DNA मराठी

Manikrao Kokate : हजारो विद्यार्थ्यांना दिलासा, कृषीपदवी अभ्यासक्रम प्रवेश अटीत शिथिलता

manikrao kokate

Manikrao Kokate : कृषी विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विशिष्ट गुणांची अट शिथिल करत खुल्या प्रवर्गासाठी ४५ टक्के आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४० टक्के गुण आवश्यक असल्याचा बदल करण्यात आला आहे. कृषी पदवीच्या संधीपासून इच्छुक विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेतल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.

कृषी विद्यापीठातील बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, उद्यानविद्या, बीएफएससी, वनशास्त्र, बी.टेक. कृषी अभियांत्रिकी, अत्रशास्त्र, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व सामुदायिक विज्ञान अशा एकूण ९ पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आतापर्यंत खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी इ.१२वी (विज्ञान) मध्ये ५०% गुणांची अट होती. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची ११८वी बैठक नुकतीच पार पडली, याबैठकीत सदर अट शिथिल करत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५% आणि आरक्षित प्रवर्गासाठी ४०% गुणांची अट लागू करण्यात आली आहे.

तसेच प्रवेश अर्जासाठी अंतिम मुदत २७ जुलै २०२५ पर्यंत असून इच्छुक विद्यार्थ्यांनी https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

12वीचे टक्के कृषीमुळे वाढणार

केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इ.१२ वी (विज्ञान) अभ्यासक्रमात ‘कृषी (८०८)’ हा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी पदवी प्रवेशात अधिभार मिळत नव्हता. आता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या ११५ व्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार या विषयाला १० गुण अधिभार देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे.

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात आणण्यासाठी सकारात्मक पाऊल असून प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचा आनंद आहे, असा विश्वास मंत्री कोकाटे यांनी यांनी व्यक्त केला.