DNA मराठी

ahmednagar news

summer

Ahilyanagar Temperature : जिल्ह्यातील तापमानात वाढ…उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Ahilyanagar Temperature : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान उष्ण व दमट राहील. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी कोरडे हवामान वर्तविण्यात आले असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानात काही प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानवी व प्राण्यांच्या आरोग्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. उष्माघाताची लक्षणे दिसताच नागरिकांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी १०७७, १०२, १०४, १०८ व ११२ या क्रमांकांवर संपर्क करावा. नागरिकांनी तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून ओ.आर.एस., लस्सी, ताक, कैरीचे पन्हे व लिंबू पाण्याचा नियमित वापर करावा. दुपारी बारा ते तीन वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री वा टोपीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाकावा. गडद, घट्ट व जाड कपड्यांऐवजी हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी नेहमी सोबत ठेवावे. अशक्तपणा, डोकेदुखी व सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या लाटेची माहिती मिळवण्यासाठी रेडिओ, टी.व्ही. व वर्तमानपत्रांचा वापर करावा. उन्हात अतिकष्टाची व शारीरिक श्रमाची कामे करू नयेत. कामगारांनी उन्हात काम करताना डोक्यावर पांढरा रुमाल बांधावा. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्याबाबत कामगारांना सूचित करावे. कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त काम उरकून घ्यावे व उन्हात काम करताना थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी. गरोदर स्त्रिया व आजारी कामगारांची विशेष काळजी घ्यावी. घरे थंड ठेवण्यासाठी व घरात थेट सूर्यप्रकाश येऊ नये म्हणून पडदे, झडपा, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे व ओले कपडे वापरून वेळोवेळी थंड पाण्याने स्नान करावे. उन्हाळ्याच्या काळात शक्यतो स्वयंपाक करणे टाळावे व मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात. दारू, चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेये घेणे टाळावे. तसेच उच्च प्रथिनयुक्त आहार व शिळे अन्न खाऊ नये. गुरांना व पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवून वेळेवर पुरेसे पाणी द्यावे. उन्हापासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल याची दक्षता घ्यावी. लहान मुलांना व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. नागरिकांनी या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही गिते यांनी केले आहे.

Ahilyanagar Temperature : जिल्ह्यातील तापमानात वाढ…उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन Read More »

BJP

Pune News: भाजप पदाधिकाऱ्यांवर वसुली व धमकीचे आरोप, ऑडिओ क्लिपमुळे खळबळ

Pune News : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात भाजपच्या महिला पदाधिकारी आशा बुचके यांच्यावर वसुली आणि धमकी दिल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुचके यांनी एका युवकाला पैशासाठी धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवकाला विश्रामगृहात बोलावून अपमानास्पद व धमकीची भाषा वापरल्याचे या ऑडिओत ऐकू येत आहे. यामुळे त्या लोकप्रतिनिधी आहेत की दबाव टाकणाऱ्या टोळीप्रमाणे वागत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तक्रारदार रोशन बिरमल यांनी आरोप केला आहे की, त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये बोलावून जबरदस्तीने चेक घेण्यात आला. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे आशा बुचके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर धक्काबुक्कीचे आरोप झाले होते. दरम्यान, या प्रकरणी युवकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक राजकारणात तणाव निर्माण झाला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune News: भाजप पदाधिकाऱ्यांवर वसुली व धमकीचे आरोप, ऑडिओ क्लिपमुळे खळबळ Read More »

img 20260401 wa0002

Devendra Fadnavis : मजबूत नेतृत्व की ढासळती प्रतिमा?

Devendra Fadnavis: राज्यकारभारात नेतृत्वाची खरी कसोटी ही केवळ विकासकामांत किंवा राजकीय यशात नसते ती कायदा-सुव्यवस्थेच्या काटेकोर अंमलबजावणीत आणि समाजातील न्यायभावनेच्या जपणुकीत असते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दुहेरी भूमिकेत काम करताना प्रशासनावर मजबूत पकड असल्याचे अनेकदा सिद्ध केले आहे. काही बाबतींत त्यांच्या कार्यशैलीची तुलना शरद पवार यांच्या प्रभावी प्रशासकीय वारशाशी केली जाते. मात्र, अलीकडच्या काळात राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारी आणि त्याला मिळणारे कथित राजकीय संरक्षण हा चिंतेचा विषय बनत आहे. कायद्याचे राज्य टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांची भूमिका निष्पक्ष आणि कठोर असणे अपेक्षित असते. परंतु जेव्हा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना राजकीय पाठबळ मिळाल्याची भावना जनमानसात निर्माण होते, तेव्हा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होऊ लागतो. गुन्हेगारीचा प्रश्न केवळ कायदा आणि सुव्यवस्थेपुरता मर्यादित राहत नाही; तो सामाजिक आणि नैतिक संरचनेलाही बाधा पोहोचवतो. विशेषतः जात आणि धर्म यांच्या नावाखाली जेव्हा गुन्हेगारी कृत्यांचे समर्थन केले जाते, तेव्हा परिस्थिती अधिक गंभीर बनते. समाजातील काही घटकांकडून धार्मिकतेचा आडोसा घेत नेतृत्व करण्याचा प्रयत्न आणि त्याचवेळी गुन्हेगारीकडे दुर्लक्ष किंवा समर्थन दिसून येणे, ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्यावर अधिक जबाबदारी येते. त्यांची प्रशासनातील कडक प्रतिमा आणि निर्णयक्षमता यामुळेच जनतेने त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला ती कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक छत्राखाली असो, निर्भीडपणे आळा घालणे अत्यावश्यक ठरते. प्रतिमा ही केवळ प्रचारातून घडत नाही; ती कृतीतून दृढ होते. आज राज्यासमोर उभ्या असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर कठोर, पारदर्शक आणि पक्षनिरपेक्ष कारवाई हीच प्रशासनाची खरी ओळख ठरू शकते. अन्यथा, सक्षम नेतृत्वाची ओळख असलेली प्रतिमाही काळाच्या ओघात धूसर होण्याचा धोका नाकारता येणार नाही. म्हणूनच, सत्तेची ताकद आणि जबाबदारी यांचा समतोल राखत कायद्याचे राज्य अबाधित ठेवणे, हीच आजच्या नेतृत्वापुढील खरी परीक्षा आहे.

Devendra Fadnavis : मजबूत नेतृत्व की ढासळती प्रतिमा? Read More »

acid attack

Sangamner News : ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे ११ वर्षीय मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या घटनेच्या अनुषंगाने “पीडितांना नुकसानभरपाई देण्याबाबत योजना, २०२२” अंतर्गत पीडितेला ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या निर्देशानुसार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी संबंधित समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पीडितेच्या आईच्या बँक खात्यात तात्काळ १ लाख रुपयांची आर्थिक मदत जमा करण्यात आली. त्यानंतर दिनांक २४ मार्च २०२६ रोजी समितीची पुढील बैठक घेण्यात आली. या बैठकीत परिवीक्षा अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या गृह चौकशी अहवालाचे परीक्षण करून पीडितेच्या आईच्या खात्यात अतिरिक्त २ लाख रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे या प्रकरणात पीडितेला एकूण ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य मंजूर करून वितरित करण्यात आले.

Sangamner News : ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितेला आर्थिक साहाय्य मंजूर Read More »

raj thackeray

Raj Thackeray on Ashok Kharat : कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले

Raj Thackeray on Ashok Kharat : संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? असा प्रश्न विचारला आहे. या प्रकरणात राज ठाकरे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, ‘कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र’ हा प्रश्न पडतो.  ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा ‘गीतारहस्य’ सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब ‘तीर्थ’ प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.  महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.  हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही. आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे. आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे.  या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं.  गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.  पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की.  राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल. माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.

Raj Thackeray on Ashok Kharat : कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले Read More »

Crime

Pune Crime: समलैंगिक संबंधांना विरोध अन् 22 वर्षीय तरुणाने दोन अल्पवयीन मुलांची केली हत्या…

Pune Crime: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावात १७ मार्चला १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलाची हत्या झाली होती . ही हत्या अक्षय दत्तात्रय मांजरे या २२ वर्षांच्या तरुणाने समलैंगिक संबंधना विरोध केल्याने केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. मात्र या हत्येचा तपस करताना आरोपी अक्षय मांजरेने मागीलवर्षी २१ जूनला अशाचप्रकारे समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने ११ वर्षांच्या मुलाची देखील हत्या केली होती असं तपासात उघड झालंय. विशेष म्हणजे या दोन्ही हत्या केल्यानंतर आरोपी अक्षय मांजरे हा त्याठिकाणी गर्दीचा भाग म्हणून उभा होता. २१ जून २०२५ ला त्याने समलैंगिक संबंधांना विरोध करणाऱ्या ११ वर्षाच्या मुलाचा डोक्यात दगड घालून खून केला मात्र त्या हत्येचा तपास पोलिसांनी व्यवस्थित केला नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे. अक्षय मांजरेवर संशय असल्याने त्याची जुजबी चौकशी करून त्यावेळी त्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर १७ मार्च २०२६ ला त्याने पुन्हा १२ वर्षाच्या एका मुलावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याही मुलाने विरोध केल्याने अक्षय मांजरेने त्याचाही डोक्यात दगड घालून खून केला. या दोनाही हत्या करून आपला त्या हत्येनशी कोणताही संबंध नाही हे दाखवण्यासाठी तो तपासासाठी पोलीस घटनास्थळी आल्यानंतर तिथे उपस्थित राहत होता. अखेर पोलिसांनी गावातील अनेकांची कसून चौकशी करायचं ठरवलं त्यावेळी अक्षय मांजरेच्या सांगण्यामध्ये पोलिसांना विसंगती जाणवू लागली आणि या दोन हत्येंचा उलगडा झाला.

Pune Crime: समलैंगिक संबंधांना विरोध अन् 22 वर्षीय तरुणाने दोन अल्पवयीन मुलांची केली हत्या… Read More »

Rain

IMD Rain Alert: 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस

IMD Rain Alert : 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

IMD Rain Alert: 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस Read More »

sunil tatkare

Sunil Tatkare: दिवंगत अजित पवारांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी ऑडिओ, व्हिडिओ क्लिप; कडक कारवाई करणार; सुनिल तटकरेंचा इशारा

Sunil Tatkare: काही स्वार्थी व्यक्ती राजकीय आणि सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी दिवंगत अजित पवारांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी विधाने पसरवत आहेत. हे कृत्य अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा असून संबंधित व्यक्तींनी अशा एआय उत्पन्न बनावट व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्सचे वितरण त्वरित थांबवावे अन्यथा त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दादांबद्दल आदर, प्रेम आणि विश्वासाची भावना आहे. त्या भावनेचा गैरफायदा घेऊन, लोकांमध्ये आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा हा घातक प्रयत्न आहे. मृत नेत्याची प्रतिमा अशा प्रकारे वापरणे हे अत्यंत नीच आणि निंदनीय कृत्य आहे. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी सायबर कायदे आणि इतर लागू कायद्यांनुसार खटले दाखल करण्यास पक्ष वचनबद्ध आहे असेही सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान अशा कोणत्याही संशयास्पद ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले आहे. दिवंगत अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने खोटा प्रचार करणे हे सामाजिक हितासाठी हानिकारक आहे आणि लोकशाही मूल्यांवर आघात करणारे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा सर्व कृत्यांचा तीव्र निषेध करतो आणि जबाबदार असलेल्यांनी या कृती तात्काळ थांबवाव्यात अशी मागणीही सुनिल तटकरे यांनी केली आहे.

Sunil Tatkare: दिवंगत अजित पवारांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी ऑडिओ, व्हिडिओ क्लिप; कडक कारवाई करणार; सुनिल तटकरेंचा इशारा Read More »

rajya sabha election

Rajya Sabha Election : 10 राज्यांमधील 37 जागांसाठी राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; शरद पवारांना पुन्हा संधी?

Rajya Sabha Election : निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 जागांसाठी राज्यसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि बिहारमधील रिक्त राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी पाच जागांसाठी निवडणुका होणार आहेत. तामिळनाडूमधील सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. शरद पवार, रामदास आठवले, कनिमोझी, तिरुची शिवा आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे 26 फेब्रुवारी रोजी अधिसूचना राज्यसभेच्या 37 जागांसाठी अधिसूचना 26 फेब्रुवारी रोजी जारी केली जाईल. उमेदवार 5 मार्चपर्यंत नामांकन दाखल करू शकतील. 6 मार्च रोजी छाननी सुरू होईल आणि 9 मार्चपर्यंत उमेदवार आपले नामांकन मागे घेऊ शकतील. त्यानंतर 16 मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2026 आहे. शरद पवारांना पुन्हा संधी? शरद पवार यांचा देखील राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाळ संपत असल्याने त्यांना पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस शरद पवार यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचे 46 आमदार असून एका जागेसाठी 41 आमदारांची आवश्यकता आहे. राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे: अधिसूचना: 26 फेब्रुवारी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख: 5 मार्च नामांकनांची छाननी: 6 मार्च मागे घेण्याची शेवटची तारीख: 9 मार्च मतदान: 16 मार्च 2026, सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. मतमोजणी: 16 मार्च 2026 आसाममधील तीन, बिहारमधील पाच, महाराष्ट्रातील सात, ओडिशातील चार, तामिळनाडूतील सहा आणि पश्चिम बंगालमधील पाच जागांसाठी मतदान होईल.

Rajya Sabha Election : 10 राज्यांमधील 37 जागांसाठी राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; शरद पवारांना पुन्हा संधी? Read More »

congress

Maharashtra Congress: प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची आज टिळक भवनमध्ये संयुक्त बैठक; मोठा निर्णय होणार?

Maharashtra Congress : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष यांची काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत ‘संघटन सृजन अभियान’ या विषयावर काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय वॅार रूमचे प्रमुख खा. शशिकांत सेंथिल मार्गदर्शन करणार आहेत तर ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर हे ‘काँग्रेसने विचारधारेचे राजकारण का केले पाहिजे?’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर हे ‘महाराष्ट्राची बदलती राजकीय संस्कृती’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या बैठकीस प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांच्याशिवाय इतरांना प्रवेश नाही, अशी माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

Maharashtra Congress: प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची आज टिळक भवनमध्ये संयुक्त बैठक; मोठा निर्णय होणार? Read More »