Champions Trophy : न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात शानदार केली आहे. मिशेल सँटनरच्या नेतृत्वाखालील किवी संघाने पहिल्याच सामन्यात यजमान पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला. टॉम लॅथम आणि विल यंग यांच्या शतकांमुळे न्यूझीलंडने 5 विकेट गमावत 320 धावा केल्या होत्या. लॅथमने 118 धावांची नाबाद खेळी केली, तर यंगने 113 चेंडूत 107 धावा केल्या.
पाकिस्तानची संथ फलंदाजी पराभवाचे कारण ठरली
321 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर सौद शकील आणि कर्णधार मोहम्मद रिझवान लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. बाबर आझमने 90 चेंडूत 64 धावा केल्या.
पाकिस्तानच्या मधल्या फळीत खुशदिल शाहने संघर्ष केला आणि 49 चेंडूत 69 धावा केल्या, परंतु त्याला इतर फलंदाजांकडून फारशी साथ मिळाली नाही. फखर झमानने 24 धावा, सलमान आघाने 42 धावा आणि तय्यब ताहिर फक्त 1 धाव करून बाद झाला. संपूर्ण पाकिस्तानी संघ 47.2 षटकांत 260 धावांवर ऑलआउट झाला. या पराभवामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत आणि आता त्यांना उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील.
आता पाकिस्तानचा पुढील सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये भारताविरुद्ध होईल. हा सामना पाकिस्तानसाठी करा किंवा मरो असा असेल. त्याचबरोबर न्यूझीलंडच्या या विजयामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत. जर पाकिस्तानला स्पर्धेत आपला दावा जिवंत ठेवायचा असेल, तर त्यांना केवळ भारताविरुद्ध जिंकावे लागणार नाही तर त्यांच्या रणनीती आणि फलंदाजीच्या क्रमातही मोठे सुधारणा करावे लागतील.