Dnamarathi.com

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहे. यातच नगर शहरातील देखील तब्बल 12 नगरसेवकांनी ठाकरे गटाला राम राम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे.


ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख दिलिप सातपुते, शहर प्रमुख सचिन जाधव,युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कतोरेसह उबाठा गटाच्या 12 नगरसेवक, महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला.

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई  येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यामुळे नगरमध्ये उबाठा गटाला मोठ खिंडार पडले. त्याचबरोबर मुंबईतील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीने  प्रभावित होऊन मागील महिनाभरात विविध पक्षांच्या हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत इनकमिंग जोरात सुरू असून उबाठा गटाला खिंडार पडले आहे.

नगर महापालिकेचे महापौर संजय शेंडगे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे, सुरेश तिवारी, संतोष ग्यानाप्पा,बबलू शिंदे, संग्राम कोटकर, दत्तात्रय कावळे, परेश लोखंडे, संदीप दातरंगे, कैलास शिंदे यांच्यासह उपशाखाप्रमुख, विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी उठाव केला होता. त्याची प्रचिती मागील अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामातून दिसली. त्यामुळेच अनेक पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत येत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की 12 नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने नगरमधील शिवसेना आणखी मजबूत झाली आहे.

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्वाधिक जागा येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत शिवसेना 80 जागा लढली आणि 60 आमदार निवडून आल्या. उबाठा 95 जागा लढले आणि 20 जागी निवडून आले. उबाठापेक्षा शिवसेनेला 17 लाख अधिक मते मिळाली तर लोकसभेत शिवसेनेला दोन लाख जास्त मते मिळाली. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न उरलेला नाही. तसेच नगरमधील विकास कामांना निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *