DNA मराठी

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा अर्ज दाखल

Ravindra Chavan : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदाची विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. युवा मोर्चाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय प्रवास सुरु केलेल्या चव्हाण यांना संघटनेच्या कामाचा मोठा अनुभव असल्याने ते प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ताकदीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेचे अधिवेशन आज 1 जुलै रोजी वरळी येथे होणार असून या अधिवेशनात प्रदेशाध्यक्षपदाच्या नावाची घोषणा होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या 3 वर्षांत प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली आहे. बावनकुळे यांनी संघटनेच्या केलेल्या बांधणीमुळेच विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, मुंबई भाजपा अध्यक्ष तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, ज्येष्ठ नेते भाई गिरकर, आ. सुनील कांबळे, आ. उमा खापरे, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ आदींनी चव्हाण यांच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केले. केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री व या निवडणुकीसाठीचे निरीक्षक किरेन रिजिजू, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी खा. अरुण सिंह यांच्याकडे श्री. चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती हेही यावेळी उपस्थित होते.

संघटन पर्वा अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर पक्षाच्या 80 संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यापाठोपाठ मंडल अध्यक्षांच्या निवडी झाल्या. प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय परिषद व राज्य परिषद सदस्य निवडणुकीचा कार्यक्रम 28 जून रोजी घोषित करण्यात आला. त्यानुसार 30 जुलै रोजी प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *