Sujay Vikhe : अहमदनगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या सुमारे १५ को.प. बंधारे आणि गे.सी. बंधारे योजनांना महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी या योजनांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. आज त्या प्रयत्नांना आणि वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आनंद वाटत असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
या योजनांच्या कामासाठी भरीव निधी मंजूर झाला असून मृद व जलसंधारण विभागाच्या सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित कामाप्रित्यर्थ सुमारे ८.५ कोटी रुपये व अनुषंगिक खर्चासाठी ६५ लक्ष रुपये अशा एकूण अंदाजित ९.५ कोटी रुपयांच्या किमतीस मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
तसेच सदर योजनांच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार या बंधाऱ्यांची एकूण साठवण क्षमता ५३०.२८ स.घ.मी. असून नियोजित एकूण सिंचन क्षमता १९६ हेक्टर इतकी असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले.
या योजनेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून यापैकी नगर तालुक्यात दोन, पाथर्डी-५, पारनेर-२, श्रीगोंदा-३ आणि शेवगाव, जामखेड आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एका जागेची अशा एकूण १५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
दरम्यान खासदार विखेंनी सदरील भरीव रकमेस मान्यता मिळवून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.