रण दाखवले. या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला, जिथे आता इंग्लंड आव्हान देईल.
नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र रोस्टन चेस आणि शाई होप यांच्या भागीदारीने वेस्ट इंडिजने दमदार सुरुवात केली. दोघांनी 68 धावा जोडल्या. होप 32 धावांवर बाद झाला. बुमराहने एकाच षटकात दोन विकेट घेतले. पॉवेल आणि होल्डरने आक्रमक फलंदाजी केली. अर्शदीपने एका षटकात 24 धावा दिल्या. वेस्ट इंडिजने 20 षटकात 4 बाद 195 धावा केल्या.
तर दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पॉवरप्लेमध्ये 53 धावा केल्या पण दोन विकेट गमावले. अभिषेक शर्मा 10 आणि इशान किशन 10 धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. तिलक वर्माने 27 धावांची उपयुक्त खेळी केली. यानंतर संजू सॅमसनने जबाबदारी सांभाळली. त्याने नाबाद 97 धावा केल्या. तर हार्दिक पंड्याने 17 धावा केल्या. सॅमसनमुळे भारताने 19.2 षटकात 5 बाद 199 धावा करून विजय मिळवला. हा विश्वचषकातील भारताचा सर्वात मोठा पाठलाग होता.
उपांत्य फेरीची तयारी
या विजयासह भारताने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. आता त्यांचा सामना 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडशी होईल.






