Maharashtra Rain Alert: जालना जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपात पेरलेल्या सोयाबीन, मका, कपाशी या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके हे पूर्ण पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि या नुकसानीची पाहणी काल महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली व तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.
त्या आदेशावरून अधिकारी जालना जिल्ह्यातील सामनगाव येथे शेत शिवारात आले असता, या अधिकाऱ्यांसमोरच एका वयोवृद्ध शेतकऱ्याने गुडघ्या इतक्याला पाण्यात बुडालेल्या सोयाबीनच्या शेतात बसून या अधिकाऱ्यांसमोर टाहो फोडला आहे व अधिकाऱ्यांना व सरकार आम्हाला वाचवा कारण आमचे पूर्ण पीके पाण्यात बुडाली आहे, कर्ज काढून आम्ही हे खरिपाचे पिके पेरणी केली आता काढणीला आली होती. मात्र, पूर्ण पिके गेली आहे, असा टाहो या शेतकऱ्याने फोडला.
तर शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली आहे. फक्त फसवे आश्वासन देऊ नका कृषी मंत्री काल आले व गेले त्यांनी ठोस भूमिका घेत तात्काळ आर्थिक मदत देण्याची घोषणा किंवा आदेश द्यायची होती. मात्र, तसे न करता त्यांनी आम्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत पंचनामे करण्याचे आदेश दिले असे म्हणत कृषीमंत्र्यावर सुद्धा शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तर आलेल्या अधिकाऱ्यांकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे अतोनात नुकसान झाले असून संपूर्ण पीक पाण्यात बुडाली आहे आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश वरिष्ठांच्या आदेशावरून आले असून आम्ही रितसर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करत आहोत.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्तक रहावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.