Lok Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केले आहे. देशात यावेळी 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडणार आहे.
यासाठी आतापर्यंत अनेक उमेदवारांच्या नावांची घोषणा देखील करण्यात आली आहे मात्र राज्यात अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाबाबत निर्णय झालेला नाही.
MVA ने वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना युतीमध्ये सामील होण्याची शेवटची संधी दिली आहे.
विरोधी आघाडी MVA मध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील NCP यांचा समावेश आहे.
प्रकाश आंबेडकरांनी जास्त जागांच्या मागणीमुळे एमव्हीएमध्ये सहभागी असलेल्या पक्षांचे जागावाटपाचे गणित बिघडल्याची चर्चा आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून राजकीय तापमान आणखी वाढवले आहे.
संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यावर टीका करत काँग्रेसला 7 जागांवर उघड पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यावरील विश्वास उडाला आहे, असा आरोप आंबेडकरांनी आपल्या पत्रात केला आहे.
वृत्तानुसार, MVA ने VBA ला आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपला निर्णय कळवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. MVA ने प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला 4 जागा देऊ केल्या आहेत. त्या चार जागा स्वीकारार्ह आहेत की नवीन प्रस्ताव द्यायचा आहे का, हे आजच VBA ला स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
MVA आज जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करू शकते. शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत म्हणाले की, व्हीबीएने आम्हाला 27 जागांची यादी दिली होती, त्यापैकी आम्ही त्यांना चार जागा देऊ केल्या आहेत. त्यांना काय हवे आहे ते त्यांनी सांगावे… त्यांच्यासाठी महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत.