Maharashtra News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत समशेरपुर, ता. अकोले येथील ए.टी.एम. मशिन चोरी करणारी टोळी 7,52,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 48 तासांचे आत जेरबंद केली आहे.
23 डिसेंबर 2023 रोजी रात्री 12 ते सकाळी 06.00 चे दरम्यान समशेरपुर फाटा, ता. अकोले येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सचे गाळ्यामधील इंडिया 1 पेमेंट लि. कंपनीचे ए.टी.एम. मशिनला दोरखंड बांधुन ए.टी.एम. मशिन बोलेरो गाडीने बाहेर ओढुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती.
फिर्यादी नितीन सखाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अकोले पोलीस ठाण्यात भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये एकुण 90,000 रुपये किमतीचे मशिन व त्यामधील रोख रक्कम चोरी गेलेली होती.
या घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समशेरपुर परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासत असतांना गुन्ह्यातील आरोपी हे केळी रुम्हणवाडी मार्गे गेल्याचे दिसुन आले.
पोनि दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील ए.टी.एम. मशिन हे आरोपी भरत लक्ष्मण गोडे व त्याचे इतर साथीदारांनी चोरुन नेले आणि तो त्याचे राहते घरी त्याचे इतर साथीदारांसह थांबलेला असल्याची माहिती मिळाली.
या माहितीवरून सदर ठिकाणी जावुन गुन्हे शाखेच्या पथकाने भरत लक्ष्मण गोडे , सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे, अशोक रघुनाथ गोडे , सुयोग अशोक दवंगे आणि अजिंक्य लहानु सोनवणे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 1,42,000 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, गुन्ह्याचे वेळी वापरलेले मोबाईल व तुटलेले ए.टी.एम. मशिनसह एकुण 7,52,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी अकोले पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करीत आहे.