DNA मराठी

Election Commission : भारत निवडणूक आयोगाने (ECI) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंग संधू आणि डॉ.विवेक जोशी यांच्या उपस्थितीत 345 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची (Registered Unrecognized Political Parties – RUPPs) नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे पक्ष 2019 पासून सहा वर्षांत एकाही निवडणुकीत सहभागी झालेले नाहीत आणि त्यांचे कार्यालय देशात कुठेही अस्तित्वात नाही, असे आढळले आहे.

सध्या आयोगाकडे नोंदणीकृत 2800 हून अधिक नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आहेत. त्यापैकी अनेक पक्षांनी RUPP म्हणून नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या अटी पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे आयोगाने देशव्यापी पडताळणी मोहीम हाती घेतली असून त्यात सध्या 345 पक्षांची निवड झाली आहे.

या पक्षांना अन्यायकारकपणे नोंदणी रद्द होऊ नये यासाठी संबंधित राज्यांच्या/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (CEOs) या पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर या पक्षांना त्यांच्या बाजूने आपली भूमिका मांडण्यासाठी सुनावणीची संधी दिली जाईल. अंतिम निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे.

देशातील राजकीय पक्षांची नोंदणी ही लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 29अ अंतर्गत केली जाते. एकदा पक्ष नोंदणीकृत झाला की, त्याला करसवलतीसह अनेक सवलती आणि सुविधा मिळतात.

हा संपूर्ण उपक्रम राजकीय व्यवस्थेचे शुद्धीकरण करण्याच्या उद्देशाने राबवला जात आहे. 2019 नंतर एकाही लोकसभा, विधानसभा किंवा पोटनिवडणुकीत भाग न घेणारे आणि प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेले पक्ष यामध्ये समाविष्ट आहेत. 345 पक्ष हे पहिल्या टप्प्यात निवडण्यात आले असून हा उपक्रम पुढेही सुरू राहणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *