तो निधी हा ‘मायबाप जनतेचा’ असतो. त्यामुळे सार्वजनिक तिजोरीतील पैशाचा विनियोग करताना जबाबदारीने आणि अत्यंत सजगतेने वर्तन करणं हे प्रत्येक मंत्र्याचं नैतिक कर्तव्य आहे,”
अहिल्यानगर : राज्याचे मंत्री संजय शिरसाठ यांच्या एका कार्यक्रमातील विधानावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. त्यांचं विधान असं सुचवणारे आहे की जणू सार्वजनिक निधीचा वाटप वैयक्तिक अधिकारासारखा केला जातो, अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत परखड शब्दांत प्रतिक्रिया देत शिरसाठांवर हल्लाबोल केला आहे.
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. अलीकडेच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. यापूर्वीही अनेक मंत्री त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे चर्चेत आले असून, आता त्यात शिरसाट यांची भर पडली आहे.
शनिवारी अकोल्यात आयोजित सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले, “वसतिगृहासाठी पाच, दहा, पंधरा कोटींचा निधी मागा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?“ त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यावरून टीकेची झोड उठली आहे. त्यावर रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
“मंत्री काही काळासाठी त्या पदावर असतात. ते विसरतात की ते ज्या निधीचा वापर करत आहेत तो त्यांच्या खाजगी घरून आलेला नसतो. तो निधी हा ‘मायबाप जनतेचा’ असतो. त्यामुळे सार्वजनिक तिजोरीतील पैशाचा विनियोग करताना जबाबदारीने आणि अत्यंत सजगतेने वर्तन करणं हे प्रत्येक मंत्र्याचं नैतिक कर्तव्य आहे,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले की, “हा पैसा कुणाच्या ‘बॅग भरण्यासाठी’ नाही. हा पैसा लोकांचे कररूपाने सरकारकडे जमा होतो, आणि त्याचा वापर लोकांच्या भल्यासाठीच व्हायला हवा. मंत्रिपद ही हुकूमशाही करण्याची जागा नाही. ते एक जबाबदारीचं पद आहे, आणि त्यावर असलेल्या व्यक्तींनी विनम्रता, पारदर्शकता आणि शिस्तबद्धता पाळावी, ही अपेक्षा जनतेला असते.”
राजकीय प्रतिक्रिया आणि वातावरण
या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, मंत्री संजय शिरसाठ यांच्या विधानाचे स्पष्टीकरण अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही. मात्र रोहित पवारांच्या परखड आणि थेट शब्दांनी सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील विरोधकांनी देखील शिरसाठ यांच्या विधानावरून टीकेची झोड उठवली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर सरकारकडून जनतेच्या पैशाचा वापर कशा पद्धतीने होत आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रोहित पवारांच्या वक्तव्याने सरकारच्या धोरणांवर आणि मंत्र्यांच्या वागणुकीवर गंभीर चर्चा सुरु झाल्या आहेत.