Ahmednagar Latest News: पैगंबर मोहम्मद यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे महंत रामगिरी महाराज, यती नरसिंम्हानंद आणि मुस्लीम समाजाला धमकी देणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात UAPA कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि मुस्लिम धर्मगुरू सलमान अजहरी यांची सुटका करण्यात यावी या मागणीसाठी आज समस्त मुस्लीम समाज व उलेमा शहर अहमदनगर यांच्यावतीने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. तसेच प्रशासनाकडून यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देखील मुस्लिम समाजाकडून देण्यात आला आहे.
मुस्लिम समाजाने या निवेदनामध्ये महंत रामगिरी महाराज, यती नरसिंम्हानंद आणि नितेश राणे यांच्या विरोधात दाखल असणाऱ्या गुन्ह्यामध्ये कलम 61 (1), 61(2), 192, 299 भारतीय न्याय संहिता 2023 तसेच 15 (1) बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) अॅक्ट 2019 अन्वये कलमांची वाढ करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
काही दिवसापूर्वी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झाले होते तेव्हा मुंबई पोलीस आयुक्ताने आरोपी विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.