Ratan Tata: रतन टाटा उद्योगविश्वातील मोठं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरलीय 1991 ते 2012 या काळात रतन टाटा स्वतः टाटा समुहाचे चेअरमन राहिले. या काळात त्यांनी उद्योग विश्वात अनेक किर्तीमान स्थापन केले. त्यांनी टाटाला इंटरनॅशनल बँड म्हणून विकसित केलं.
देशातील सर्वाधिक लोकप्रिय उद्योजक आणि अब्जाधीश रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. 1991 ते 2012 या काळात रतन टाटा हे टाटा ग्रुपचे चेअरमन होते. या काळात त्यांनी उद्योग क्षेत्रात अनेक किर्तीमान स्थापित केले. टाटा समुहाला त्यांनी एक वेगळं स्थान प्राप्त करून दिलं त्याचबरोबर एक उदारवादी माणूस म्हणूनही त्यांनी नाव मिळवलं. हेच कारण आहे की देशातील अगदी लहान व्यापारी असो की मोठा उद्योजक किंवा उद्योग विश्वात दाखल होणारा प्रत्येक जण रतन टाटांना आपला आदर्श मानतो.
रतन टाटा सन 1962 मध्ये टाटा इंडस्ट्रीमध्ये सहायक म्हणून सहभागी झाले होते. नंतर त्याच वर्षात टाटा इंजिनीरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनीच्या जमशेदपूर युनिटमध्ये सहा महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं. विविध कंपन्यांत काम केल्यानंतर 1971 मध्ये नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे प्रभारी निदेशक म्हणून रतन टाटा यांची नियुक्ती करण्यात आली. 1981 मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.
सन 1991 ते 28 डिसेंबर 2012 रोजी सेवा निवृत्तीपर्यंत रतन टाटा हे टाटा सन्स या कंपनीचे अध्यक्ष होते. या दरम्यान टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा ग्लोबल ब्रेवरेज, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स आणि टाटा टेली सर्व्हिसेस सहित अन्य प्रमुख टाटा कंपन्यांचेही अध्यक्ष होते. भारत आणि विदेशात विविध संघटनांशी त्यांचा संबंध होता. रतन टाटा मित्सुबिशी कॉर्पोरेशन आणि जेपी मॉर्गन चेसक्या आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीत होते.
सर रतन टाटा ट्रस्ट, एलाइड ट्रस्ट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि एलाइड ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेटल रिसर्चच्या प्रबंधन परिषदेचे रतन टाटा अध्यक्ष होते. कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि दक्षिण कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या बोर्डतही रतन टाटा कार्यरत होते.
रतन टाटा यांची कामगिरी
1991 ते 2012 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष
सन 2007 मध्ये कोरस कंपनीची खरेदी केली
2008 मध्ये जग्वार लँड रोव्हर कंपनीची खरेदी
टाटा स्टील कंपनीचा जगभरात विस्तार केला
टाटा मोटर्स या कंपनीला मोठं यश मिळवून दिलं
टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस कंपनीचा जगभरात विस्तार
जागतिक ब्रँड व्हॅल्यू म्हणून टाटा ग्रुपला नवी ओळख मिळवून दिली
रतन टाटा यांना मिळालेले पुरस्कार
सन 2000 मध्ये पद्म भूषण पुरस्कार
2008 मध्ये पद्म विभूषण पुरस्कार
सन 2009 मध्ये ऑनररी नाइट कमांडर ऑफ द ब्रिटिश एम्पायर
सन 2012 मध्ये इंटरनॅशनल हेरिटेज फाऊंडेशनचा लाइफटाइम अचीव्हमेंट पुरस्कार
टाटांचे सामाजिक कार्य
रतन टाटा यांना परोपकार आणि सामाजिक कार्यासाठी देखील ओळखले जाते. रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा ट्रस्ट आणि टाटा फाउंडेशनने शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.
शिक्षण
शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा पाया आहे असे रतन टाटा म्हणत होते. त्यामुळे त्यांनी देशभरात शाळा आणि महाविद्यालयाची स्थापना केली. तसेच त्यांनी अनेक स्कॉलरशिप योजनांची सुरुवात केली. आज याच स्कॉलरशिपचा लाखो विद्यार्थी लाभ घेत आहेत.
आरोग्य
टाटा ट्रस्टने अनेक आरोग्य सेवा आणि रुग्णालयांत गुंतवणूक केली आहे. कॅन्सर रिसर्च, एड्सवरील उपचार आणि देशातील ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी विशेष कार्य केले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) आणि भारतीय विज्ञान संस्थान (IISc) यांसारख्या प्रमुख शिक्षण संस्थांना पाठबळ दिलं.
रतन टाटा त्यांच्यातील परोपकाराच्या गुणामुळे सुद्धा ओळखले जातात. रतन टाटांच्या नेतृत्वात टाटा समूहाने भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठात 28 मिलियन डॉलरचे टाटा स्कॉलरशिप फंड स्थापन केला. सन 2010 मध्ये टाटा समूहाने हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये एक कार्यकारी केंद्र स्थापन करण्यासाठी 50 मिलियन डॉलर दान केले होते. या केंद्राला टाटा हॉल असे नाव देण्यात आले. सन 2014 मध्ये टाटा समूहाने आयआयटी – बॉम्बेला 95 कोटी रुपये दान दिले होते. तसेच टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाईन संस्थेची स्थापना केली होती.