DNA मराठी

Sunetra Pawar

sunetra pawar

Sunetra Pawar: गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांनी तटकरे यांना विचारला जाब

Sunetra Pawar : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत नाराजी उघड झाल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या बैठकीची माहिती आपल्याला देण्यात आली नव्हती, याबाबत सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त करत जाब विचारल्याचे वृत्त आहे. माहितीनुसार, या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वातील काही महत्त्वाच्या व्यक्तींना या बैठकीची पूर्वकल्पना नसल्याने पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या घडामोडीनंतर सुनेत्रा पवार यांनी थेट तटकरे यांच्याकडे याबाबत स्पष्टीकरण मागितल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देताना कोणताही वाद नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, हा केवळ गैरसमज असून बैठकीबाबत कोणताही गुप्त अजेंडा नव्हता. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना ‘देवगिरी’ येथे बोलावले होते आणि त्यानंतर पुढील घडामोडी झाल्या, असे त्यांनी स्पष्ट केले. अलीकडील काही दिवसांत सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीवरूनही पक्षात मतभेद समोर आले होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सार्वजनिकरीत्या पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा केला असला, तरी या नव्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संवाद आणि समन्वयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Sunetra Pawar: गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांनी तटकरे यांना विचारला जाब Read More »

ajit pawar

Ajit Pawar Death Case : अजित पवार अपघात प्रकरणाचा तपास कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

Ajit Pawar Death Case : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या प्रकरणाचा सध्या सीआयडी (CID) आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) अशा दोन स्वतंत्र यंत्रणांकडून समांतर तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, AAIB चा अंतिम अहवाल येण्यापूर्वी सीबीआयला या तपासात हस्तक्षेप करता येत नाही, अशी भूमिका केंद्रीय यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आली आहे. सीआयडीने आतापर्यंत केलेल्या तपासात विविध बाबींची पडताळणी करण्यात आली आहे. विशेषतः पायलट सुमित कपूर यांच्या बँक खात्यांची, आर्थिक व्यवहारांची आणि गुंतवणुकीची तपासणी करण्यात आली. तसेच उपलब्ध सीसीटीव्ही आणि इतर फुटेजचेही विश्लेषण करण्यात आले. मात्र, या तपासात कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नाही, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे AAIBचा तपास. अपघातग्रस्त विमानातील उपकरणांमधून आवश्यक तांत्रिक माहिती (डेटा) यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आली असून त्याचे विश्लेषण सुरू आहे. या अहवालातून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. अंतिम अहवालाच्या वेळापत्रकाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांनी यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा केली आहे. त्यानुसार जानेवारीपूर्वी AAIBचा अंतिम अहवाल सादर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. “रोहित पवार यांनी अशा प्रकारच्या तपासाला तीन ते चार वर्षे लागू शकतात, असे म्हटले होते. ते काही प्रमाणात खरे असले, तरी या प्रकरणात अमेरिकेतील तज्ज्ञ संस्थेचीही मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे दादांच्या पुण्यतिथीपूर्वी अंतिम अहवाल येईल, अशी अपेक्षा आहे. सरकारचे या संपूर्ण प्रकरणावर सातत्याने लक्ष आहे,” असेही फडणवीस यांनी सांगितले.

Ajit Pawar Death Case : अजित पवार अपघात प्रकरणाचा तपास कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले… Read More »

rain

Pune Rain Alert: पुण्यात पावसाचा कहर; 22 ठिकाणी दरडी, 4 जणांचा मृत्यू

Pune Rain Alert: पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती आणि दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेत माहिती दिली. गेल्या तीन दिवसांपासून हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता. अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्य करत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 22 ठिकाणी दरडी कोसळल्या असून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विविध भागांत अडकलेल्या तब्बल 4 हजार 568 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. उद्याही घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी दोन एनडीआरएफ आणि चार पीडीआरएफ पथके सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. शाळांना सुट्टी जाहीर परिस्थिती लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच लोहगड, विसापूर, तिकोना आणि लायन्स पॉईंट ही पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत. इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढत असल्याने देहू आणि आळंदी येथून वारकऱ्यांनी प्रवास टाळून थेट पुण्यातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन देखील सुनेत्रा पवार यांनी केले.

Pune Rain Alert: पुण्यात पावसाचा कहर; 22 ठिकाणी दरडी, 4 जणांचा मृत्यू Read More »

dhananjay munde

Dhananjay Munde : नोकरीच्या आमिषाने म्यानमारमध्ये ओलिस ठेवलेल्या तरुणांची सुटका करा

Dhananjay Munde : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील नांदूर घाट येथील रहिवासी स्वप्नील काळुंके यांसह अनेक तरुणांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून म्यानमार – थायलंड सीमेवर एका छळ छावणीत ओलिस ठेऊन त्यांच्या कडून जबरदस्तीने सायबर गुन्हे घडवले जात असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेत केंद्र सरकारच्या मदतीने या सर्व तरुणांची सुखावून सुटका करावी, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी लेखी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महोदयांची विधानभवन येथे भेट घेत विनंतीचे पत्र दिले आहे. बीड जिल्ह्यातील स्वप्नील काळुंके सह महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे २०-२५ तरुण तर देशातून तब्बल ७००-८०० तरुण म्यानमार – थायलंड सीमेवरील गोल्डन ट्रँगल नामक छळछावणीत ओलिस असून त्यांना शारीरिक यातना देऊन त्याच्याकडून सायबर गुन्हे घडवले जात असल्याची तक्रार बीड सायबर पोलिसात दाखल करण्यात आलेली आहे, तसेच याप्रकरणी तपासाची चक्रे थेट देशाच्या गुप्तचर विभागापर्यंत पोचले असून, आपला बचाव व सुटका होण्यासाठी ही सर्व तरुण प्राणांची बाजी लावत असून सध्या ते मृत्यूच्या दाढेत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तातडीने लक्ष घालून केंद्र सरकार तसेच विदेश मंत्रालयाची मदत घेऊन या तरुणांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रयत्न सुरू करावेत तसेच मोठ्या पगाराचे आश्वासन देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळे विणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी तस्करी करणाऱ्या या टोळीतील महाराष्ट्रामध्ये सक्रिय असणाऱ्या एजंटांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Dhananjay Munde : नोकरीच्या आमिषाने म्यानमारमध्ये ओलिस ठेवलेल्या तरुणांची सुटका करा Read More »

Rohit Pawar: राष्ट्रवादीत बदलाचे वारे, अजितदादांपेक्षा वेगळे दाखविण्याचा प्रयत्न, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

Rohit Pawar: गेल्या काही दिवसांत विविध पदे आणि उमेदवारी वाटपांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात कुटुंबातील आणि मर्जीतील व्यक्तींना संधी देण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता वेगळी भूमिका घेतली आहे. पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रम झाला. येत्या पंधरा दिवसांत पक्षात फेरबदल केले जाणार असून ज्यांचे कोणा नेत्याशी नाते, घराणेशाहीशी संबंध नाही, अशा सामान्य पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे आमदार पवार म्हणाले आहेत. रोहित पवार म्हणाले, पुढील दहा पंधरा दिवसात पक्षात संघटनात्मक बदल करण्यात येणार आहे. यामध्ये नव्या कार्यकर्त्यांना पदे देण्यात येणार आहेत. ज्यांचे कोणाही नेत्याशी नाते नाही, ज्यांचा घराणेशाहीशी संबंध नाही, अशा कार्यकर्त्यांना पक्षाची पदे दिली जाणार आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्ते, युवक आणि महिलांना पुढे आणण्यावर भर दिला जाणार आहे. पक्ष मजबुत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षात बदल करण्याच्या घोषणा शक्यतो स्वतः शरद पवार करीत असतात. यावेळी पवार किंवा कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्याऐवजी आमदार रोहित पवार यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे रोहित पवार यांनाही पक्षात मोठी संधी मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Rohit Pawar: राष्ट्रवादीत बदलाचे वारे, अजितदादांपेक्षा वेगळे दाखविण्याचा प्रयत्न, रोहित पवार नेमकं काय म्हणाले? Read More »

kishor masal

Kishor Masal : पक्षातून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ आक्रमक; ‘सुनावणी न करताच शिक्षा दिली’

Kishor Masal : बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल जे बेताल वक्तव्य केलं ते त्यांना चांगलंच भोवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आता नगरसेवक किशोर मासाळ यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मासाळ यांची पक्षातून हाकलपट्टी करत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर किशोर मासाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझी पक्षातून हकलपट्टी केली हे मला आता समजलं. पण हकलपट्टी का केली हे मी काल पत्रकार परिषद घेऊन विचारलं होतं. ही मला फाशी आहे हे अगोदरच ठरलं होतं असं किशोर मासाळ यांनी म्हटल आहे. व्हायरल होणारा रेकॉर्डिंग माझं नाही ते तुमच्याकडे आलं कसं ? मला ब्लॅकमेल होत आहे. कोणी दिलं याची चौकशी करण्याची मागणी मी एका पत्राद्वारे बारामती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र याची कोणतीही चौकशी झाली नाही. उलट माझ्यावरती एक गुन्हा दाखल झाला. तुझी ऑडिओ क्लिप आम्ही व्हायरल करू हे अगोदरच मला सांगितलं होतं हे सर्व प्री प्लॅन आहे अपेक्षित आहे यात वेगळं काही नाही असं मासाळ यांनी म्हटलं आहे. तर माफीनाम्यावर बोलताना किशोर मासाळ म्हणाले की, एखाद्या वेळी सैरभैर झाल्यावर आपण अडचणीत चाललोय म्हटल्यावर जिकडे दिशा दिसेल तिकडे आपण धावतो. मला ट्रॅप करून फसवलेलं आहे. ती क्लिप कुठून आली ती क्लिप माझीच आहे का आणि ती क्लिप कोणी वाजवायला दिली आणि का माझ्यावरती आरोप लावला याचा शोध होईपर्यंत तोपर्यंत ती क्लिप माझी नाही. एक सेकंदाच्या क्लिप वर तुम्ही कसं ठरवलं की तो मीच आहे म्हणून. कोर्ट सुद्धा दोन-चार सुनावण्या घेता आणि मग निर्णय घेत इथे सुनावणीच झाली नाही अस माध्यमांशी बोलताना किशोर मिसाळ म्हणाले.

Kishor Masal : पक्षातून हकालपट्टीनंतर किशोर मासाळ आक्रमक; ‘सुनावणी न करताच शिक्षा दिली’ Read More »

Rais Shaikh : अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; सुनेत्रा पवारांना पत्र

Rais Shaikh : राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागातील ४०६ पदे अनेक वर्षे रिक्त असून त्याचा या विभागाच्या योजना राबवण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावीत, मार्टी संस्थेच्या कामास गती द्यावी, भिवंडीतील उर्दू घराचा प्रस्ताव मार्गी लावावा आदी १२ मागण्या समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री व अल्पसंख्याक विभागाच्या मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केल्या आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी १९७८ क्रमांकांच्या लक्षवेधी सूचनेच्या कार्यवाहीबाबत सोमवारी मुस्लीम आमदारांची बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी अल्पसंख्याक विकास विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुस्लीम आमदारांची बोलावलेली ही पहिलीच बैठक आहे. यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, या विभागातील ४०६ पदे अनेक वर्षे रिक्त आहेत. तसेच अल्पसंख्याक आयुक्तालयातील ३६ आणि जिल्हा कार्यालयातील ८५ नवी पदे अद्याप भरलेली नाहीत. अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे कामकाज अद्याप सुरळीत झालेले नाही. भिवंडीतील उर्दू घराचा प्रस्ताव सादर केला आहे, मात्र काम प्रत्यक्ष सुरु नाही. तसेच लोकराज्य मासिकाची उर्दू आवृत्ती तातडीने सुरु करण्याची गरज आहे. आमदार रईस शेख पुढे म्हणाले की, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाच्या अटी शिथील करण्याची मागणी अनेक वर्षे प्रलंबित आहे. उर्दू साहित्य अकादमीच्या अधिक्षक व कार्यकारी अधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार दिलेले नसून या कार्यालयाच्या नूतनीकरणाची बाब प्रलंबित आहे. टाटा समाज विज्ञान संस्थेला मुस्लिमांच्या सामाजिक -आर्थिक सर्वेक्षण करण्याच्या दिलेल्या कामाचा चार वर्षे कार्यारंभ दिलेला नाही. या सर्व प्रलंबित बाबी मुस्लीम समाजाच्या विकासासाशी संबंधित असून त्या तातडीने मार्गी लागणे आवश्यक असल्याचे आमदार रईस शेख म्हणाले. १ जून रोजी आमदार शेख यांचा वाढदिवस असल्याने पूर्वनियोजित कार्याक्रमामुळे आपण या बैठकीस हजर राहू शकत नाही. दिवगंत अजित पवार यांनी अल्पसंख्याक विकास विभागाला न्याय देण्याचा कायम प्रयत्न केला. त्यांची अपुरी राहिलेली या विभागाची कामे आपण मार्गी लावावीत, अशी विनंती आमदार रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केली आहे.

Rais Shaikh : अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; सुनेत्रा पवारांना पत्र Read More »

parth pawar

Parth Pawar: पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही

Parth Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत पार पडलेल्या बैठकीत राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि खासदार पार्थ पवार यांच्या वाद झालं असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र ही केवळ चर्चा असून बैठकीत दोघांमध्ये कुठलाही वाद झाला नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील दिली आहे. मंत्री छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्याबाबत योग्य तो खुलासा केला आहे. ज्या बातम्या येत आहेत त्या सुत्रांच्या हवाले येत आहेत. एकतर्फी आणि नकारात्मक बातम्या पार्थ पवार किंवा पक्षाबद्दल दिल्या जात आहेत. मात्र दुसरी बाजू माध्यमांनी समजून घेतली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी माध्यमांसमोर दिल्ली येथे मांडली. गेले तीन दिवस पार्थदादा पवार आणि राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार या दिल्लीत बैठकीला आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी बैठका घेत आहेत. मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसताना बातमी आली आहे असेही उमेश पाटील म्हणाले. प्रत्येक बातमी तुमची सुत्रांकडून येत आहे. कोणतीही पुराव्याची बातमी लावलेली नाही. त्यामुळे सुत्रांकडून आलेल्या बातम्या तुम्ही लावाव्या का असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. पार्थ पवार यांच्याकडे नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत त्यामुळे त्यांना त्या नवीन आहेत. सुत्रांच्या हवाले बातम्या येणे योग्य नाही. आम्हाला कोण टार्गेट करतंय असं आम्हाला वाटत नाही. मात्र खात्री किंवा पुरावा असल्याशिवाय बातम्या लावणं चुकीचं आहे असेही उमेश पाटील म्हणाले.

Parth Pawar: पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही Read More »

maharashtra government

मोठी बातमी! शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ

Maharashtra Government: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेत शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ दिली आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सूधारणेस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. तर दुसरीकडे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डोंबिवलीतील सोनारपाड्यातील पिंपळेश्वर मंदिराला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन मिळणार आहे. या जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्यास व ही जमीन ट्रस्टला नाममात्र दरात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ निर्णय ▶सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी. नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार. (परिवहन विभाग) ▶शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ. त्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सूधारणेस मान्यता. (सामान्य प्रशासन विभाग) ▶डोंबिवलीतील सोनारपाड्यातील पिंपळेश्वर मंदिराला जमीन. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागाव सोनारपाडा (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला ४ एकर २५ गुंठे जमीन मिळणार. या जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्यास व ही जमीन ट्रस्टला नाममात्र दरात देण्यास मान्यता. (उद्योग विभाग) ▶नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्त्यासाठी खरेदी करायच्या जमिनीसाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय. मौजे गोदणी आणि मौजे लाडगाव (रीठी) (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथील खाजगी जमीन नवीन नागपूर व नवीन बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी वाटाघाटीने थेट खरेदी करावी लागणार. या व्यवहारावरील मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफ करण्यास मान्यता. (महसूल व मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग)

मोठी बातमी! शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: जवाहर बालभवनाच्या परिसरात मुक्त विज्ञान उद्यान उभारणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री फडणीस यांच्या हस्ते बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनतर मध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कौशल्य, रोजगार आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार दीपक केसरकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण विभागाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, बालभवनच्या संचालक नीता पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. बालभवनच्या नूतन वास्तूची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या केंद्राशी जोडण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी पुढाकार घ्यावा. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागेल. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, बालभवन ही केवळ इमारत नसून लाखो मुलांच्या स्वप्नांना आकार देणारे प्रेरणास्थान आहे. नवीन वास्तूमुळे महाराष्ट्रातील बालकांच्या कल्पकतेला नवे पंख मिळतील. मुलांना बालभवनाच्या माध्यमातून खेळ, गायन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आणि विविध सृजनशील उपक्रमांद्वारे स्वतःला शोधण्याची संधी येथे मिळते; तसेच त्यांना मातीशी, रंगांशी आणि संगीताशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालभवन गेली ७५ वर्षे सातत्याने काम करत आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, ४ ते १६ वयोगटातील मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला वाव देण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे. नूतनीकरण करण्यात आलेल्या या इमारतीत तळमजल्यावर अत्याधुनिक प्रेक्षकगृह आणि सुसज्ज ग्रंथालय तयार करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर नृत्य दालन, नाट्य कक्ष आणि संगीत कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ; तसेच मूर्तिकला आणि चित्रकला दालने उभारण्यात आली आहेत. या वास्तूमध्ये १०० विद्यार्थी क्षमतेची तीन सुसज्ज सभागृहे आहेत. एकाच वेळी ५०० विद्यार्थी विविध कलांचे प्रशिक्षण घेऊ शकतील. दररोज ५०० विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण क्षमतेनुसार महिन्याला सुमारे १० हजार, तर वर्षभरात जवळपास १ लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळू शकणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक बालभवन सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा मानस आहे, असे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले. यावेळी सर जे. जे. कला महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. बालभवनच्या संचालक नीता पाटील आणि सर जे. जे. कला महाविद्यालयाचे संचालक किशोर इंगळे; तसेच कुलसचिव शशिकांत काकडे यांच्यात सामंजस्य कराराच्या प्रतींचे आदानप्रदान करण्यात आले. या करारामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कला प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Devendra Fadnavis: जवाहर बालभवनाच्या परिसरात मुक्त विज्ञान उद्यान उभारणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »