Harvard University : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठात सुरु असणारा वाद आता पेटला असून या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत हॉर्वर्ड विद्यापीठाचा करमुक्त दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. हॉर्वर्ड विद्यापीठ अमेरिकेतील सर्वात जुन्या विद्यापीठापैकी एक आहे. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये सुरु असणारे निषेधांवर बंदी घालण्यासह व्यापक सुधारणांच्या अंमलबजावणीची मागणी केली होती मात्र हॉर्वर्ड विद्यापीठाकडून ही मागणी फेटाळण्यात आल्याने विद्यापीठ आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात वाद सुरु झाला होता.
सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, आम्ही हॉर्वर्डचा करमुक्त दर्जा काढून घेणार आहोत, विद्यापीठ याला पात्र नाही. असं ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. तर दुसरीकडे ट्रम्प प्रशासनाने आणखी एक मोठा निर्णय घेत विद्यापीठाला दिले जाणारे $2.2 अब्ज अनुदान थांबवले आहे. हॉवर्ड याविरुद्ध कायदेशीर लढाई लढत आहे.
कॅम्पसमध्ये यहूदीविरोधी निदर्शने
विद्यापीठाचे अध्यक्ष ॲलन एम. गार्बर यांनी आरोप केला आहे की ट्रम्प प्रशासन विद्यापीठावर अनावश्यक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे ट्रम्प प्रशासनाने ऑक्टोबर 2023 नंतर विद्यापीठ कॅम्पसमध्ये यहूदी-विरोधी आणि मुस्लिम-विरोधी पक्षपातीपणाचा अहवाल मागवला आहे. ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की विद्यापीठाने त्यांच्या कॅम्पसमध्ये यहूदी-विरोधी भावना कायम राहू दिल्या आहेत.
ट्रम्प प्रशासनाची इच्छा आहे की विद्यापीठाने सर्वसमावेशक कार्यक्रम आयोजित करावेत, निषेधांमध्ये मास्क वापरण्यावर बंदी घालावी, तसेच गुणवत्तेवर आधारित भरती आणि प्रवेश सुधारणांचा पाठपुरावा करावा, परंतु विद्यापीठ यासाठी तयार नसल्याची माहिती समोर आली आहे.