DNA मराठी

Beed

img 20260821 wa0007

Tukaram Munde : FDA ची आष्टीत मोठी कारवाई; बनावट दुधासाठी वापरली जाणारी पावडर जप्त

Tukaram Munde : अन्न व औषधी प्रशासनात तुकाराम मुंढे यांची एन्ट्री झाल्यानंतर दूध, पनीर सह खाद्य पदार्थांमधील भेसळ चव्हाटायवर आली. या विभागाच्या कारवायांचा धडाका सुरू असताना आता पोलिसांनी देखील अन्न व औषधी प्रशासनासह आष्टीत बनावट दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरच्या 72 गोण्या जप्त केल्या आहेत. आष्टी ते जामगाव रस्त्यावर कारवाई करत पोलिसांनी दुधात भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 72 गोण्या व्हे पावडर आणि बोलेरो पिकअप जप्त केला आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांना ही बनावट दूध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. जामखेड भागातून पांढऱ्या रंगाच्या पिकअपमधून दुधात भेसळ करण्यासाठी लागणाऱ्या पावडरची अवैध वाहतूक केली जात असल्याचे समोर आले होते. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमोडे व त्यांच्या पथकाने आष्टी-जामखेड रस्त्यावरील एका लॉन्ससमोर सापळा रचला. संशयित बोलेरो पिकअप थांबवून वाहनाची झडती घेतली असता त्यात 25 किलो वजनाच्या 47 गोण्या आढळून आल्या. अधिक चौकशी केली असता त्याने यापूर्वीच 25 गोण्या आष्टी येथील हर्षद हॉटेलसमोर कैलास हंबडे यांच्याकडे ठेवल्याचे कबूल केले. पोलिसांनी तेथूनही 25 गोण्या जप्त केल्या. व्हे पावडर ही दुधाचे वजन (प्रमाण) वाढवण्यासाठी वापरली जाणारी स्वस्त दुग्धजन्य पावडर आहे. दुधाची गुणवत्ता चाचणी करण्यासाठीही तिचा वापर होतो. दुधापासून जेव्हा चीज किंवा पनीर बनवले जाते, तेव्हा उरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन करून व्हे पावडर तयार केली जाते. व्हे पावडर टाकल्यामुळे दुधातील फॅट न बदलता SNF चे प्रमाण वाढते. त्यामुळे भेसळयुक्त दूधही शासकीय चाचणीत ‘पास’ होते. 25 किलो वजनाच्या 47 गोण्या लक्ष्मण गोपाळघरे (चालक, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड), हरिदास एकनाथ गोपाळघरे (गाडी व मालाचा मालक, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड), कैलास हंबडे (माल खरेदीदार, रा. आष्टी) या तिघांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक शरद भुतेकर करत आहेत.

Tukaram Munde : FDA ची आष्टीत मोठी कारवाई; बनावट दुधासाठी वापरली जाणारी पावडर जप्त Read More »

sunetra pawar dcm

Sunetra Pawar: रात्री अकरापर्यंत बैठका अन् सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवार बीडसाठी ‘ॲक्शन मोडमध्ये

Sunetra Pawar: गुरुवारी रात्री अकरा वाजेपर्यंत प्रशासनाशी विकासकामांचा आढावा, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा, नागरिकांच्या अडचणी… आणि अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दाखल झाल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘ॲक्शन मोड’ने त्यांनी खऱ्या अर्थाने बीडचे पालकत्व स्वीकारल्याची भावना बीडकरांनी व्यक्त केली. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांनी स्वतःहून बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले होते. त्यानंतर ज्या झपाट्याने त्यांनी विकासकामांना गती दिली, मोठ्या निधीला मंजुरी मिळवून दिली आणि प्रशासनाला कामाला लावले, त्यामुळे बीडकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यांच्या अकाली निधनानंतर हा विकासाचा वेग कायम राहील का, सुरू असलेल्या कामांचे काय होईल, अशी चिंता बीडकरांच्या मनात होती. मात्र सुनेत्रा अजित पवार यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याने त्या चर्चांना नवी दिशा मिळाली आहे. गुरुवारी सलग बैठका घेऊन रात्री जवळपास अकरा वाजेपर्यंत विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी नागरिकांच्या अडचणीही ऐकून घेतल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सात वाजता जिल्हा रुग्णालयात पोहोचून आरोग्य सेवांची पाहणी, सुरू असलेल्या कामांचा आढावा आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या स्पष्ट सूचनांतून त्यांनी कामालाच सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संदेश दिला. बीडच्या विकासाचा धागा तुटू दिला जाणार नाही. सुनेत्रा पवार यांनी केवळ पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेली नाही, तर ती कृतीशील आणि परिणामकारक पद्धतीने पार पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे बीडकरांच्या अपेक्षांना पुन्हा नवी पालवी फुटल्याचे बोलले जात आहे. अजितदादा पवार यांनी दाखवून दिलेल्या विकासाच्या वाटेवर आता सुनेत्रा पवार त्याच तळमळीने पुढे जात असल्याचे चित्र या दोन दिवसांच्या दौऱ्यातून स्पष्टपणे समोर आले. त्यामुळे बीडच्या विकासाला पुन्हा वेग मिळेल, अशी आशा जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

Sunetra Pawar: रात्री अकरापर्यंत बैठका अन् सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवार बीडसाठी ‘ॲक्शन मोडमध्ये Read More »

vilas ghule case

Vilas Ghule : विलास घुले प्रकरणाला नवे वळण; उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

Vilas Ghule : केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, ज्याला वाचवण्यासाठी विलास घुले यांनी धाव घेतली होती, त्या उमेश मानेविरुद्ध आता अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धमकावल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घडामोडीमुळे संपूर्ण प्रकरणाचा तपास नव्या दिशेने सुरू झाला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, उमेश माने याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करून त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तो वारंवार तिचे ब्लॅकमेलिंग करत होता. त्रास असह्य झाल्यानंतर महिलेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीय पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना त्यांना धमकावून परावृत्त करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. महिलेने केलेल्या आरोपानुसार, त्यानंतरही तिचा छळ सुरूच राहिला. विलास घुले आणि उमेश माने हे वारंवार घराजवळ येऊन धमक्या देत होते. अखेर संबंधितांना समजावून सांगण्यासाठी दोन्ही बाजूंची भेट झाली. मात्र, तेथे झालेल्या हाणामारीत विलास घुले यांचा मृत्यू झाला. पीडित महिलेच्या कुटुंबाने हा प्रकार स्वसंरक्षणात घडल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या प्रकरणात यापूर्वीच अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने तपासाचे स्वरूप अधिक व्यापक झाले असून, पोलीस सर्व आरोपांची सखोल चौकशी करत आहेत.

Vilas Ghule : विलास घुले प्रकरणाला नवे वळण; उमेश मानेविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल Read More »

dhananjay munde

Dhananjay Munde : नोकरीच्या आमिषाने म्यानमारमध्ये ओलिस ठेवलेल्या तरुणांची सुटका करा

Dhananjay Munde : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील नांदूर घाट येथील रहिवासी स्वप्नील काळुंके यांसह अनेक तरुणांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून म्यानमार – थायलंड सीमेवर एका छळ छावणीत ओलिस ठेऊन त्यांच्या कडून जबरदस्तीने सायबर गुन्हे घडवले जात असल्याचे समोर आले असून, या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेत केंद्र सरकारच्या मदतीने या सर्व तरुणांची सुखावून सुटका करावी, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी लेखी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महोदयांची विधानभवन येथे भेट घेत विनंतीचे पत्र दिले आहे. बीड जिल्ह्यातील स्वप्नील काळुंके सह महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे २०-२५ तरुण तर देशातून तब्बल ७००-८०० तरुण म्यानमार – थायलंड सीमेवरील गोल्डन ट्रँगल नामक छळछावणीत ओलिस असून त्यांना शारीरिक यातना देऊन त्याच्याकडून सायबर गुन्हे घडवले जात असल्याची तक्रार बीड सायबर पोलिसात दाखल करण्यात आलेली आहे, तसेच याप्रकरणी तपासाची चक्रे थेट देशाच्या गुप्तचर विभागापर्यंत पोचले असून, आपला बचाव व सुटका होण्यासाठी ही सर्व तरुण प्राणांची बाजी लावत असून सध्या ते मृत्यूच्या दाढेत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तातडीने लक्ष घालून केंद्र सरकार तसेच विदेश मंत्रालयाची मदत घेऊन या तरुणांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रयत्न सुरू करावेत तसेच मोठ्या पगाराचे आश्वासन देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळे विणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी तस्करी करणाऱ्या या टोळीतील महाराष्ट्रामध्ये सक्रिय असणाऱ्या एजंटांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Dhananjay Munde : नोकरीच्या आमिषाने म्यानमारमध्ये ओलिस ठेवलेल्या तरुणांची सुटका करा Read More »

pankaja munde

Pankaja Munde : चुकीच्या मार्गाने पैसा कमविले तर…, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावलं

Pankaja Munde : बीडच्या अंबाजोगाई येथे संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावलं आहे. चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा थेट तुरुंगातच असते, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. अंबाजोगाई आणि परळी येथील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी हे कार्यालय सुरू करण्यात आल्याचं सांगताना, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला दिला. “ज्याची ऐपत दहा पैशांची आहे, त्याने पंधरा पैसे कमवा… पण चुकीच्या मार्गाने शंभर रुपये कमवण्याचा प्रयत्न केला तर त्याची जागा तुरुंगातच आहे,” असं त्या म्हणाल्या. तसेच, “मला चुकीची कामं सांगू नका… घरात पैसे कुठून येतात, याचा हिशोब ठेवा,” असा सज्जड दमही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. राजकारणातील कारस्थानांवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “जो माझ्यासोबत कारस्थान करतो, तो कुठे असतो हे तुम्हाला माहित आहे… माझ्या मनात पाप नाही, देवाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे.” निवडणुकीतील पराभवाचं उदाहरण देत त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देताना सांगितलं की, राजकारणात पराभव होत असतो, पण चुकीचं वागणारे लोक नकाशावरून गायब होतात.

Pankaja Munde : चुकीच्या मार्गाने पैसा कमविले तर…, पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावलं Read More »

sursh dhash

Suresh Dhas : बीड जिल्ह्यात धो धो पाऊस; कडा शहर पाण्याखाली, 11 जणांना हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी हलवलं

Suresh Dhas : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून देवळाली गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल आहे. दरम्यान, आष्टी तालुक्यातील कडा येथे नदीपात्रा शेजारी सापते कुटुंबातील अकरा जण अडकले होते. तसेच शेरी खुर्द येथील काही जण पुरात अडकले होते. त्यांना तातडीने बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून हेलिकॉप्टरची सोय करून सुरक्षित बाहेर काढले आहे. दुसरीकडे, बीड- अहिल्यानगर महामार्गावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. कडा शहर परिसरातील ग्रामीण भागात नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि याचेच पाणी शहरांमध्ये शिरल्याने अनेक कुटुंब पाण्यात आहेत. 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच कडा शहर पाण्याखाली आले आहे. दरम्यान ही परिस्थिती पाहता NDRF च्या टीमला पाचरण केले जात आहे. तर अनेक ठिकाणच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. बीड जिल्ह्यातील सुलेमान देवळा, दौलावडगाव सह परिसरातील 30 गावांचा संपर्क तुटलाय. सततच्या पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहतायत. तर अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. बीड अहिल्यानगर महामार्गावरील धानोरा येथील कांबळी नदीला पूर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान ही परिस्थिती पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस यांच्यासह तहसील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कडा, परिसरात चोभा निमगाव, धामणगाव, दादेगाव, देविनिमगाव, शेरी, फत्तेवाडगाव, नांदा, रुईनालकोल, या गावांत पाणी शिरलं असून गावचा संपर्क तुटला आहे. मात्र, सर्व प्रशासनिक पातळीवर आमदार धस यांचं लक्ष असून ते स्वतः लोकांना वाचवण्यासाठी आपल्या साथीदारांसह मैदानात उतरलेले आहेत. 11 जणांना हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी हलवलं असून इतरांनाही सुरक्षित बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. कुणाच्याही जीवाला धोका होणार नाही. घाबरू नका असं आवाहन सुरेश धस यांनी केलं आहे.

Suresh Dhas : बीड जिल्ह्यात धो धो पाऊस; कडा शहर पाण्याखाली, 11 जणांना हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी हलवलं Read More »

beed

Beed News: बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा आणखी एक प्रताप, शिक्षा झालेल्या कैद्याकडून करून घेतले वैयक्तिक कामे

Beed News : बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एकेक धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. वाल्मिक कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट, अनाधिकृत वृक्षतोड, यानंतर आता शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून जेलरचे वाहन धुतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून घरातील कामे, वाहनही धुवून घेतले असल्याचे उघड झाले आहे. त्याचाच एक व्हिडिओ समोर आला असून कैद्याकडून वैयक्तिक कामे करून घेतल्याने गायकवाड अडचणीत सापडले आहेत. यापूर्वीही गायकवाड यांचे जळगावला असताना निलंबन झाले होते. कैद्यांचे हक्क आणि संरक्षणाचे काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Beed News: बीड जिल्हा कारागृहातील जेलरचा आणखी एक प्रताप, शिक्षा झालेल्या कैद्याकडून करून घेतले वैयक्तिक कामे Read More »

Devendra Fadanvis

मालमत्ता जप्त करा अन् आरोपींवर कारवाई करा; बीड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री फडणविसांचे आदेश

Devendra Fadnavis: बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत असून आता या प्रकरणात आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ठेवीदारांना न्याय देण्यासाठी बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संबंधित आरोपींवर तत्काळ कारवाई करावी. तसेच सोसायटीच्या उर्वरित 235 मालमत्ता तातडीने जप्त करण्याचे, निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटीने ठेवींवर 10 ते 18 टक्के व्याजदराचे आकर्षण ठेव योजनांचे आमिष दाखवून ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित पोलीस, विशेष तपास यंत्रणांना गतीने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. बैठकीला पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, पणन मंत्री जयकुमार रावल, मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार प्रकाश सोळंके, अर्जुन खोतकर, सुरेश धस, संतोष दानवे, सुभाष देशमुख, विजयसिंह पंडित उपस्थित होते.

मालमत्ता जप्त करा अन् आरोपींवर कारवाई करा; बीड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री फडणविसांचे आदेश Read More »

Ajit Pawar

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाकारली सुरेश धसांची भेट,नेमकं कारण काय?

Ajit Pawar: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे यांच्यावर अनेकगंभीर आरोप केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार सुरेश धस यांची भेट नाकारली आहे. आमदार सुरेश धस आज अजित पवारांची भेट घेणार होते मात्र अजित पवारांनी भेट नाकारली आहे. त्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. माहितीनुसार, सुरेश धस या भेटीमध्ये 2019 पासून ते 2024 पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते मात्र आज त्यांना अजित पवारांची वेळ मिळाली नाही. तर दुसरीकडे अजित पवार यांनी चौकशी समितीला फक्त 2023-2024 या आर्थिक वर्षाची जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना 2019 ते 2023 काळात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यामुळे अजित पवार यांची भेट घेऊन सुरेश धस चौकशीची मागणी करणार होते.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाकारली सुरेश धसांची भेट,नेमकं कारण काय? Read More »

Ajit Pawar On Dhananjay Munde

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा

Ajit Pawar On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधाडून आरोप- प्रत्यारोप सुरू आहे. तर दुसरीकडे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना थेट धनंजय मुंडे यांच्यासमोर अजित पवारांनी सर्वांना इशारा दिला आहे. आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलावलं असून त्यांना आता माझ्या पद्धतीने सांगणार आहे. कोणत्याही अफवावंवर विश्वास ठेऊ नका आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो, जर कोणी कुठल्या गोष्टीत जबाबदार असेल, जर कुणी वेडेवाकडे प्रकार केले असतील, विकासाची कामं करताना कुणी कुणाला खंडणी मागितली तर मी मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. मी टोकाची भूमिका घेईन. असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जनतेचा पैसा सत्कारणी लागलाच पाहिजे. त्या ठिकाणी कोणतीही गडबड होता कामा नये. जिल्ह्यासाठी केंद्राचा निधी कसा जास्त आणता येईल, यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहे. मी पहिल्यांदाच पालकमंत्री या नात्याने बीड जिल्ह्यामध्ये आलो आहे. असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा Read More »