DNA मराठी

Shani Shingnapur: शनिशिंगणापूर देवस्थान अँप प्रकरण, 77 लाखांचा अपहार अन् 2500 पानांचे दोषारोपपत्र

shani shingnapur

Shani Shingnapur:  शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन अँप संदर्भातील सुमारे ५०० कोटीचा अपहार झालयाचा आरोप करण्यात आला होता. हा मुद्दा थेट अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये ७७ लाखांचा अपहार झाल्याचे नमूद केले आहे.

अपहार प्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलिसांनी नेवासा न्यायालयात नऊ संशयित आरोपींविरूध्द सुमारे अडीच हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात सुमारे ७७ लाख रूपयांचा अपहार झाल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे.  

संजय तुळशीराम पवार (रा. सोनई), सचिन अशोक शेटे (रा. शनिशिंगणापूर) यांच्यासह नितीन सुर्यभान शेटे (मयत), उज्वल निरंज भट्टाचार्य (पश्चिम बंगाल), वरूण दत्तात्रय पाठक (रा. बनपिंप्री, ता. श्रीगोंदा), विभू जयप्रकाश अग्रवाल (रा. लखनऊ), शालिनी भारत जैयस्वाल (रा. मुंबई), सचिन रावसाहेब बनकर (रा. शनिशिंगणापूर), गोरक्ष केरूजी दरंदले (रा. शनिशिंगणापूर) यांच्याविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

श्री शनैश्वर प्रसन्न शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन अँपमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार विठ्ठलराव लंघे यांनी या अँप करारातील संशयास्पद व्यवहारांचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

यासंदर्भात कोणताही तक्रारदार पुढे न आल्याने स्वतः पोलीस फिर्यादी होत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सायबर पोलिसांनी देवस्थानचे विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी तसेच अॅप मालक यांचे जबाब नोंदविले. विविध बँक खात्यांची तपासणी करून अपहारासंदर्भातील कागदोपत्री पुरावे गोळा करण्यात आले.

मात्र, सखोल तपासानंतर पोलिसांनी दोषारोपपत्रात ७७ लाख रूपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट केले आहे. सायबर पोलिसांनी तपासाला गती देत देवस्थानचे कर्मचारी संजय पवार व सचिन शेटे यांना अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपासादरम्यान अँप मालकांनी करारानुसार देवस्थानच्या खात्यात जमा करावयाची रक्कम थेट काही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सायबर पोलिसांनी अँप मालकांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. त्यांना देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *