Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शेतक-यांसाठी सुरु करण्यात आलेल्या किसान सन्मान योजनेचा लाभ मतदार संघातील २ लाख ८२ हजार शेतक-यांना झाला असून, या योजनेचे सुमारे ५६ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान बॅक खात्यात वर्ग झाले. केंद्र सरकारने शेतक-यांना सक्षम बनविण्यासाठी सुरु केलेल्या योजना महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
दहा वर्षांच्या काळात कृषि क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून झाले आहे. कृषि क्षेत्रासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा लाभ शेतक-यांना होत आहे. किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय झाला. मागील पाच वर्षे ही योजना अखंडीत सुरु आहे. जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार ३७९ शेतक-यांना ५६ कोटी ४७ लाख ४ हजार रुपयांचे अनुदान मिळाले असल्याचे खा.विखे पाटील म्हणाले.
या बरोबरीनेच खंतांच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अनुदानाची उपलब्धता करुन दिली. शेती विषयक ज्ञान शेतक-यांना एकाच छत्राखाली मिळावे यासाठी किसान समृध्दी केंद्रांची स्थापना करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमध्येही केंद्र आणि राज्य सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले आहे.
अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या मतदार संघातलील ३ लाख २५ हजार २८६ शेतक-यांना ३६५ कोटी ६५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सहकार मंत्रालय स्थापन करुन, केंद्र सरकारने एैतिहासिक निर्णय घेतला. हे मंत्रालय सुरु झाल्यानंतर सहकारी साखर कारखान्यांवर वर्षानुवर्षे लादण्यात आलेला आयकराचा बोजा कमी करण्याचा निर्णय झाल्यामुळेच राज्यातील आणि जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारी टिकून आहे. केंद्र सरकारने ऊसाच्या हमीभावातही सातत्याने वाढ केली.
ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला सहाय्यभूत ठरणा-या प्राथमिक सोसायट्यांना सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून आता नवी ओळख निर्माण करुन देण्याचे काम होत असून, धान्य गोदामांची उभारणी करण्यासाठीही प्राथमिक सोसायट्यांना सहकार्य करण्याची भूमीका तसेच प्रमुख पीकांकरीता हमीभावाची शाश्वती देताना अन्य २२ उत्पादीत पिकांनाही हमीभाव देण्याची हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प पत्राच्या माध्यमातून दिली असल्याचे डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले.