April Rules Change: आजपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. देशात त्यामुळे या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून मोठे बदल दिसून येणार आहे आणि या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसणार आहे. या महिन्यापासून लागू झालेल्या 10 प्रमुख बदलांबद्दल जाणून घ्या
व्यावसायिक सिलिंडर 44.50 रुपयांनी स्वस्त
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 एप्रिलपासून 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 44.50 रुपयांनी कमी झाली आहे. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 44.50 रुपयांनी स्वस्त झाल्याने दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1762 झाली आहे.
12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
नवीन कर प्रणालीनुसार आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आजपासून देशात 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना बंद
महिलांसाठी चालवली जाणारी ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ (MSSC) योजना आजपासून बंद करण्यात आली आहे. त्यात 7.5% व्याजदर होता आणि कोणीही किमान 1000 ते 2 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकत होता.
कारच्या किमती वाढल्या
आजपासून मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, किआ इंडिया, ह्युंदाई इंडिया आणि होंडा या कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती 4% पर्यंत वाढवल्या आहेत. यामुळे वाहने खरेदी करणाऱ्या लोकांना महागाईचा सामना करावा लागेल.
UPI वापरला जाणार नाही
जर तुमचा मोबाईल नंबर बराच काळ डि ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही UPI द्वारे पेमेंट करू शकणार नाही. असे क्रमांक UPI सिस्टममधून काढून टाकले जातील.
ज्येष्ठ नागरिकांना व्याज उत्पन्नावर दुप्पट सूट
ज्येष्ठ नागरिकांना आता बँका आणि पोस्ट ऑफिसमधील व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 50,000 रुपयांऐवजी 1 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळेल.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी UPS पेन्शन योजना सुरू
आता केंद्र सरकारी कर्मचारी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) चा भाग बनू शकतात, ज्यामध्ये 25 वर्षांच्या सेवेनंतर, कर्मचाऱ्यांना गेल्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50% इतके पेन्शन मिळेल. या योजनेत सरकार 18.5% योगदान देईल.
युलिपवरील भांडवली नफा कर
जर तुमचा युलिप प्रीमियम दरवर्षी 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तो भांडवली मालमत्ता मानला जाईल. आता यावर मिळणाऱ्या नफ्यावर भांडवली लाभ कर आकारला जाईल.
बँकेतील किमान शिल्लक नियमात बदल
एसबीआय, पीएनबी, कॅनरा बँकेसह अनेक बँकांनी किमान शिल्लक रकमेशी संबंधित नियम बदलले आहेत. आता, तुमच्या खात्यातील किमान शिल्लक तुमच्या क्षेत्रानुसार ठरवली जाईल आणि ती राखण्यात अयशस्वी झाल्यास दंड होऊ शकतो.
विमान प्रवास स्वस्त झाला
एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमती कमी झाल्या आहेत, ज्यामुळे विमान प्रवास खर्चात दिलासा मिळू शकतो. चेन्नईमध्ये एटीएफची किंमत 06,064.10ने स्वस्त झाली आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.