DNA मराठी

DNA Marathi News

कोट्यवधी नागरिक रोज पितात विष; लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचा संशय, राजकीय आशीर्वादाचीही चर्चा

Maharashtra News: राज्यात दूध भेसळीचा प्रश्न केवळ खाद्य सुरक्षा किंवा ग्राहक फसवणूक इतकाच राहिलेला नाही. ही बाब आता थेट सार्वजनिक आरोग्याशी निगडित झाली आहे. दररोजच्या आहाराचा अविभाज्य भाग असलेल्या दुधात रसायनांची भेसळ केल्याचे प्रकार सातत्याने समोर येत असून, याचा सर्वाधिक फटका लहान मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषतः मुलांमध्ये कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे, ही चिंतेची बाब मानली जात आहे. भेसळयुक्त दूध – आरोग्यावर गंभीर परिणाम राज्यात विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि आरोग्य खात्याच्या संयुक्त तपासणीत भेसळयुक्त दूधाचे नमुने आढळले आहेत. या दुधात डिटर्जंट, युरिया, स्टार्च, साबण, कृत्रिम रंग तसेच काही वेळा औद्योगिक रसायनांचाही वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे दूध नियमितपणे सेवन केल्यास पचनाच्या समस्या, त्वचेचे विकार, यकृत आणि मूत्रपिंडावर परिणाम तसेच दीर्घकाळात कर्करोगाचा धोका संभवतो. बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या शहरांतील काही शाळकरी मुलांमध्ये गेल्या काही वर्षांत कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीपत्रकांत नमूद आहे. यामागे दूषित दूध व दूधजन्य पदार्थांमधील भेसळ हे एक कारण असू शकते, असा संशय वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. कारवाई अपुरी, राजकीय आशीर्वादाचा आरोप या गंभीर समस्येमागे स्थानीक स्तरावर राजकीय पाठबळ लाभलेल्या दूध वितरण साखळ्यांचा हात असल्याचीही चर्चा आहे. भेसळ करणाऱ्या गटांवर वेळोवेळी छापे टाकले जातात, मात्र गुन्हेगारी स्वरूपाच्या या प्रकारांवर अद्याप ठोस आणि धडाकेबाज कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सामान्यांची मागणी – ‘शुद्धतेसाठी कठोर कायदा हवा’ ग्राहक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, दूध भेसळीविरोधात खास कायदा आणण्यात यावा, दोषींवर फक्त दंड नव्हे तर तुरुंगवासाची शिक्षा व्हावी. तसेच, दूधाच्या शुद्धतेबाबत नियमित तपासणी व अहवाल सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केला जावा, अशीही मागणी आहे. “भेसळीच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या आरोग्यावर होणारा धोका ही सामाजिक आपत्ती मानली पाहिजे,” असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले असून, या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आता अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे.

कोट्यवधी नागरिक रोज पितात विष; लहान मुलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचा संशय, राजकीय आशीर्वादाचीही चर्चा Read More »

नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

Devendra Fadanvis: अतिक्रमण काढण्यावरून काही दिवसापूर्वी नाशिकमध्ये दोन गटात वाद निर्माण होऊन काही भागात दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई सुरू केली असून आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीने दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर तेथील लोकांनी स्वतः अतिक्रमण काढून घेण्याचे सांगितले, अतिक्रमण काढण्याची सुरुवात देखील त्यांनी स्वतः केली होती. मात्र नाशिक दंगलमध्ये दिसणाऱ्या लोकांनी जाणीवपूर्वक दंगल केली, जाणीवपूर्वक दगडफेक केली, म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. अशी माहिती माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर दुसरीकडे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदी भाषेवरून निर्माण झालेल्या वादावर देखील भाष्य केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी भाषा कंपल्सरी आहे. ती सर्वांनी शिकली पाहिजे. त्या सोबत इतर भाषा शिकायची असेल तर शिकता येते.मराठीला कुणी विरोध केल्यास सहन करणार नाही. असं देखील माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती Read More »

एसटी कर्मचाऱ्यांच्या पी. एफ. गुंतवणुकीवरील 100 कोटी रुपये व्याज बुडीत

Maharashtra News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील ८७००० कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली १२४०कोटी रुपयांची रक्कम एसटीने पी. एफ.ट्रस्टमध्ये भरली नसल्याने गुंतवणुकीवरील अंदाजे १०० कोटी रुपये इतकी व्याजाची रक्कम बुडाली असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ व ग्र्याजुटीचे दोन स्वतंत्र ट्रस्ट असून ८७ हजार एसटी कर्मचारी व अधिकारी यांची भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची अंदाजे १२४० कोटी रुपये व उपदान म्हणजे ग्र्याजुटीची अंदाजे ११०५ कोटी रुपये इतकी रक्कम अशी मिळून अंदाजे २३४५ कोटी रुपयांची रक्कम फेब्रुवारी २४ पासून एसटीने दोन्ही ट्रस्टकडे भरणा केलेली नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली पी. एफ. ची रक्कम पीएफ ट्रस्टकडे भरणा केली जाते.व ट्रस्ट ही रक्कम गुंतवणूक करते.व त्यावरील येणाऱ्या व्याजातून कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर सदरची रक्कम ८.२५ टक्के इतक्या दराने परत करण्यात येते. पण गेले अनेक महिने एसटीने सदरची रक्कम गुंतवणूक केली नसल्याचे त्यावरील व्याज व चक्रवाढ व्याज बुडाले असून त्याचा फटका साहजिकच कर्मचाऱ्यांना बसणार आहे. संपा नंतर शासनाने नेमलेल्या त्रि सदस्यीय समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लागणारी पूर्ण रक्कम राज्य सरकार कडून एसटीला देण्यात येईल असे शपथपत्र न्यायालयात दिले आहे. पण त्यानंतर कधीही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. परिणामी पीएफ ट्रस्ट अडचणीत सापडली असून इ.पी. एफ. ओ. ऑफिसने काही नियम, अटी व शर्ती घालून सदर ट्रस्टला मान्यता दिली असून त्यांनी घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत आहे. इ. पी. एफ. ओ.ने ट्रस्टवर कारवाई केल्यास कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ शकते अशी शंकाही बरगे यांनी व्यक्त केली आहे. वर्षानुवर्षे पी. एफ. व ग्राजुटी ह्या दोन्ही ट्रस्ट अत्यंत चागल्या प्रकारे चालल्या असून इ .पी. एफ. ओ .ऑफिस सुद्धा एसटीची ट्रस्ट ही सर्वात चांगली ट्रस्ट असल्याचे सांगत आहे. पण शासनाच्या उदासीनतेमुळे ह्या दोन्ही ट्रस्ट अडचणीत आलेल्या आहेत. सुदैवाने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडे एसटीच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. आता यापुढे तेच एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंब प्रमुख झाले असून त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून सदरची रक्कम एसटीला व्याजासहित शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंतीही बरगे यांनी त्यांना केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पी. एफ. गुंतवणुकीवरील 100 कोटी रुपये व्याज बुडीत Read More »

आरोपींना अटक करा अन्यथा संपूर्ण राज्यात आंदोलन, सरकारला इशारा देते प्राजक्त तनपुरेंचे अन्नत्याग उपोषण स्थगित

Prajakt Tanpure : गेल्या महिन्यात राहुरीत महापुरुष पुतळा विटंबनाची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर या प्रकरणात आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं अन्नत्याग उपोषण सुरू होते. या उपोषणाला आता स्थगिती देण्यात आली आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शिष्टाईने हे उपोषण स्थगित करण्यात आलंय. आता आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे. 26 मार्च रोजी राहुरी शहरात दिवसाढवळ्या महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. घटनेला 20 दिवस उलटूनही आरोपीला अटक होत नसल्याने माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. तिसऱ्या दिवशी तनपुरे यांची प्रकृती खालावली आणि वजनही कमी झाल्याने उपोषणस्थळी सलाईन सुरू करण्यात आले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत पाजून हे उपोषण स्थगित करण्यात आले. काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पुतळा विटंबन प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधलाय. अलीकडच्या काळात सातत्याने राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या घटना घडत आहेत. सोलापूरकर, कोरटकर दोन्ही लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कशा पद्धतीने बोलले. हे सर्व सगळं जाणीवपूर्वक चाललं आहे. लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत. राहुरीची घटना याचाच भाग असावी अशीच वाटतेय. फोटो बघितल्यानंतर राहुरीत पुतळा विटंबन कुणी वेड्याने केले असे वाटत नाही, तर जाणीवपूर्व केल्याचे दिसत आहे. सरकारला लाज राहिली नाही अशी अवस्था आहे, अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

आरोपींना अटक करा अन्यथा संपूर्ण राज्यात आंदोलन, सरकारला इशारा देते प्राजक्त तनपुरेंचे अन्नत्याग उपोषण स्थगित Read More »

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश

Ram Shinde: पुढील महिन्यात दिनांक 31 मे, 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती येत असून त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे संपूर्ण देशभरातील पर्यटक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करेल, त्यांचे असामान्य कार्यकर्तृत्व सर्वांपर्यंत पोहचेल अशा श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. आज विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक आणि दूरदृष्यप्रणालीद्वारे नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.  श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, तसेच सर्व संबंधित विभागांची जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाचे सुशोभीकरण, त्यांनी संदेश दिलेल्या जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन संकल्पनांची जपणूक, चौंडी येथे देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी सुव्यवस्थित रस्ते, संग्रहालय, महादेव मंदिर आणि चौंडीश्वरी मंदिर जीर्णोध्दार, निवास व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ, स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थ यांची बाजारपेठ या सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात यावे, असे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आदेशीत केले.  या बैठकीत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना चौंडी येथे होणाऱ्या प्रस्तावित मंत्रीमंडळ बैठक आयोजनासंदर्भात महत्वपूर्ण सूचना दिल्या. अशा प्रकारे ग्रामीण ठिकाणी होणारी ही राज्य मंत्रीमंडळाची पहिलीच बैठक आहे. श्री क्षेत्र चौंडी विकास आराखडा हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असावा, तसेच सर्व संबंधित विभागांची जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावर चौंडी येथे बैठक घेऊन आराखड्याच्या कामास गती द्यावी, असेही यावेळी निश्चित करण्यात आले. बैठकीत प्रस्तावित आराखड्याबाबत स्थापत्य विशारद किरण कलमदानी यांनी सादरीकरण केले.

श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश Read More »

खासदार लंकेंच्या प्रयत्नांना यश, नगरच्या रेल्वेस्थानकासाठी 31 कोटींचा निधी मंजूर

Nilesh Lanke: अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अहिल्यानगर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 31 कोटी रूपयांचा निधी मंजुर केल्याची माहीती नगरचे खासदार नीलेश लंके यांनी दिली. केंद्र शासनाच्या आखत्यारित असलेल्या रेल्वेच्या विविध समस्यांवर खा. नीलेश लंके यांनी संसदेत आवाज उठविल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून अहमदनगर लोकसभा मतदार संघातील रेल्वेसंदर्भातील विकास कामांचा आढावा घेत कार्यवाही केली. त्यानंतर मतदारसंघातील स्थानकांचे सुशोभिकरण, आवष्यक तिथे उड्डाणपुल आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. यासंदर्भात खा. नीलेश लंके यांनी बोलताना सांगितले की सुशोभिकरणाच्या योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला असून ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकाचे आधुनिकिकरण, स्थानिक प्रवाशांच्या गरजा, नगर शहराची संस्कृती तसेच भविष्यकालिन वाहतूकीचा दृष्टीकोनाचाही त्यात विचार करण्यात आला आहे. काय सुविधा मिळणार ? नव्याने प्रशस्त प्रवासी प्रतीक्षायल, स्वच्छ व सुसज्ज स्वच्छतागृहे, लिफट, एस्केलेटर, फुड सुविधा, इंटरनेटसाठी वाय-फाय सुविधा, व्यवसायिकांसाठी बैठक कक्ष, रूफ प्लाझा, प्लॅटफॉर्म व सर्क्युलेटींग क्षेत्राचा पुनर्विकास, सौर उर्जा, पाणी पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन, स्थानिक कला व सांस्कृतीक मुल्यांची माहीती देणारे डिझाईन्स. लवकरच कामाला सुरूवात होणार नगर हे रेल्वेच्या दृष्टीने महत्वाचे स्टेशन असून रेल्वे स्थानकाच्या विकासामुळे तसेच इतर सुविधांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार असून यापुढील काळातही अत्याधुनिक रेल्वे सुविधा मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. या कामांसाठी आपण सातत्याने रेल्वेमंत्रालयाकडे पाठपुरावा केला असून लवकरच या कामांची अंमलबजावणी युध्दपातळीवर सुरू होईल अशी माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.

खासदार लंकेंच्या प्रयत्नांना यश, नगरच्या रेल्वेस्थानकासाठी 31 कोटींचा निधी मंजूर Read More »

नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच

Devendra Fadanvis: राज्यातील नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार सदस्यांना देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या तरतुदींस मान्यता देऊन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यापुर्वी नगराध्यक्षांना पदावरुन दूर करण्याच्या प्रक्रियेत निवडून आलेल्या सदस्यापैकी पन्नास टक्के सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जात असे. त्यानंतर शासनस्तरावर कार्यवाही अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची कार्यवाही केली जात असे. त्याऐवजी आता अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांना अधिकार दिले जाणार आहेत. त्यानुसार निवडून आलेल्या सदस्य संख्येपैकी दोन तृतीयांश संख्येने सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव पाठवला जाईल. ज्यावर जिल्हाधिकाऱ्यांना दहा दिवसांच्या आता विशेष सभा आयोजित करून मतदानाद्वारे निर्णय घ्यावा लागेल. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास तसेच त्यासाठीचा अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली.

नगर परिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच Read More »

संविधान बदलणार, हर्षवर्धन सपकाळांच्या दाव्याला सुजय विखेंचा उत्तर

Sujay Vikhe: देशात 2034 साली नवीन संविधान लागू करण्याची हालचाल सुरू असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सपकाळ यांच्या या दाव्यावर भाजपसह अनेक पक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर आता या प्रकरणात नगरचे माजी खासदार आणि भाजप नेते सुजय विखे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया देत काँग्रेसवर सडकून टीका केली. “काँग्रेसच्या सर्व नेत्यांचा विलाज केला पाहिजे. वारंवार पराभव झाल्यामुळे ते निराशेच्या तळाला गेले आहेत. त्यामुळे त्यांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे. मला वाटतं, त्यांना मानसिक आरोग्य केंद्रात काही दिवस पाठवायला हवे, म्हणजे ते बरे होतील आणि देशासाठी काहीतरी सकारात्मक करू शकतील,” अशा शब्दांत डॉ. विखे यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. डॉ. विखे पुढे म्हणाले, “संविधानाचा विषय आता फार जुना झाला आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार गेल्या दीड वर्षांपासून काम करत आहे. ना कुठल्याही संविधानात बदल झाला आहे, ना संविधानाला कुठलाही धक्का लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, तो संविधान पृथ्वीच्या अंतापर्यंत अबाधित राहील.” सपकाळ यांच्या विधानामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादळामुळे विरोधी पक्षांनी देखील या विषयावर अधिक माहितीची मागणी करत, सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, भाजपने सपकाळ यांच्या आरोपांना अफवा आणि दिशाभूल करणारे असल्याचे ठामपणे सांगितले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे नवीन संविधानाच्या चर्चेने पुन्हा एकदा रंग घेतला असला, तरी प्रत्यक्षात सरकारने यावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्यामुळे यापुढे या विषयावर काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संविधान बदलणार, हर्षवर्धन सपकाळांच्या दाव्याला सुजय विखेंचा उत्तर Read More »

भिक्षेकरू मृत्यू प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू; सुजय विखेंचा लंकेंना प्रत्युत्तर

Maharashtra Politics: अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान चार भिक्षेकरूंचा मृत्यू झाल्याच्या घटनेने मोठा राजकीय वाद निर्माण केला आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खासदार निलेश लंके यांनी या मृत्यूंना ‘बालहट्ट’ जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या मते, काही जणांच्या हट्टापायी या भिक्षेकरूंना आपला जीव गमवावा लागला. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुजय विखे म्हणाले, “जर खासदार लंके यांना माझ्याविषयी राग असेल, तर त्यांनी सरळ कोर्टात जावं आणि माझ्यावर गुन्हा दाखल करावा. मला त्याबद्दल काहीही हरकत नाही. जे काही झाले, ते सर्व न्यायालयाच्या आदेशानुसारच झाले आहे.” तसेच, त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “समाज आणि महिलांचे संरक्षण करणे हे माझं कर्तव्य आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत ते करत राहीन. मात्र, या गोष्टीचा सध्याच्या खासदारांशी कधीच संबंध आलेला नाही, त्यामुळे त्यांच्या कडून कुठलीही अपेक्षा नाही.” या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं असून, मृत्यू झालेल्या भिक्षेकरूंना न्याय मिळावा आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी योग्य चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

भिक्षेकरू मृत्यू प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू; सुजय विखेंचा लंकेंना प्रत्युत्तर Read More »

अजितदादा यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये रंगणार ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव

Ajit Pawar: हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त इतिहास, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दमदार प्रवास आणि समाजसुधारक महात्मा फुलेंच्या दिमाखदार कार्याचा पट उलगडणारा भव्य ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव जामखेडमध्ये रंगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या जयंतीचा त्रिवेणी मुहूर्त साधून येत्या 17 एप्रिलला संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केला जाणार आहे. ज्येष्ठ गायक आनंदजी शिंदे यांचा ‘शिंदेशाही बाणा’ आणि अभिजीत जाधव, अमु जाधव यांचा ‘शिव शंभो गर्जना’ हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असेल. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या पुढाकारातून हा महोत्सव आयोजित केला आहे. जामखेड महाविद्यालयाच्या आवारात आयोजिलेल्या या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होईल. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जेसाहेब यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती संध्या सोनवणे यांनी माध्यमांना दिली. 17 एप्रिल गुरुवारी सायंकाळी 6 वाजता अजित पवार यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होणार असून, त्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत शिंदे आणि जाधव यांच्या बहारदार गायनाची मैफल अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, असेही संध्या सोनवणे यांनी सांगितले. संध्या सोनवणे म्हणाल्या, ‘‘महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून, त्यांच्या आपुलकी वाढविण्यासाठी हा महोत्सव घेतला जातो. यंदाचे दुसरे वर्षे असून, त्यानिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्र येणार आहेत. ’’ सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक प्रवाहात समता, बंधुभाव आणि न्यायाची मूल्ये टिकवणे ही काळाची गरज बनली आहे. शिवछत्रपतींचा पराक्रम, महात्मा फुल्यांचे क्रांतिकारक विचार, शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे धोरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार यांचा वारसा अधिक ठामपणे पुढे नेण्याची गरज आहे. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून ‘शिव-फुले-आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवा’चे आयोजन आहे, असे संध्या सोनवणे यांनी सांगितले. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या माध्यमातून जामखेडमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार पहिल्यांदाच जामखेड येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात अजित पवार नेमके काय बोलणार, याकडे राजकीय वुर्तळाचे लक्ष राहणार आहे. त्यात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे उपस्थितीत राहणार असल्याची शक्यता आहे.

अजितदादा यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये रंगणार ‘शिव-फुले-आंबेडकर’ महोत्सव Read More »