DNA मराठी

Jaykumar Rawal : नाफेडच्या माध्यमातून तांदूळ, पीठ आणि कांदा विक्रीसाठी वाहनांना ग्रीन सिग्नल

fb img 1757067721711

Jaykumar Rawal : केंद्र सरकारच्यावतीने नाफेडच्या माध्यमातून ‘भारत’ ब्रँडची उत्पादने सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याचा भाग असलेली ‘भारत’ आटा (गव्हाचे पीठ), तांदूळ आणि कांदा ही उत्पादने राज्यात सहकारी ग्राहक भांडारच्या सहयोगातून सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

परवडणाऱ्या किमतीत आवश्यक आणि दर्जेदार अन्नपदार्थांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेनुसार केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वतीने ‘भारत’ ब्रँड उत्पादनांची विक्री केली जात आहे. याच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाला. यावेळी नाफेडच्या वतीने राज्य प्रमुख भव्या आनंद उपस्थित होत्या.

पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही फिरती वाहने विक्रीकरीता रवाना करण्यात आली. तर, प्रातिनिधिक स्वरुपात ग्राहकांना या उत्पादनांचे वितरण करण्यात आले.

मंत्री रावल म्हणाले, राज्यात सध्या सणांचा काळ आहे. या काळात दर्जेदार पीठ, तांदूळ आणि कांदा कमी किमतीत ग्राहकांना उपलब्ध होत आहे. यामुळे स्पर्धा वाढून या उत्पादनांचे बाजारभाव आणखी कमी होण्यास आणि पर्यायाने महागाई कमी होण्यास मदत होईल. राज्यात आणि देशात नाफेडचे जाळे पसरलेले आहे, त्यामाध्यमातून या उत्पादनांची थेट शेतकऱ्यांकडून खरेदी होत असल्याने कमी किंमतीत यांची विक्री शक्य होत असून ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.

नाफेडने खरेदीचे वर्षभराचे वेळापत्रक तयार करुन टप्प्याटप्प्याने इतर उत्पादनेही विक्रीसाठी उपलब्ध करुन दिल्यास ग्राहकांना अधिक लाभ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘भारत’ ब्रँडच्या या उपक्रमाचा भाग म्हणून आज विक्रीसाठी आलेल्या ‘भारत आटा’ चे दर प्रति किलो 31.50 रुपये, ‘भारत तांदूळ’ चे दर प्रति किलो 34 रुपये असे बाजारभावापेक्षा कमी ठेवण्यात आले आहेत. कांदा ही विक्री साठी आहे. ग्राहकांसाठी व्यापक सुलभता आणि सोय सुनिश्चित करण्यासाठी ही उत्पादने रिलायन्स रिटेल, डी-मार्ट, विशाल मार्ट आणि आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसारख्या प्रमुख संघटित किरकोळ साखळ्यांद्वारे वितरित केली जाणार आहेत. शिवाय, ग्राहकांच्या सोयीसाठी घरांपर्यंत थेट भारत ब्रँड उत्पादने पोहोचवण्यासाठी मोबाईल व्हॅन तैनात केल्या गेल्या आहेत, अशी माहिती नाफेडच्या राज्य प्रमुख भव्या आनंद यांनी यावेळी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *