DNA मराठी

Maharashtra Politics

raj thackeray

Raj Thackeray: आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाही हा भाजपला माज; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लडाखचे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार असून, मतभिन्नता व्यक्त करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. राज ठाकरे यांनी सामाजिक माध्यमावरील पोस्टद्वारे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा 19 वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ? ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे. सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना 2018 साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले. पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात. आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता. निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. आणि हा विषय राजकीय नाहीये. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे.

Raj Thackeray: आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाही हा भाजपला माज; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राज ठाकरेंचा पाठिंबा Read More »

vilas ghule case

Vilas Ghule : विलास घुले प्रकरणाला नवे वळण; उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

Vilas Ghule : केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, ज्याला वाचवण्यासाठी विलास घुले यांनी धाव घेतली होती, त्या उमेश मानेविरुद्ध आता अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धमकावल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडीमुळे संपूर्ण प्रकरणाचा तपास नव्या दिशेने सुरू झाला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, उमेश माने याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करून त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो वारंवार तिचे ब्लॅकमेलिंग करत होता. त्रास असह्य झाल्यानंतर महिलेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीय पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना त्यांना धमकावून परावृत्त करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. महिलेने केलेल्या आरोपानुसार, त्यानंतरही तिचा छळ सुरूच राहिला. विलास घुले आणि उमेश माने हे वारंवार घराजवळ येऊन धमक्या देत होते. अखेर संबंधितांना समजावून सांगण्यासाठी दोन्ही बाजूंची भेट झाली. मात्र, तेथे झालेल्या हाणामारीत विलास घुले यांचा मृत्यू झाला. पीडित महिलेच्या कुटुंबाने हा प्रकार स्वसंरक्षणात घडल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या प्रकरणात यापूर्वीच अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने तपासाचे स्वरूप अधिक व्यापक झाले असून, पोलीस सर्व आरोपांची सखोल चौकशी करत आहेत.

Vilas Ghule : विलास घुले प्रकरणाला नवे वळण; उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: ऑपरेशन तुतारी अन् वर्षा बंगल्यावर जयंत पाटील CM फडणवीसांना भेटीला; तासभर चर्चा

Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हेही उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या भेटीमुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. अलीकडेच जयंत पाटील यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीमुळे शरद पवार गटाच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीतील काही महत्त्वाच्या घडामोडींवर या बैठकीत चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडीवरून अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा सुरू असतानाच ही बैठक पार पडल्याने तिचे राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे. मात्र या भेटीचा पक्षांतर्गत वादाशी संबंध नसल्याचे संकेत काही नेत्यांनी दिले असून, कोणताही राजकीय निर्णय किंवा पक्षांतराचा विषय चर्चेत नसल्याचेही सांगितले जात आहे. तरीही या बैठकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातील संभाव्य समीकरणांच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

Devendra Fadnavis: ऑपरेशन तुतारी अन् वर्षा बंगल्यावर जयंत पाटील CM फडणवीसांना भेटीला; तासभर चर्चा Read More »

shrikant shinde

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळ श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट तर ओमराजे निंबाळकर राज्यमंत्री?

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यांच्या नावाला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीही पसंती असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्यमंत्रीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू असून ओमराजे निंबाळकर, संजय जाधव आणि संजय दिना पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या सहा खासदारांपैकी एका नेत्याला ही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या संभाव्य बैठकीमुळे या चर्चांना अधिक वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्यानंतर पक्षाच्या खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदार असलेला पक्ष म्हणून शिवसेनेचे केंद्रातील राजकीय वजन वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाला अतिरिक्त मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत अद्याप केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता दिल्लीतील घडामोडींवर लागल्या आहेत.

Shrikant Shinde : केंद्रीय मंत्रिमंडळ श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट तर ओमराजे निंबाळकर राज्यमंत्री? Read More »

sujay vikhe

Sujay Vikhe: एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय… सुजय विखे स्पष्टच बोलले

Sujay Vikhe : नगर–मनमाड महामार्गावरील सावळीविहीर जंक्शन येथे सुरू असलेल्या रस्ते व उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात दूर केली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन आणि परिसरातील ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत सविस्तर कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून, गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली केली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. सावळीविहीर येथे नगर–मनमाड महामार्गाचे काम आणि राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम एकाच ठिकाणी सुरू असल्याने वाहतुकीवर दुहेरी ताण आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. विखे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नाशिक विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, नगर विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन तसेच सावळीविहीर, सावळीविहीर बुद्रुक, निमगाव, निगोंज आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेतली. तसेच पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध पर्यायी उपायांवर चर्चा करण्यात आली. अवजड वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन, कामाचा वेग वाढविणे, वाहतुकीचे योग्य नियमन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी पुढील तीन दिवसांत करण्यात येणार असून, त्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला. धुळीच्या समस्येबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, रस्त्याच्या भरावावर वारंवार पाणी टाकल्यास तो कोरडा होत नाही आणि त्यावर डांबरीकरण करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत भविष्यात रस्ता खचण्याचा धोका निर्माण होतो. राहुरी परिसरातील काही रस्त्यांवर घाईत काम केल्यामुळे अशा समस्या निर्माण झाल्याचा दाखला देत त्यांनी सांगितले की, दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता व्हावा यासाठी काही दिवस धुळीचा त्रास सहन करावा लागेल. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम कायमस्वरूपी दर्जेदार व्हावे, हीच प्रशासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुपौर्णिमेपूर्वी उड्डाणपुलाच्या शेवटापासून बायपासच्या सुरुवातीपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण करण्यात येणार असून ती वाहतुकीसाठी खुली केली जाईल. दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोटरेबल ठेवण्यात येईल. गुरुपौर्णिमेनंतर दुसऱ्या बाजूच्या कामाला गती देण्यात येईल, असा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रस्त्याच्या मध्यरेषेपासून १५ मीटरच्या हद्दीत येणारी सर्व अतिक्रमणे दोन दिवसांत स्वेच्छेने हटवावीत, असे आवाहन करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, मुदतीनंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करून सर्व अतिक्रमणे हटविण्यात येतील. या अतिक्रमणांमध्ये काही मंदिरे, टपऱ्या आणि इतर बांधकामांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदारावर होत असलेल्या टीकेबाबत बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, संबंधित ठेकेदाराची नियुक्ती केंद्र शासनाने केली आहे. तो कोणाचाही नातेवाईक किंवा ओळखीचा व्यक्ती नसून, त्याच्याकडून दर्जेदार काम करून घेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. कामात त्रुटी आढळल्यास त्या निश्चितपणे दुरुस्त केल्या जातील; मात्र अधिकारी आणि ठेकेदारांशी अरेरावी करून प्रश्न सुटणार नाहीत. उलट ठेकेदाराने काम सोडले तर प्रकल्प आणखी विलंबित होईल, याचाही विचार नागरिकांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “दहा वर्षांपासून या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आता प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. त्यामुळे संयम ठेवून दर्जेदार काम पूर्ण होऊ देणे गरजेचे आहे. चुका झाल्यास त्या दुरुस्त केल्या जातील, पण विकासकामांना अडथळा निर्माण होणार नाही याचीही सर्वांनी काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित करत सांगितले की, या कामासाठी सुमारे ४० टक्के कमी दराने ठेका स्वीकारणारा ठेकेदार मिळाला आहे. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारच्या टक्केवारीची मागणी नसल्याने कामाला गती मिळाली आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, तेथे विकासकामे वर्षानुवर्षे रखडतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली. दरम्यान, जिल्ह्यात सुरू असलेल्या दूध भेसळविरोधी कारवाईबाबतही डॉ. सुजय विखे पाटील यांनी भूमिका मांडली. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, या भूमिकेला त्यांनी स्पष्ट पाठिंबा दिला. मात्र, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने सखोल पडताळणी करणे आवश्यक असून, चुकीच्या पंचनाम्यांमुळे किंवा एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवायांना मिळत असलेल्या प्रसिद्धीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “यापूर्वीही संबंधित अधिकारी अशा कारवाया करत होते. मात्र, आता अचानक या कारवायांना एवढी प्रसिद्धी का मिळत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत, प्रशासनाने निष्पक्ष, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केल.

Sujay Vikhe: एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय… सुजय विखे स्पष्टच बोलले Read More »

smart meter

Smart Meter : स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा असल्याचा खोटा आरोप; ग्राहक प्रतिनिधीसह यूट्यूब संपादकाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल

Smart Meter : महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा आरोप करून आणि सोशल मीडियाद्वारे त्याचा हेतुपुरस्सर प्रसार करीत नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहक संघटनेचे नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर व ‘कोकणसाद’ यूट्यूब न्यूज चॅनेलचे संपादक सागर चव्हाण यांच्याविरुद्ध सावंतवाडी (जि. सिंधुदूर्ग) पोलीस ठाण्यात रविवारी (दि. १२) फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. या खोट्या आरोप प्रकरणी महावितरणकडून गंभीर दखल घेण्यात आली. स्मार्ट मीटरबाबत कपोलकल्पित तसेच नागरिकांमध्ये भीती व दहशत निर्माण होईल असे जाहीर व रेकॉर्डेड वक्तव्य केल्याप्रकरणी नंदन वेंगुर्लेकर आणि केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी ही खोटी माहिती सर्व सोशल मीडियाच्या खात्यांवरून प्रसारित केल्याप्रकरणी यूट्यूबचे संपादक सागर चव्हाण याच्याविरुद्ध जनतेत भीती निर्माण करून गुन्ह्यास चिथावणी देणे, गुन्हेगारी पद्धतीने धमकावणे, शांततेचा भंग करण्यासाठी जाणीवपूर्वक अपमान करणे, बदनामी करणेबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार कलम ३५३ (१) (बी), ३५१ (३), ३५२ व ३५६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस पुढील तपास करीत आहे. स्मार्ट मीटर हे पूर्णपणे सुरक्षित आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यात कोणताही ‘कॅमेरा’ किंवा गोपनीयतेचा भंग करणारी यंत्रणा नाही. वीजग्राहकांनी स्मार्ट मीटरबाबत पूर्णतः निश्चिंत राहावे. कोणत्याही कपोलकल्पित माहिती व खोटारड्या आरोपांना बळी पडू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. स्मार्ट मीटरबाबत अत्यंत खोटी व काल्पनिक माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात येत असल्याचे देखील महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले. याबाबत माहिती अशी की, सावंतवाडी (जि. सिंधुदूर्ग) येथे कोकणसाद यूट्यूब न्यूज चॅनेलमध्ये स्मार्ट मीटर संदर्भात चर्चासत्र ठेवण्यात आले. त्यांचे रेकॉर्डिंग शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी करण्यात आले. या चर्चासत्रामध्ये महावितरणकडून उपकार्यकारी अभियंता योगेंद्र वाघ, ग्राहक संघटनेचे नंदन वेंगुर्लेकर तसेच दीपक पटेकर सहभागी झाले होते. यामध्ये महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत विविध फायद्यांची माहिती देण्यात आली तसेच विविध आरोपांचे सर्मपक खुलासे करण्यात आले. तथापि, या चर्चासत्रामध्ये नंदन वेंगुर्लेकर यांनी स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा धादांत खोटा आरोप केला. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांच्या खाजगी आयुष्यावर पाळत ठेवली जात असल्याचा अत्यंत हास्यास्पद दावा त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला. याबाबत महावितरणचे श्री. वाघ यांनी त्याचवेळी स्पष्टीकरण दिले. तरीसुद्धा कोकणसाद यूट्यूब न्यूज चॅनेलने त्यांच्या इतर सोशल मीडियाच्या खात्यांवरून स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याची खोटी जाहिरात केली आणि या चर्चासत्रातील संदर्भ वगळून दिशाभूल करणारा २ ते ३ मिनिटांचा भाग ‘स्मार्ट मीटरची चिरफाड’ या मथळ्याखाली रिलच्या माध्यमातून हेतुपुरस्सरपणे प्रसारित केला. त्यात महावितरणकडून करण्यात आलेला खुलासा देखील वगळण्यात आला.

Smart Meter : स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा असल्याचा खोटा आरोप; ग्राहक प्रतिनिधीसह यूट्यूब संपादकाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल Read More »

shrirampur band

Shrirampur Band : गुन्हेगारी विरोधात आज श्रीरामपूर बंद…

Shrirampur Band : श्रीरामपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावरती उच्छाद मांडला असून खून मारामाऱ्या अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे यातच श्रीरामपूर मधील एका हॉटेल मालकाच्या हत्येमुळे शहरात एकच खळबळ उडाली वाढती गुन्हेगारी विरोधात श्रीरामपूर शहरांमध्ये आज बंद पाळण्यात आला असून यामध्ये नागरिक व्यापारी व राजकीय नेत्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. श्रीरामपूर मधील हॉटेल मालक आकाश दुबय्या यांच्या भर दिवसा घडलेल्या हत्याकांडामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे शहरात वाढती गुन्हेगारी व या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा यासाठी आज सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी स्वतःहून कडकडीत बंद पाळला असून आमदार हेमंत उगले नगराध्यक्ष करण ससाने यांच्यासह स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी फेरी काढून गुन्हेगारांचा विमोड करण्यासाठी साथ द्यावी असं आव्हान देखील केला आहे. तसेच शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुक्का अंतर्गत कारवाईचे करण्यात यावी अशी मागणी देखील पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे दरम्यान आकाश यांच्या कुटुंबीयांनी संबंधित गुन्हेगारावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली तरी जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होत नाही तोपर्यंत श्रीरामपूर शहर बंद राहणार असे आवाहन सर्वपक्षीय विविध संघटनांनी केले आहे. श्रीरामपूर मध्ये अवैध धंदे गुंडांच्या टोळ्या ह्या कार्यरत असून यामुळे गोरगरिबांवती अन्याय महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत मात्र पोलिसांनी देखील योग्य वेळी कारवाई केली पाहिजे श्रीरामपूर शहराची ओळख गुन्हेगारी शहर म्हणून निर्माण होत आहे वाळूमुळे अनेक गुन्हेगारी टोळ्या तयार होत असून शासन दरबारी हा विषय प्राधान्याने मांडू व मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून या गुंडांचा कायमचा बंदोबस्त करण्यात असल्याचे माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली आहे.

Shrirampur Band : गुन्हेगारी विरोधात आज श्रीरामपूर बंद… Read More »

img 20260712 wa0035

Ahilyanagar Crime: तलाठ्याचा सत्कारात नाव पुकारलं नाही ; लोखंडी माईक डोक्यात घालून तरुणाला रक्तबंबाळ

Ahilyanagar Crime: जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथे आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाहसोहळ्याला एका धक्कादायक घटनेने गालबोट लागले. स्वागतावेळी आपले नाव माईकवरून पुकारले नाही, या क्षुल्लक कारणावरून एका तलाठ्याने संतापाच्या भरात माईक हातातून हिसकावून तोच लोखंडी माईक एका तरुणाच्या डोक्यात घातल्याची धक्कादायक घटना शनिवारी (११ जुलै) दुपारी घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून जामखेड पोलीस ठाण्यात तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझं नाव माईकवर का पुकारलं नाही?; लोखंडी रॉड असलेला माईक घातला डोक्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळा (ता. जामखेड) येथील अशोक रामचंद्र पठाडे (वय ३७) हे राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यात सूत्रसंचालन करत होते. विवाहासाठी आलेल्या नातेवाईक आणि मान्यवरांचे ते माईकवरून स्वागत करत असताना तलाठी शिवाजी सखाराम हजारे यांनी त्यांच्याकडे येत माझं नाव माईकवर का पुकारलं नाही? असा जाब विचारला. या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. आरोपानुसार, संतापलेल्या हजारे यांनी पठाडे यांना शिवीगाळ करत तोंडावर मारहाण केली. त्यानंतर हातातील लोखंडी रॉड असलेला माईक हिसकावून तो त्यांच्या डोक्यात जोरात मारला. या हल्ल्यात पठाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता तुला खल्लास करतो अशी जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर विवाहसोहळ्यात एकच गोंधळ उडाला. उपस्थित जीवन मोहन रोडे, तानाजी लक्ष्मण पवार आणि प्रशांत भाऊसाहेब पवार यांनी तत्काळ धाव घेत भांडण सोडवले आणि जखमी पठाडे यांची सुटका केली. त्यानंतर प्रशांत मारुती शिंदे यांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे दाखल केले.या प्रकरणी जखमी अशोक रामचंद्र पठाडे यांच्या फिर्यादीवरून तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्याविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार तुकाराम सोनवणे पुढील तपास करत आहेत.

Ahilyanagar Crime: तलाठ्याचा सत्कारात नाव पुकारलं नाही ; लोखंडी माईक डोक्यात घालून तरुणाला रक्तबंबाळ Read More »

farmers

Devendra Fadnavis: CM फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; 50 हजारांची अट हटवली

Devendra Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे समर्थन करताना, “कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत झाला नाही. मात्र, शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी देणे ही सरकारची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट केले. तसेच, महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांवरील ५० हजार रुपयांची अट हटवण्याचाही निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, कर्जमाफी ही कायमस्वरूपी उपाययोजना नसून परिस्थितीची गरज म्हणून ती करावी लागते. “आमचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना सावकारांकडे जाण्याची वेळ येऊ नये, हे आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार ते पूर्ण केले आहे. सध्या कोणतीही निवडणूक नाही, तरीही सरकारने हा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी सरकारच्या वीज सवलतीचाही उल्लेख केला. “कर्जमाफीव्यतिरिक्त सरकार दरवर्षी सुमारे २५ हजार कोटी रुपयांची वीजमाफी देते. कर्जमाफीचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बँकांची बैठक घेऊन आणि संपूर्ण माहितीचा अभ्यास करूनच ही योजना आखण्यात आली आहे,” असे ते म्हणाले. कर्जमाफी योजनेबाबत ३६ लाख शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. “ही योजना ५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना आहे,” असा दावा त्यांनी केला. फडणवीस यांनी सांगितले की, महायुतीतील आमदारांनी कर्जमाफीतील ५० हजार रुपयांची मर्यादा हटवण्याची मागणी केली होती. सुरुवातीला ही अट काढल्यास सरकारवर ३ ते ४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडेल, अशी माहिती देण्यात आली होती. तसेच कर्जमाफीची मर्यादा एक लाख रुपये केल्यास सुमारे दोन लाख शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. “व्यापक हिताचा विचार करून सरकारने अखेर ५० हजार रुपयांची अट हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, २०२६-२७ संदर्भातील अटही वगळण्यात येणार आहे,” असे फडणवीस यांनी जाहीर केले.

Devendra Fadnavis: CM फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; 50 हजारांची अट हटवली Read More »

tukaram munde

Tukaram Munde: अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी सावळीविहीर येथील दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित

Tukaram Munde: अन्न सुरक्षा व मानके कायदा व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील साई जतिन दूध संकलन केंद्राचा परवाना तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) अ.अ. भोईटे यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाने ९ जुलै २०२६ रोजी संबंधित दूध संकलन केंद्राची तपासणी केली. यावेळी संकलित दुधाचे दोन नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटी व आस्थापनेने सादर केलेल्या नाकारलेल्या अन्नपदार्थांच्या अहवालाचा विचार करण्यात आला. संबंधित केंद्राचा व्यवसाय सुरू राहिल्यास ग्राहकांच्या आरोग्याला संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आल्याने अन्न सुरक्षा व मानके विनियम, २०११ मधील तरतुदीनुसार या दूध संकलन केंद्राचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नागरिकांना स्वच्छ व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहीम प्रभावीपणे राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याचा संशय किंवा तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही भोईटे यांनी केले आहे.

Tukaram Munde: अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी सावळीविहीर येथील दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित Read More »