IMD Alert: देशात मान्सूनचे आगमन झाले असून जुलै महिन्यात बहुतेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर आता भारतीय हवामान खात्याने देशातील 17 राज्यांमध्ये पुढील तीन-चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
यासोबतच देशातील अनेक राज्ये आहेत ज्यासाठी रेड आणि ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रसह 7 राज्यांचा समावेश आहे.
तर दुसरीकडे उत्तर-पश्चिम भारतापासून पूर्व, ईशान्य, पश्चिम आणि दक्षिण भारतापर्यंतच्या विविध भागातील लोकांना मुसळधार पाऊस आणि त्याच्याशी संबंधित सर्व समस्यांचा सामना करावा लागत आहे.
या राज्यांमध्ये पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि मेघालयमध्ये अतिवृष्टीबद्दल रेड अलर्ट जारी केला. यासोबतच पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि गोव्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय 12 ते 14 जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि किनारी कर्नाटकात अतिवृष्टीबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याशिवाय पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे 11 ते 13 जुलै दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख आणि पूर्व राजस्थानसह दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आसाममध्ये 84 जणांचा मृत्यू
आसाममध्ये पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अजूनही 26 जिल्ह्यांमध्ये 17 लाखांहून अधिक लोक बाधित आहेत. यासोबतच मोठ्या भागात पिकेही पाण्याखाली गेली असून आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
भूस्खलन आणि वादळात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आलेल्या पुरामुळे या उद्यानातील नऊ गेंड्यांसह एकूण 159 वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.