DNA मराठी

Sawedi land Scam सावेडीतील १०० कोटींच्या जमिनीवर डाव; तलाठी आणि निबंधक कार्यालयातील कर्मचारी कोण ?

Sawedi land Scam १०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या या जमिनीवर भूमाफियांकडून मोठा डाव खेळण्यात आल्याचा आरोप

Sawedi land Scam अहिल्यानगर, – सावेडी भागातील अत्यंत मोलाची समजली जाणारी सर्वे नंबर २४५/ब १ (०.७२ हेक्टर आर) व २४५/ब २ (०.६३ हेक्टर आर) या एकूण १ हेक्टर ३५ आर क्षेत्रफळाच्या जमिनीची तब्बल ३५ वर्षांनंतर झालेली नोंदणी सध्या शहरात प्रचंड चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरली आहे.

बाजारभावानुसार अंदाजे १०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या या जमिनीवर भूमाफियांकडून मोठा डाव खेळण्यात आल्याचा आरोप नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात सावेडी तलाठी कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील काही कर्मचारी थेट सहभागी असल्याचा संशय गडद होत आहे.

या नोंदणीसाठी सादर करण्यात आलेले दस्तऐवज आणि अर्ज अपूर्ण, संशयास्पद आणि विसंगत आहेत. दस्तात उल्लेख करण्यात आलेल्या रकमेपासून ते साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्यांपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, १९९१ मध्ये खरेदीखत झाल्याचा दावा असला, तरी त्या वेळी संबंधित गटाचे विभाजन झालेलेच नव्हते. हे विभाजन प्रत्यक्षात १९९२ मध्ये झाले, यामुळे १९९१ मध्ये खरेदीखत वैधपणे होणे शक्यच नव्हते.

यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे ३५ वर्षांपूर्वीचे दस्त इतक्या सहजतेने कसे मिळाले? कोणत्या कर्मचाऱ्याने जुने पेपर शोधून देण्यासाठी मदत केली? या प्रश्नांमुळे प्रशासनातील “अंदर की सेटिंग” आणि भूमाफियांच्या संगनमताचा संशय अधिकच बळावला आहे.

सध्या या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरत असून, संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून केली जात आहे. प्रशासनाने या प्रकरणात निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी न केल्यास तीव्र जनआक्रोश उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.