Rajya Sabha Election : निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 जागांसाठी राज्यसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि बिहारमधील रिक्त राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी पाच जागांसाठी निवडणुका होणार आहेत. तामिळनाडूमधील सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. शरद पवार, रामदास आठवले, कनिमोझी, तिरुची शिवा आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे
26 फेब्रुवारी रोजी अधिसूचना
राज्यसभेच्या 37 जागांसाठी अधिसूचना 26 फेब्रुवारी रोजी जारी केली जाईल. उमेदवार 5 मार्चपर्यंत नामांकन दाखल करू शकतील. 6 मार्च रोजी छाननी सुरू होईल आणि 9 मार्चपर्यंत उमेदवार आपले नामांकन मागे घेऊ शकतील. त्यानंतर 16 मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2026 आहे.
शरद पवारांना पुन्हा संधी?
शरद पवार यांचा देखील राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाळ संपत असल्याने त्यांना पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस शरद पवार यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचे 46 आमदार असून एका जागेसाठी 41 आमदारांची आवश्यकता आहे.
राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे:
अधिसूचना: 26 फेब्रुवारी
नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख: 5 मार्च
नामांकनांची छाननी: 6 मार्च
मागे घेण्याची शेवटची तारीख: 9 मार्च
मतदान: 16 मार्च 2026, सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत.
मतमोजणी: 16 मार्च 2026
आसाममधील तीन, बिहारमधील पाच, महाराष्ट्रातील सात, ओडिशातील चार, तामिळनाडूतील सहा आणि पश्चिम बंगालमधील पाच जागांसाठी मतदान होईल.






