Dnamarathi.com

Sujay Vikhe News: स्वयंरोजगारातून व आर्थिक दृष्टीकोनातून महिलांचे सक्षमीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने काम करत असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

खासदार विखे म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने बचत गटातील महिलांना फूड प्रोसेसिंग व स्टॉल वाटप करण्यात आले आणि या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले. पालकमंत्र्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

कनगर (ता.राहुरी) येथील आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान प्राथमिक स्वरूपात महिला बचत गटांना धनादेश, स्टॉल तसेच फूड प्रोसेसिंग साहित्याचे वितरण करण्यात करण्यात आले. 

महिला व बालविकास विभाग आणि ग्रामविकास व जलसंधारण विभाग नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत प्रतिभा लोकसंचित साधन केंद्र व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष राहुरी अंतर्गत आणि ग्रामीण स्वंयरोजगार निर्मिती अंतर्गत स्वंयरोजगार विक्रीकेंद्र, फूड प्रोसेसिंग युनिट, औजार बँक, गटातील महिलांना बँक कर्ज वितरण सोहळा खासदार डॉ. सुजयविखे पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न झाला.

दीड दोन वर्षांपूर्वी आलेल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आपण प्रामाणिक आणि नैतिकतेने तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात कामाचा सपाटा सुरू केला आहे.

 आजपर्यंत जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून 500 बचत गटांना स्वयंरोजगारासाठी विविध साहित्यांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक उपक्रम आज जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत व सदरील उपक्रमांच्या अंतर्गत विविध बचत गटांच्या माध्यमातून प्रत्यक्षात कामे देखील चालू आहेत. यातून अनेक रोजगाराच्या संधी महिलांना उपलब्ध होत आहेत याचे विशेष समाधान वाटते असे मत सुजय विखेंनी यावेळी मांडले.

या अगोदर अनेक पालकमंत्री झाले, पण नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे पहिले असे पालकमंत्री आहेत की ज्यांच्या प्रयत्नांनी डीपीडीसीच्या माध्यमातून पैशाचा वापर महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांना रोजगार मिळवण्यासाठी करण्यात आला. विशेष बाब म्हणजे सुमारे 500 गटातील महिलांना दहा लाख रुपयांचे साहित्य वाटप होत आहे. ही वाटचाल अशीच सुरू राहील आणि पुढील पाच वर्षात संधी भेटल्यास महिलांना अनेक रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही खासदार विखे यांनी दिली. 

तसेच महिलांना कांदा ड्रायर उपलब्ध करून देणार व सडका कांदा घरपोच देऊन त्याचे प्रोसिजर करून तोच कांदा आपण परत घेऊ. अशा पद्धतीने प्रत्येक बचत गटातील महिलांना महिना दहा ते बारा हजार रुपये कमाई चालू होईल असे देखील मत त्यांनी मांडले. यासोबतच निळवंडेच्या पाण्यापासून गावांच्या रस्त्यापर्यंत दिलेल्या शब्द देखील आम्ही पूर्ण केला असल्याचे मत डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *