DNA मराठी

राजकीय

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदार एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार

Sunil Tatkare : महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये मदतकार्य तातडीने व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी एका महिन्याच्या पगाराचा पूर्ण मोबदला जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्राद्वारे दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सहकारी मंत्र्यांसह पूरग्रस्त जिल्हयांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत शिवाय नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही सुनिल तटकरे म्हणाले. दरम्यान शेतकरी, कामगार आणि सर्व सामान्य जनतेच्या दु:खाच्या कठीण काळात राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगतानाच आगामी काळात आणखीही मदत व दिलासा देणार्‍या उपाययोजना जाहीर करण्यात येतील असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदार एका महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार Read More »

uddhav thackeray

Uddhav Thackeray: ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा अन् शेतकऱ्यांना मदत करा; उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचे वैशिष्ट म्हणजे आजपर्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड,, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याचे पीक पाण्यात गेलं आहे. मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्यानं पाहिली नव्हती. नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती. पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिकं डोळ्यादेखत पाण्यात गेली आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले त्या काळात दुष्काळ परिस्थिती, अतिवृष्टी , चक्रीवादळ यासारख्या आपत्तीने शेतकरी अक्षरशः रडवेला झाला पण तेव्हा देखील केंद्राने कोणतीही मदत केली नाही. अतिशय तुटपुंजी मदत दिली. शेती AI च्या मदतीने करा असा सल्ला ही सरकार शेतकऱ्यांना देतंय पण अशी नैसर्गिक आपत्ती येऊनही महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाइन सल्ले देत आहेत एकही मंत्री बांधावर फिरकलेला नाही. मराठवाड्याला सापत्न वागणूक देताय. साधं हेलिकॉप्टरने सुद्धा पूर परिस्थितीची पाहणी करायला सीएम आणि DCM ना वेळ नाही. नुसते मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन टीव्ही समोर पाहणी करण्याचे नाटक सुरू आहे आणि टेबल न्यूज तयार करणे सुरू आहे. कॅबिनेट रद्द करून पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा घ्यायला पाहिजे होता. जमीन वाहून गेल्याने रब्बी धोक्यात आली आहे. गुरे ढोरे वाहून गेले, रस्ते वाहून गेले. मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला आहे त्यातून ते कसे सावरणार? केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसानीचे पैसे जमा करावे. या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये यासाठी तसे निर्देश द्यावे शेतकऱ्यांच्या बाबतीतही पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ घालवू नका. पहिल्यांदा छान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करा आणि नंतर त्याची शहानिशा करत बसा जुन्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत न देता तीन हेक्टर पर्यंत मदत द्या. ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा. स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या.

Uddhav Thackeray: ओला दुष्काळाचे निकष बाजूला ठेवा अन् शेतकऱ्यांना मदत करा; उद्धव ठाकरे Read More »

om raje nimbalkar

Om Raje Nimbalkar : खासदार ओम राजे निंबाळकर यांनी पुरामध्ये अडकलेल्या दहा जणांची केली सुटका

Om Raje Nimbalkar : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता रात्रीच्या अंधारात घरावर अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतल्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे म्हणण्याची पाळी आली आहे. त्यांच्या या धाडस आणि तत्परतेमुळे 10 जणांचा जीव वाचला आहे. वडणेर ता. परांडा येथील पाण्यात अडकलेल्यांच्या बचाव कार्याचा रात्रीच्या अंधारातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात वाहत्या खोल पाण्यात सर्वात पुढे जाऊन, पाईप झाडात अडकवताना, दोर ओढताना धाराशिवचे खासदार निंबाळकर दिसत आहेत. 22 सप्टेंबर ची ही संध्याकाळ, रेस्क्यू केलेले 4 नागरिक आणि बचाव पथकातील 6 जणांसाठी काळरात्र ठरली असती. पण खासदार ओम राजेंनी गावातील तरुणांनासोबत घेऊन केलेलं धाडस आणि समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना होता होता टळली. सोमवार 22 सप्टेंबर संध्याकाळच्या 7 ते 8 च्या दरम्यानची ही घटना आहे. वडणेर (ता परांडा) येथील पाण्यात अडकलेल्या 4 जणांना घेऊन बचाव पथकाची बोट वापस निघाली होती. पण बोटीचे इंजिन प्रवाहात अचानक बंद पडले. त्यामुळे रेस्क्यू केलेले 4 जण आणि बचाव पथकातील 6 जणांना घेऊन निघालेली ही बोट पुराच्या प्रवाहात, पाण्याच्या वेगामुळे वाहत चालली. त्यावेळी तिथं एकच गोंधळ उडाला. पण त्याचवेळी तिथे बचाव कार्यात सहभागी असलेले खासदार ओम राजे निंबाळकर आणि स्थानिक युवकांनी क्षणाचाही विलंब न लावता वाहत्या पाण्यात उड्या मारल्या आणि दुसरा दोरखंड बोटीच्या दिशेने फेकून, वाहत जाणारी बोट एका झाडांला दोरखंडाने अडकवण्यात यश मिळवले. त्यानंतर दुसऱ्या दोरखंडाने बोट ओढून काढत मागील 24 तासापासून पाण्यात अडकलेल्या 4 जणांना आणि बचाव पथकातील 6 जणांना सुखरूप पणे बाहेर काढले. त्यामुळे खूप मोठी दुर्घटना टळली.

Om Raje Nimbalkar : खासदार ओम राजे निंबाळकर यांनी पुरामध्ये अडकलेल्या दहा जणांची केली सुटका Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2 हजार 215 कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता

Devendra Fadnavis: अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून घरे, शेती आणि जनावरांचे जिथे नुकसान झाले आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आज मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली. आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २२१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. यापैकी १८२९ कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले असून येत्या ८ ते १० दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होईल. तशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पूरग्रस्त भागांतील पंचनामे पूर्ण होताच तातडीने मदत पोहोचवली जात आहे. ज्या तालुक्यांचे पंचनामे पूर्ण होतात, तिथे त्वरित आर्थिक सहाय्य वितरित केले जाते. एकत्रित शासन आदेशाची वाट न पाहता, पंचनामे येतील तसे जीआर काढण्यात येत आहेत. मदतकार्य कुठेही थांबलेले नाही . मृत्यू, जनावरांचे नुकसान, घरांचे नुकसान यांसारख्या दुर्दैवी घटनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदत वितरित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवरही नुकसानग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सूट देण्यात आली असून, निधीची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. धुळे, जळगाव, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांत मदतकार्य धाराशिव, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, सोलापूर, बीड, परभणी आदी जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले. या भागांत एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत. अनेकांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि निवाऱ्याची व्यवस्था सरकारने केली आहे. पूरामुळे जमिनी खरडून गेल्याच्या तक्रारींवर सरकार सकारात्मकपणे मदत करेल. केंद्राकडे प्रस्ताव, पण राज्य मागे हटणार नाही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल. पण राज्याने तातडीने मदत देणे प्रारंभ केले आहे. केंद्राची मदत मिळेलच, पण शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. काही भागांत अजूनही पाणी ओसरलेले नसल्याने स्थलांतरित नागरिकांना घरी परतता येत नाही. त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था सरकार पुरवत आहे. सर्व पालकमंत्र्यांना पूरग्रस्त भागांना भेटी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील अतिवृष्टीचा इशारा, प्रशासन सज्ज हवामान खात्याने २७-२८ सप्टेंबरदरम्यान पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन सरकारने केले आहे. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अखंडपणे सुरू असून, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुख्यमंत्री करणार अतिवृष्टीचा भागाचा दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पूरस्थितीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2 हजार 215 कोटी मंजूर, नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता Read More »

palestine

Palestine News : पॅलेस्टाईन होणार नवीन देश? भारतासह 142 देशांनी दर्शवला पाठिंबा

Palestine News : गेल्या काही वर्षांपासून पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्या अशी मागणी होत आहे. तर आता लवकरच पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी न्यू यॉर्कमधील सदस्य राष्ट्रांना संबोधित करताना म्हटले की पॅलेस्टाईन्यांना राज्यत्व देणे हा बक्षीस नाही तर एक अधिकार आहे. त्यांनी इशारा दिला की जर पॅलेस्टाईनला ही मान्यता दिली गेली नाही तर ते अतिरेक्यांना एक भेट म्हणून सिद्ध होईल. गुटेरेस यांनी सांगितले की मध्य पूर्वेतील शाश्वत शांतता केवळ दोन-राज्य उपायाद्वारे शक्य आहे. दोन-राज्य उपायासाठी संयुक्त राष्ट्रांचे समर्थन गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्रांच्या दीर्घकालीन धोरणाचा पुनरुच्चार केला की इस्रायल आणि पॅलेस्टाईनला त्यांच्या 1967 पूर्वीच्या सीमांवर आधारित सार्वभौम आणि स्वतंत्र लोकशाही राज्ये म्हणून मान्यता दिली पाहिजे. त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार जेरुसलेम ही दोन्ही देशांची सामायिक राजधानी असावी. फ्रान्सचे मोठे पाऊल कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियानंतर, फ्रान्सने आता पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्य म्हणून औपचारिक मान्यता देण्याची घोषणा केली आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी न्यू यॉर्कमधील दोन-राज्य उपायावरील शिखर परिषदेत बोलताना म्हटले की पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची वेळ आली आहे. हा एकमेव उपाय आहे जो इस्रायलला शांततेत जगू देईल. मॅक्रॉन यांचे विधान राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की हा निर्णय हमासचा पराभव आणि शांततेच्या दिशेने एक आवश्यक पाऊल आहे. गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईवर वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावादरम्यान त्यांचे विधान आले आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, मॅक्रॉन यांनी संयुक्त राष्ट्रांना स्पष्ट केले की जर दोन-राज्य उपाय अवलंबला गेला नाही तर या प्रदेशात अस्थिरता वाढेल. पश्चिमी एकता रविवारी फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा करण्यापूर्वी. या घोषणांचे उद्दिष्ट तेल अवीववर युद्धबंदी लागू करण्यासाठी आणि वाटाघाटीचा मार्ग मोकळा करण्यासाठी दबाव वाढवणे आहे. ब्रिटन आणि फ्रान्स सारख्या जी7 आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांनी केलेली ही भूमिका विशेष महत्त्वाची आहे. जागतिक स्तरावर पॅलेस्टाईनची भूमिका 140 हून अधिक देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिली आहे. अलीकडेच, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने इस्रायल-पॅलेस्टाईन द्वि-राज्य उपाय पुनरुज्जीवित करणारा ठराव प्रचंड मतांनी मंजूर केला. या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या 142 देशांमध्ये भारताचा समावेश होता. विशेष म्हणजे, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पॅलेस्टाईन राज्य कधीही अस्तित्वात राहणार नाही असे सांगितल्यानंतर लगेचच हा निर्णय आला.

Palestine News : पॅलेस्टाईन होणार नवीन देश? भारतासह 142 देशांनी दर्शवला पाठिंबा Read More »

yogendra yadav

Yogendra Yadav : देशाला सध्या आणीबाणीपेक्षा अधिक धोका; योगेंद्र यादव यांचे प्रतिपादन

Yogendra Yadav : आणीबाणी काळात लोकशाही धोक्यात आली होती. मात्र आता मोदी सरकारच्या काळात लोकशाहीसह देशाची संस्कृती, सभ्यता, आयडिया ऑफ इंडिया धोक्यात आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि मोदींविरोधातील लढाई तीव्र करून एकूण अन्यायाच्या विरोधात परावर्तित केली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते योगेंद्र यादव यांनी केले. समाजवादी चळवळीच्या ९० वर्षपूर्तीनिमित्त पुण्यात तीन दिवसीय समाजवादी एकजुटता संमेलन पार पडले. पुणे घोषणा पत्र या सत्रात यादव बोलत होते. अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्ती चळवळीचे नेते अविनाश पाटील होते. या सत्रामध्ये अमूल्य निधि (इंदौर), विनोद शिरसाठ, अशोक पांडा (छत्तीसगड), हरीश खन्ना, शाहिद कमाल, सिद्धराम पैटी आदी सहभागी होते. सुनीति सु. र., गीता आर यांनी घोषणा पत्राचा प्रस्ताव मांडला. देशाला लोकशाहीवादी बनविण्याचे काम समाजवादी चळवळीने केले आहे. देशातील सध्याच्या प्रश्नांचा मुकाबला करण्याची ताकद देखील समाजवादी विचारांमध्ये आहे. प्रत्येक समाजवादी व्यक्तीने संघ, भाजप यांना प्रतिकार करणे हा पहिला धर्म आहे. अन्यथा त्यांना समाजवादी म्हणवून घेण्याचा अधिकारी नाही, असेही यादव म्हणाले. राजकीय सामाजिक संस्था संघटनांमध्ये पन्नास पंचावन्न वय झाले तरी ते कार्यकर्ते स्वतःला तरुण समजतात. वयोवृद्ध झाल्यावरही पदांचा मोह त्यांना सुटत नाही. त्यामुळे व्यवकांनी संघर्ष करून संस्था संघटनांमधील सत्ता हस्तगत केली पाहिजे. अनेक ठिकाणी असे संघर्ष उभे राहिले आहेत, असे अविनाश पाटील म्हणाले. हिंदीभाषा दिन बंद करावा मी स्वतः हिंदीप्रेमी आहे. मात्र हिंदी भाषा दिन साजरा करण्याची गरज नाही. सरकारने तो बंद करून भारतीय भाषा दिन सुरू करण्याची गरज आहे. हिंदी आणि इतर भाषांमध्ये वाद निर्माण केला जात आहे. उलट सर्व भाषांनी एकमेकांशी एकोपा निर्माण करून सरकारच्या विरोधात सांस्कृतिक लढाई लढली पाहिजे, असेही योगेंद्र यादव म्हणाले.

Yogendra Yadav : देशाला सध्या आणीबाणीपेक्षा अधिक धोका; योगेंद्र यादव यांचे प्रतिपादन Read More »

img 20250921 wa0010

Uddhav Thackeray: वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्या हाती शिव बंधन…

Uddhav Thackeray : वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली ( उ बा ठा ) शिवसेनेत शेकडो कार्यकर्त्यांसह 20/9/2025 रोजी मातोश्री येथे पक्ष प्रवेश केला. सध्या अहिल्यानगर येथील अस्थिर राजकीय वातावरणात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी व शहर प्रमुख किरण काळे यांच्या मागे खंबीर पणे उभे राहणे गरजेचे वाटल्याने शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे प्रतीक बारसे यांनी सांगितले. शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी आजपर्यंत आंबेडकरी चळवळीतील एक स्वच्छ चेहेरा असलेले प्रतीक बारसे यांनी शिवबंधन हाती बांधल्याने शहरातील राजकारण बदलणार आहे. दांडगा जनसंपर्क व सर्व सामान्यांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता मिळाल्याने किरण काळे यांची शहरात ताकत वाढणार आहे. या पक्ष प्रवेशाला स्वतः उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, नेते विनायक राऊत, अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे, अनिस चुडिवाल, सुनिल भोसले, विलास उबाळे, ओंकार वडे, अभिषेक बारसे, धरम परदेशी, प्रविण पवार, अमोल कारंडे, नदीम शेख, अंबादास सोले, सचिन वाघमारे आदी सह शकडो कार्यकर्ते उपास्थित होते.

Uddhav Thackeray: वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांच्या हाती शिव बंधन… Read More »

navnath waghmare

Navnath Waghmare : मोठी बातमी, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या कारला जाळण्याचा प्रयत्न

Navnath Waghmare : जालन्यातील निलम नगर परिसरात रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला आग लागल्याची घटना घडली. ही आग जाळपोळीच्या उद्देशाने लावण्यात आल्याचा संशय असून, या प्रकरणी वाघमारे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कदीम जालना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. रविवारी रात्री साधारण साडेदहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशनजवळील निलम नगर येथील नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या कारमधून अचानक धूर निघू लागला. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच वाघमारे यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, गाडीजवळ एक संशयास्पद व्यक्ती आल्याचे दिसून आले, अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना नवनाथ वाघमारे यांनी थेट जरांगे-पाटील यांच्या समर्थकांवर आरोप केले. “शनिवारी संध्याकाळपासून माझी गाडी घरासमोर झाकून ठेवलेली होती. मी दुसऱ्या गाडीने बाहेरगावी दौऱ्यावर होतो. रात्री जेवणानंतर मी गाडीपासून काही अंतरावर फिरायला गेलो असताना, दहा-पंधरा मिनिटांतच गाडीला आग लागल्याचा आरडाओरडा झाला,” असे वाघमारे यांनी सांगितले. या घटनेसाठी जरांगे-पाटील यांच्या समर्थकांना पूर्णतः जबाबदार धरत वाघमारे यांनी तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. ते म्हणाले, “मी जरांगेसारखा भिकारचोट नाही. गाडी जाळल्याने ओबीसींचा आवाज दाबला जाणार नाही. आम्ही ठरवले आणि जरांगे यांच्या गाड्या आणि घरे जाळले तर चालेल का? परंतू आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारे निष्ठावान आहोत आणि असे कृत्य आम्ही करणार नाही.” याचवेळी वाघमारे यांनी शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि रोहित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. सध्या पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेमुळे जालन्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.

Navnath Waghmare : मोठी बातमी, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या कारला जाळण्याचा प्रयत्न Read More »

img 20250920 wa0023

Sawedi Plot Scam : अखेर ‘त्या’ प्रकरणात तत्कालीन मंडळाधिकारी दिलीप जायभाय निलंबित

Sawedi Plot Scam : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने पारनेर तालुक्यात कार्यरत असलेल्या तत्कालीन मंडळाधिकारी दिलीप श्रीधर जायभाय यांना निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. सावेडी येथील गट क्रमांक २४५ मधील जमीन फेरफार प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांच्या पत्राच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला आहे. अहवालानुसार, १९९१ मध्ये नोंद झालेल्या खरेदी दस्ताअंतर्गत झालेल्या फेरफार प्रक्रियेत न्यायालयाचा आदेश नसताना ३४ वर्षांनंतर नोंद घेण्यात आली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ व महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, १९४८ मधील नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. सदर खरेदी दस्ताच्या गावदप्तरी फेरफार नोंदी करताना तत्कालीन सावेडी मंडल अधिकारी जायभाय यांनी संबंधित खरेदीदार-खरेदीदारांना लेखी कळवले नसल्याचे नमूद आहे. तसेच शेती जमीन खरेदी करताना खरेदीदाराचा शेतकरी पुरावा न घेता थेट नोंद करण्यात आल्याची बाब उघड झाली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या कलमान्वये शिस्तभंगविषयक कारवाईस प्रारंभ करण्यात आला असून, तत्कालीन सावेड मंडळाधिकारी दिलीप जायभाय यांना तत्काळ शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

Sawedi Plot Scam : अखेर ‘त्या’ प्रकरणात तत्कालीन मंडळाधिकारी दिलीप जायभाय निलंबित Read More »

ladki bahin yojana

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो ‘हे’ काम कराच; नाहीतर मिळणार नाही पैसे

Ladki Bahin Yojana : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. या योजनेत अनेकांनी चुकीच्या मार्गाने फायदा घेतल्याने आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना मिळणारे हप्ते अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक व्हावेत यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे असे आवाहन महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी येत्या दोन महिन्यांत शासकीय पोर्टलवर जाऊन केवायसी करणे बंधनकारक असून, यासाठी ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा असेही त्यांनी सांगितले. या माध्यमातून लाडक्या बहिणींना योजनेंतर्गत लाभ वेळेत व अचूक मिळण्यास मदत होणार आहे. याचबरोबर केवायसीमुळे महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेल्या इतर योजनांचा लाभही प्रत्येक पात्र महिलांपर्यंत पारदर्शकपणे मिळणार असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो ‘हे’ काम कराच; नाहीतर मिळणार नाही पैसे Read More »