DNA मराठी

Ahilyanagar Crime :नगर शहर पुन्हा रक्तरंजित; डोक्यात वार करून एकाचा खून

Ahilyanagar Crime : नगर शहरात गुन्हेगारीने अक्षरात डोके वर काढले असल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. नगर तालुक्यातील निंबळक शिवारातील साईबन समोरील मोकळ्या पटांगणात एका 75 वर्षीय वृध्दाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

बापु नामदेव शिंदे (रा. मनोरमा कॉलनी, साईनाथनगर, अरूण हॉटेल मागे, नवनागापूर, अहिल्यानगर) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी मोहन बापु शिंदे यांनी रविवारी (15 फेब्रुवारी) पहाटे फिर्याद दिली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी संबंधित घटना शुक्रवारी (13 फेब्रुवारी) दुपारी दोन ते शनिवारी (14 फेब्रुवारी) रात्री 10:41 वाजताच्या दरम्यान घडली आहे. तसेच अधिक माहिती अशी, बापू नामदेव शिंदे यांचा शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते शनिवारी रात्री 10.41 वाजेच्या दरम्यान खून करण्यात आला आहे. ही घटना साईबन समोरील मोकळ्या पटांगणात, विळद बायपासजवळ, निंबळक गावच्या शिवारात घडली.

अज्ञात आरोपीने कोणत्यातरी कठीण साधनाने बापु शिंदे यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले असून त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तसेच स्थानिकांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *