Rain Alert : जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे भंडारदरा व निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
काल सायंकाळी ६ वाजताच्या नोंदीनुसार, भंडारदरा धरणातून १३,३४४ क्युसेक, तर निळवंडे धरणातून १५,३५७ क्युसेक पाणी सोडले जात आहे. याव्यतिरिक्त, ओझर बंधाऱ्यावरूनही ६,३०१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणक्षेत्रात पाऊस असाच सुरू राहिल्यास विसर्गाचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी नदीपात्रापासून दूर राहावे, पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये, आणि पूरप्रवण भागांत गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
धोकादायक परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.