Pune News : पुण्यातील भवानी पेठ परिसरातील टिंबर मार्केटमध्ये बुधवारी (१८ नोव्हेंबर) मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. पहाटे सुमारे २ वाजून ५ मिनिटांनी जय वल्लभ शाळेजवळील लाकडाच्या दुकानांना आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि परिसरातील सुमारे ५० ते ६० दुकानांना आगीची झळ बसली.
अग्निशमन दलाचे मोठे रेस्क्यू ऑपरेशन
आगीची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी एकूण २७ अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या. यामध्ये पुणे अग्निशमन दलाच्या २४, पुणे कॅन्टोन्मेंटची एक आणि पीएमआरडीएच्या दोन गाड्यांचा समावेश होता.
सुमारे १५० अग्निशमन जवानांनी दोन तासांहून अधिक काळ प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
सुदैवाने जीवितहानी नाही. आग जवळच्या निवासी वसाहतीमध्ये पसरू नये यासाठी अग्निशमन दलाने चारही बाजूंनी प्रयत्न केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. सध्या घटनास्थळी कूलिंग ऑपरेशन सुरू असून आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.






