DNA मराठी

Sunil Tatkare: दिवंगत अजित पवारांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी ऑडिओ, व्हिडिओ क्लिप; कडक कारवाई करणार; सुनिल तटकरेंचा इशारा

sunil tatkare

Sunil Tatkare: काही स्वार्थी व्यक्ती राजकीय आणि सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी दिवंगत अजित पवारांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी विधाने पसरवत आहेत. हे कृत्य अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा असून संबंधित व्यक्तींनी अशा एआय उत्पन्न बनावट व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्सचे वितरण त्वरित थांबवावे अन्यथा त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात दादांबद्दल आदर, प्रेम आणि विश्वासाची भावना आहे. त्या भावनेचा गैरफायदा घेऊन, लोकांमध्ये आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा हा घातक प्रयत्न आहे. मृत नेत्याची प्रतिमा अशा प्रकारे वापरणे हे अत्यंत नीच आणि निंदनीय कृत्य आहे. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी सायबर कायदे आणि इतर लागू कायद्यांनुसार खटले दाखल करण्यास पक्ष वचनबद्ध आहे असेही सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान अशा कोणत्याही संशयास्पद ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले आहे.

दिवंगत अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने खोटा प्रचार करणे हे सामाजिक हितासाठी हानिकारक आहे आणि लोकशाही मूल्यांवर आघात करणारे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा सर्व कृत्यांचा तीव्र निषेध करतो आणि जबाबदार असलेल्यांनी या कृती तात्काळ थांबवाव्यात अशी मागणीही सुनिल तटकरे यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *