Rahul Gandhi: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज सोमवारी परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणी दौऱ्यात राहुल गांधी हे सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. सकाळी १२.३० वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने नांदेड येथे आगमन होईल, नांदेडहून ते मोटारीने परभणीला जातील.
दुपारी २.१५ ते ३.१५ वाजता ते सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतील व त्यानंतर विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. या दोन कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी नांदेडकडे प्रयाण करतील व संध्याकाळी ५.१५ वाजता विमानाने दिल्लीला जातील.
यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. विजय वडेट्टीवार, आ. अमित देशमुख, खा. रविंद्र चव्हाण, खा. डॉ. कल्याण काळे, डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत लोकांना अमानुष मारहाण केली व निरपराध लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक केली. सोमनाथ सुर्यवंशी या तरुणालाही अटक केली होती त्यांचा कोठडीत मृत्यू झाला.
या प्रकरणात शांतता प्रस्थापित करत असताना विजय वाकोडे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा ह्लदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.