DNA मराठी

ट्रेंडिंग

Rain

IMD Rain Alert: मोठी बातमी! यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस; जाणून घ्या नवीन अंदाज

IMD Rain Alert : देशातील अनेक शहरांमधे उष्णतेची लाट वाढत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. वाढत असणाऱ्या उन्हाळ्यामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वांचे नजरा मान्सूनकडे लागले आहे. तर दुसरीकडे यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत यंदाच्या मान्सूनचा दुसरा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. यंदा देशात मान्सूनच्या काळात (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या फक्त 90 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. एप्रिलमधील अंदाजापेक्षा (92 टक्के) यात आणखी घट झाली आहे. जून महिन्यात देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल. मध्य, पूर्व आणि उत्तर-पश्चिम भारतात उष्णतेच्या लाटेचे दिवस नेहमीपेक्षा जास्त राहतील, असा अंदाज आहे. 26 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार होता मात्र आतापर्यंत केरळ राज्यात मान्सून दाखल न झाल्याने महाराष्ट्रात देखील मान्सूनचा आगमन लांबणार आहे. केरळ राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर एका आठवड्याने मान्सून महाराष्ट्रात दाखल होत असतो.

IMD Rain Alert: मोठी बातमी! यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस; जाणून घ्या नवीन अंदाज Read More »

vivek kolhe

Vivek Kolhe : संयमाला मर्यादा असते, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’; विवेक कोल्हेंचा विखे-पाटलांना थेट इशारा

Vivek Kolhe :  माझा स्वभाव सकारात्मक राजकारण करण्याचा आहे. दुसऱ्याची रेघ पुसण्यापेक्षा आपली रेघ कशी मोठी करता येईल, यावर माझा विश्वास आहे. मात्र, जाणीवपूर्वक कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर किती संयम ठेवायचा यालाही एक मर्यादा असते. लक्षात ठेवा, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’,” अशा अत्यंत कडक शब्दांत नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांनी विरोधकांना आणि पर्यायाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना जाहीर इशारा दिला आहे. राहाता शहरात आयोजित एका सत्कार समारंभादरम्यान सभेत नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे हे बोलत होते. सर्वपक्षीय उपस्थिती आणि वाढती ताकद या सभेला मिळाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती यावेळी होती या सर्वपक्षीय प्रेमाचा उल्लेख करत विवेक कोल्हे म्हणाले की, “अनेक टीका-टिप्पण्या आणि क्रॉस फायरिंग झाली, पण आज मला केवळ टीका करायची नाही. हा जो वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांचा पाठिंबा मिळतो आहे, हीच माझी खरी ताकद आहे ‘गणेश’ कारखान्यावरून विरोधकांना टोला शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या ‘गणेश’ कारखान्याच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “दोन-तीन वर्षांनी पुन्हा निवडणुका येतील, तेव्हा लोकशाही मार्गाने सभासदांसमोर जा आणि मते मागा. पण, आता अशा पद्धतीने कायदेशीर अडथळे आणून शेतकऱ्यांची कामधेनू अडचणीत आणू नका,” अशी नम्र विनंती त्यांनी केली. तसेच जर विरोधक ऐकणार नसतील, तर संस्थेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची आपली तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांनी लावला छातीवर बिल्ला: आपल्या आमदारकीचा उल्लेख करताना कोल्हे म्हणाले, “मला आमदारकी रूपी जो सातबारा मिळाला आहे, तो बिल्ला खुद्द मुख्यमंत्री यांनीच माझ्या छातीवर लावला आहे त्यामुळे कुणीही काळजी करण्याची गरज नाही. या सातबाऱ्याच्या पोटहिश्श्यामध्ये तुम्ही सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्तेच आहात असे कोल्हे म्हणाले. आधी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यापुरते मर्यादित असलो, तरी आता आपले कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघ हे आहे. यामध्ये राहता आणि लोणी परिसर आवर्जून येतो, याची मला पूर्ण जाणीव आहे. कामासाठी पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे जाण्याची आपली तयारी आहे, मात्र जाणीवपूर्वक जर कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, तर मी भाऊ आणि सहकारी म्हणून खंबीरपणे पाठीशी उभा राहीन,” असा ठाम विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Vivek Kolhe : संयमाला मर्यादा असते, ‘जब भी घायल होता हूं तब घातक होता हूं’; विवेक कोल्हेंचा विखे-पाटलांना थेट इशारा Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: जिल्ह्यातील सरकारी मेडिकल कॉलेजची जागा निच्छित ‘या’ ठिकाणी होणार कॉलेज

Nilesh Lanke : जिल्ह्याच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालया’साठी नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे २५ एकर जागा निश्चित करण्यात आली असून, जिल्ह्याच्या पहिल्या सरकारी मेडिकल कॉलेजचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. खासदार नीलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून महाविद्यालयासाठी ४४८ पदांची निर्मितीही मंजूर केली आहे. जिल्ह्यात सरकारी मेडिकल कॉलेज व्हावे, यासाठी खासदार डॉ. निलेश लंके गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत होते. दिल्ली ते मुंबई विविध स्तरांवर बैठका घेऊन त्यांनी जिल्ह्याची आवश्यकता शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्यासमोरही त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याची परिस्थिती मांडत मेडिकल कॉलेजची गरज अधोरेखित केली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर राज्य शासनाने प्रकल्पाला गती देत आवश्यक प्रशासकीय निर्णय घेतले आहेत. महाविद्यालयासाठी सुरुवातीला नालेगाव, अरणगाव आणि कापूरवाडी या ठिकाणांची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर सर्व निकषांचा विचार करून कापूरवाडी येथील २५ एकर जागा अंतिम करण्यात आली आहे. या ठिकाणी भविष्यात अत्याधुनिक सुविधा असलेले मेडिकल कॉलेज, संलग्न रुग्णालय, विद्यार्थी वसतिगृह आणि संशोधन सुविधा उभारल्या जाणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षापासून १०० एमबीबीएस जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून सप्टेंबर २०२६ पासून प्रत्यक्ष अध्यापन सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत महाविद्यालयाचे तात्पुरते कामकाज जिल्हा आयुष रुग्णालयातून चालविण्यात येणार आहे. तसेच पुढील सात वर्षांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) मेडिकल कॉलेजकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मेडिकल कॉलेजमुळे जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढणार असून ग्रामीण भागातील रुग्णांना स्थानिक पातळीवरच आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई किंवा इतर शहरांकडे जाण्याची गरज कमी होणार आहे. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा हा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Nilesh Lanke: जिल्ह्यातील सरकारी मेडिकल कॉलेजची जागा निच्छित ‘या’ ठिकाणी होणार कॉलेज Read More »

Harshwardhan Sapkal

Harshwardhan Sapkal: पेट्रोल, डिझेलची महागाई व टंचाई हे मोदी सरकारचे पाप

Harshwardhan Sapkal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचे गाजर दाखवून अर्थव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच इंधन संकट ओढवले आहे. कोणतेही ठोस धोरण नसल्याने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी गॅसची मोठ्या प्रमाणात भाववाढ करावी लागत आहे. इंधन कमतरता होणार हे दिसत असतानाही नरेंद्र मोदी पाच राज्याच्या निवडणूक प्रचारात व्यस्त होते, त्याची मोठी किंमत देशातील जनतेला मोजावी लागत आहे. इंधन दरवाढ व टंचाई हे नरेंद्र मोदी यांचेच पाप आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, २०१४ साली सत्तेत आल्यापासूनच मोदी सरकारने इंधनाचे भाव सातत्याने वाढवले आहेत. यातून सरकारी तेल कंपन्या व रिलायन्स तसेच नायरा या खाजगी तेल कंपन्यांनी भरमसाठ नफा कमावला आहे. मोदी सरकारने तेलासाठी रिझर्व्ह फंड तयार केला असता तर ही वेळ आली नसती पण कंपन्यांचे हित लक्षात घेतले, हा मोठा भ्रष्टाचारच आहे. इंधन व गॅस चंटाईचा मोठा फटका हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, छोटे उद्योगधंदे व घरातील स्वयंपाकालाही बसला आहे. नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळेच अर्थव्यवस्था कोलमडली आहे, असेही सपकाळ म्हणाले. 3000 रुपयानेच शेतकऱ्यांचा सर्व कांदा खरेदी करा.. कांद्याप्रश्नी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना महाराष्ट्राचे अर्धे मंत्रिमंडळ भेटले पण महाराष्ट्राला त्यांनी वाटाण्याच्या अक्षताच दिल्या. सरकार १५०० रुपयाने कांदा खरेदी करण्याचे सांगत आहे पण ३००० रुपये प्रति क्विंटल भाव व नाफेडमार्फत कांदा खरेदी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सर्व कांदा खरेदी केला पाहिजे, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. नरेंद्र मोदी २०१४ साली नाशिकला आले होते, मी कांदा खाल्ला आहे, तुमच्याशी बेईमानी करणार नाही, सत्तेत आलो की २४०० रुपये भाव देणार असे आश्वासन दिले होते, तीच री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओढली होती पण आता मात्र ते फक्त १५०० रुपये भाव देण्याची भाषा करत आहेत, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुन्हा आंदोलन करु, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

Harshwardhan Sapkal: पेट्रोल, डिझेलची महागाई व टंचाई हे मोदी सरकारचे पाप Read More »

chhagan bhujbal

Maharashtra Government: कोणत्याही वाहतूकदारास कार्यादेश नाही; नवीन अन्नधान्य वाहतूक निविदांबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाचा खुलासा

Maharashtra Government : राज्यातील अन्नधान्य वाहतूक निविदा प्रक्रियेबाबत काही वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे की, सध्या कोणत्याही वाहतूकदारास कार्यादेश देण्यात आलेला नसून पुढील सर्व कार्यवाही ही मा. न्यायालयाच्या आदेशानुसारच करण्यात येणार असल्याचे माहिती शासनाचे उप सचिव प्रमोद पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियमित आणि वेळेत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर आहे. या योजनेअंतर्गत भारतीय अन्न महामंडळाच्या बेस डेपोपासून थेट शिधावाटप दुकानांपर्यंत अन्नधान्य वाहतूक करण्यासाठी जिल्हानिहाय एकाच वाहतूकदाराची नियुक्ती केली जाते. विभागाच्या दि. १५ जानेवारी २०२१ च्या शासन निर्णयानुसार सन २०२२ ते २०२५ या कालावधीसाठी वाहतूक कंत्राटे निश्चित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील २१ जिल्हे आणि मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील ५ परिमंडळांतील कंत्राटांचा कालावधी संपत असल्याने नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव मंत्री तसेच मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी, सुधारणांसाठी दोन सादर करण्यात आला होता.  त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही निविदा प्रक्रिया राबवावी असा निर्णय मंत्रिमंडळात झाल्यानंतर मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेनंतर दि. २४ एप्रिल २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आणि दि. ३० एप्रिल २०२६ रोजी स्वतंत्र निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. दरम्यान, या निविदा प्रक्रियेविरोधात काही याचिका मुंबई उच्च न्यायालय तसेच औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. रिट याचिका क्र. ५३२४/२०२६ मध्ये मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाने “Authorities may proceed with the tender process, however, no work order shall be issued in all the districts pursuant to the impugned tender process,” असे स्पष्ट आदेश दिले असल्याची माहिती देखील विभागामार्फत कळवली आहे. सध्या निविदा कागदपत्रांची तपासणी आणि अंतिम प्रक्रिया अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीमार्फत सुरू असून, कोणत्याही वाहतूकदारास कार्यादेश देण्यात आलेला नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे.यासंदर्भातील पुढील सर्व कार्यवाही मा. न्यायालयाच्या आदेशानुसारच केली जाणार असल्याचेही विभागाने म्हटले आहे.

Maharashtra Government: कोणत्याही वाहतूकदारास कार्यादेश नाही; नवीन अन्नधान्य वाहतूक निविदांबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाचा खुलासा Read More »

acb action

Ahilyanagar ACB Action: नगर तालुका पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाच मागितल्याचा गुन्हा; एसीबीची कारवाई

Ahilyanagar ACB Action: नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जयेश मोतीलाल गांगुर्डे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मामा व इतर 15 नातेवाईकांविरोधात नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पीएसआय जयेश गांगुर्डे यांच्याकडे होता. तपासात मदत करण्यासाठी त्यांनी तडजोडीअंती 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी 18 मे 2026 रोजी करण्यात आली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत.

Ahilyanagar ACB Action: नगर तालुका पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाच मागितल्याचा गुन्हा; एसीबीची कारवाई Read More »

prajakt tanpure

Prajakt Tanpure : तनपुरे यांच्या पदरात त्यागाचे फळ… भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी ?

Prajakt Tanpure : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण माजी राज्यमंत्री राहिलेले व राष्ट्रवादीचे माजी आमदार राहिलेले प्राजक्त तनपुरे हे लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे. राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी तनपुरे यांनी माघार घेतली होती व फडणवीस यांच्या शब्दाला मान दिला होता अखेर भाजपकडून तनपुरे यांच्या त्यागाच्या बदल्यात विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल अशी खात्रीशीर माहिती समजते आहे भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी पोटनिवडणूक जाहीर झाली यावेळी कडीले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली तर प्राजक्त तनपुरे देखील निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत तनपुरे यांनी माघार घ्यावी यासाठी त्यांना फोन केला व तनपुरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान देत निवडणुकीतून माघार घेतली व अक्षय कर्डिले आमदार झाले दरम्यान निवडणुकीतून माघार घेतलेले तनपुरे यांची आगामी काळातील भूमिका काय असणार तसेच ते भाजप प्रवेश करणार का मुख्यमंत्री फडणवीस हे तनपुरे यांचे राजकीय पुनर्वसन करणार का असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात रंगू लागले दरम्यान नुकतीच विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली व भाजपकडून अहिल्यानगर च्या जागेवरती दावा करण्यात आला तर भाजपकडून उमेदवारी कोणाला देण्यात येणार यावरती चर्चा रंगलेल्या असतानाच आता थेट तनपुरे यांचे नाव समोर येत आहे यामुळे पोटनिवडणुकीतील त्यागाच्या बदल्यात विधान परिषदेची उमेदवारी देत भाजपकडून तनपुरे यांचे पुनर्वसन केले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे नुकतेच तनपुरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट च्या डीपीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते त्याचा मामा असलेले जयंत पाटील यांचा फोटो ठेवल्याने एकच चर्चा सुरू झाली होती. तनपुरे सध्या मुंबईत असून नेमकं त्यांनी भाजपात प्रवेश घेणार का व याबाबतची तारीख अद्याप निश्चित झाली नाही तसेच तनपुरे यांच्या समर्थकांकडून देखील याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेले नाही यामुळे तनपुरे यांच्या प्रत्येक राजकीय हालचालीकडे कार्यकर्ते व राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागलेले आहे.

Prajakt Tanpure : तनपुरे यांच्या पदरात त्यागाचे फळ… भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी ? Read More »

Ram Shinde

Ram Shinde on Sujay Vikhe: सुजय विखे विधान परिषदेसाठी इच्छुक पण…, उमेदवारीबाबत राम शिंदे स्पष्टच म्हणाले

Ram Shinde on Sujay Vikhe: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अहिल्यानगर विधानपरिषद जागा कुणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना भाजप नेते राम शिंदे यांनी जिल्ह्यातून एका जागेसाठी माजी खासदार सुजय विखे यांच्यासह अनेक जण इच्छुक असल्याची माहिती दिली आहे. राम शिंदे म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत महायुतीचे वरिष्ठ नेतेच याबाबत निर्णय घेणार निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहे. यामध्ये सत्यजित कदम, भानुदास बेरड यांच्यासह माजी खासदार सुजय विखे हे देखील इच्छुक आहे ते राज्यसभेला देखील इच्छुक होते व विधान परिषदेसाठी देखील इच्छुक आहे. आपण मागच्या दाराने जाणार नाही असं ते म्हणाले त्यामुळे आमच्याकडे उमेदवारांची देखील कमी नाही. याबाबत या निवडणुकीसाठी पक्ष पातळीवरती निर्णय होईल तसेच काही वेगळा देखील निर्णय होऊ शकतो असे सूचक वक्तव्य राम शिंदे यांनी केले. तर विधान परिषदेसाठी प्राजक्त तनपुरे यांचे नाव चर्चेत आहे यावर शिंदे म्हणाले, त्यांचा कुठलाही अर्ज आमच्यापर्यंत आलेला नाही. त्यांचा व भारतीय जनता पार्टीचा सद्या तरी कोणताही संबंध नाही. याबाबत त्यांनी देखील खुद्द स्पष्टीकरण दिलेला आहे, मात्र राहुरी पोटनिवडणुकीत त्यांनी माघार घेतली हे देखील विसरता येणार नाही असं देखील यावेळी शिंदे म्हणाले तसेच अद्याप तनपुरे यांनी भाजपकडे याबाबत कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नाही. तनपुरे व देवेंद्र फडणवीस मध्ये काय चर्चा झाली याबाबत योग्य वेळी समजेल असे शिंदे म्हणाले.

Ram Shinde on Sujay Vikhe: सुजय विखे विधान परिषदेसाठी इच्छुक पण…, उमेदवारीबाबत राम शिंदे स्पष्टच म्हणाले Read More »

img 20260526 wa0024

Devendra Fadnavis: पुण्याची जागा भाजपनेच लढवावी; आमदारांची CM फडणवीसांकडे मागणी

Devendra Fadnavis : पुणे शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्पष्ट संख्याबळ आणि मित्रपक्ष व स्थानिक आघाड्यांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी, अशी आग्रही मागणी पुणे जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून (दि. २५) सुरुवात झाली असून, पुण्यात भाजपच्या उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पुण्याची जागा भाजपकडे घेण्याची भूमिका मांडली. यावेळी आमदार राहुल कुल, हेमंत रासने, सुनील कांबळे, शंकर जगताप, भीमराव तापकीर, माजी आमदार संजय जगताप, बाळा भेगडे, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे स्वतःचे ३०९ सदस्य निवडून आले आहेत. याशिवाय दौंडमधील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’चे १७ सदस्य तसेच इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’चे ७ सदस्य भाजपसोबत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडे ३३३ पेक्षा अधिक मतांचे भक्कम संख्याबळ आहे. तसेच काही अपक्ष सदस्यांचाही पाठिंबा वाढत आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर हे देखील विधान परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांनी स्थानिक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान बिडकर यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना मांडत, पक्षाने संधी दिल्यास पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला.

Devendra Fadnavis: पुण्याची जागा भाजपनेच लढवावी; आमदारांची CM फडणवीसांकडे मागणी Read More »

img 20260526 wa0007

Pratap Sarnaik: एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार

Pratap Sarnaik :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी “ इंधन बचत… म्हणजेच इंधन निर्मिती ” ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. एसटी महामंडळाला सध्या दररोज सरासरी १०.८७ लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासत असून, इंधन खर्च कमी करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान ५ लिटर डिझेल बचतीचे उद्दिष्ट निश्चित केले, तरी संपूर्ण राज्यभरातून दररोज किमान १००० लिटर डिझेलची बचत होऊ शकते. सध्याच्या डिझेल दरानुसार ही बचत दररोज जवळपास १ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. “लहान बचतीतून मोठी आर्थिक नशिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते,” असेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर सर्व विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना तातडीने आगारनिहाय डिझेल बचतीची उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. प्रत्येक आगाराने आपल्या बसगाड्यांच्या इंधन वापराचे नियमित विश्लेषण करून बचतीसाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे आदेशही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.डिझेल बचतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा विशेष सत्कार करण्यात येईल तसेच त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याची योजनाही सुरू करण्यात येणार आहे. “एसटीचा चालक हा केवळ वाहन चालक नसून तो संस्थेच्या अर्थकारणाचा शिल्पकार आहे. जबाबदारीने आणि कौशल्याने वाहन चालवणारा चालक एसटीचे लाखो रुपये वाचवू शकतो,” असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. याशिवाय ज्या आगारांनी निश्चित उद्दिष्टांपेक्षा अधिक डिझेल बचत केली असेल, त्या आगारांना दरमहा विशेष पुरस्कार आणि आर्थिक प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आगारांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन बचतीची चळवळ अधिक प्रभावी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.वाहन चालविण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे ज्या चालकांच्या बसचे के.पी.एल. (किलोमीटर प्रति लिटर) प्रमाण कमी येत असेल, अशा चालकांचे समुपदेशन करून त्यांना पुनर्प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इंधन बचतीसाठी वेग नियंत्रण, योग्य गिअरचा वापर, अनावश्यक इंजिन सुरू ठेवणे टाळणे, ब्रेकिंग पद्धतीत सुधारणा यांसारख्या बाबींवर विशेष प्रशिक्षण दिले जाईल.तसेच बसेसची दैनंदिन तांत्रिक तपासणी, वेळेवर दुरुस्ती आणि इंजिन कार्यक्षमतेची नियमित पाहणी यावर भर देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. टायर प्रेशर, इंजिन ट्युनिंग, ऑईल गळती, ब्रेक प्रणाली यांसारख्या तांत्रिक बाबींमधील त्रुटीमुळेही इंधनाचा अपव्यय होतो. त्यामुळे कार्यशाळा स्तरावर अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महसूल वाढविण्यासोबतच खर्च नियंत्रण हीदेखील तितकीच महत्त्वाची बाब आहे. इंधन बचत ही केवळ आर्थिक बाब नसून ती राष्ट्रीय संपत्तीच्या जतनाशी संबंधित जबाबदारी आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि चालकाने ही मोहीम स्वतःची समजून राबवावी,” असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

Pratap Sarnaik: एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार Read More »