Maharashtra News: “घरात असलेल्या गीता आणि कुराण यांच्यात कधी लढाई होत नाही; जे लोक त्यांच्यासाठी लढतात ते कधीच ती पुस्तकं वाचलेली नसतात.” ही वाक्यं केवळ एक उपहासात्मक निरीक्षण नाही, तर आजच्या सामाजिक वास्तवावर बोट ठेवणारा आरसा आहे.
भारताच्या मातीत गीता, कुराण, बायबल, गुरु ग्रंथसाहिब या सर्व धर्मग्रंथांचा सन्मान करणारी परंपरा आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या विविध श्रद्धा, संस्कृती आणि विचारांची ही भव्य गंगा एकत्र वाहत आलेली आहे. पण दुर्दैवाने आज याच ग्रंथांच्या नावाने भिंती उभारल्या जात आहेत. रस्त्यावर रण मांडणारे, सोशल मीडियावर द्वेषाची भाषा करणारे, “धर्मरक्षक” असल्याचा दावा करणारे कितीजण खरेच हे ग्रंथ उघडून वाचतात?
गीता सांगते “अहिंसा परमो धर्म:” आणि “कर्मण्येवाधिकारस्ते”; तर कुराण म्हणते “La ikraha fid deen”, म्हणजे धर्मात जबरदस्ती नाही. या पवित्र ग्रंथांनी माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा संदेश दिला आहे, त्याग, क्षमा, सहिष्णुता आणि न्याय यांचा मार्ग दाखवला आहे. पण जो माणूस पुस्तकाच्या मुखपृष्ठात अडकून राहतो, तो त्या मूळ संदेशापर्यंत कधी पोचतच नाही.
राजकारण, सत्तालालसा आणि समाजात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने हे ग्रंथ हत्यारासारखे वापरण्याचा प्रकार वाढला आहे. यात बळी जातो तो सामान्य नागरिकांचा जो धार्मिकतेपेक्षा माणुसकीला महत्त्व देतो, पण अशा विभाजनाच्या जाळ्यात अडकतो.
मूळ समस्या ही धार्मिक ग्रंथ नव्हे, तर त्यांचं गैरवाचन (किंवा अजिबात न वाचन) आहे. शिक्षणाची उणीव, विवेकाचा अभाव आणि सत्तेच्या खेळींमुळे समाजात कृत्रिम तणाव निर्माण केला जातो. मग प्रश्न येतो आपण खरोखरच आपल्या श्रद्धेला समजून घेतोय का?
समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण धार्मिकतेच्या नावे उभ्या राहणाऱ्या भिंती पाडायला हव्यात वाचून, समजून, आणि विचार करून. फक्त गीता किंवा कुराण हातात घेऊन फोटो काढणं सोपं आहे, पण त्यातील तत्वज्ञान अंगीकारणं आणि आचरणात आणणं हेच खरं आव्हान आहे.
आज गरज आहे ती वादाच्या नाही, संवादाच्या. आणि तो संवाद सुरू होईल जेव्हा आपण ग्रंथांना हत्यार न समजता, विचारांची शिदोरी मानू. कारण शेवटी गीता आणि कुराण कधीही भांडत नाहीत माणूसच ते वाचायचं टाळतो आणि मग संघर्ष सुरू होतो.






