DNA मराठी

आरोग्य

rain

Pune Rain Alert: पुण्यात पावसाचा कहर; 22 ठिकाणी दरडी, 4 जणांचा मृत्यू

Pune Rain Alert: पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती आणि दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेत माहिती दिली. गेल्या तीन दिवसांपासून हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता. अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्य करत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 22 ठिकाणी दरडी कोसळल्या असून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विविध भागांत अडकलेल्या तब्बल 4 हजार 568 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. उद्याही घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी दोन एनडीआरएफ आणि चार पीडीआरएफ पथके सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. शाळांना सुट्टी जाहीर परिस्थिती लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच लोहगड, विसापूर, तिकोना आणि लायन्स पॉईंट ही पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत. इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढत असल्याने देहू आणि आळंदी येथून वारकऱ्यांनी प्रवास टाळून थेट पुण्यातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आणि आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन देखील सुनेत्रा पवार यांनी केले.

Pune Rain Alert: पुण्यात पावसाचा कहर; 22 ठिकाणी दरडी, 4 जणांचा मृत्यू Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: आज दुपारनंतर वेगवान वाऱ्यांचा इशारा; घराबाहेर पडू नका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : राज्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, दुपारनंतर अनेक भागांत ताशी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अत्यावश्यक कारण असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच अनावश्यक प्रवास टाळावा. विशेषतः तरुणांनी धबधबे, पर्यटनस्थळे किंवा नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारने संभाव्य पूर आणि दरडग्रस्त भागांमध्ये आवश्यक ती पूर्वतयारी केली असून, धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि इतर सर्व यंत्रणा सतर्क असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई–पुणे मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अशा घटनांमुळे काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली असून अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित मार्गाने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील नागरिकांनी हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Devendra Fadnavis: आज दुपारनंतर वेगवान वाऱ्यांचा इशारा; घराबाहेर पडू नका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

tukaram munde

Tukaram Munde: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : 7 हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

Tukaram Munde : अन्न व औषध प्रशासनाने ‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत पुणे विभागात १ ते ३ जुलैदरम्यान ७० हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन तसेच काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने 7 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. निलंबित आस्थापनांमध्ये हॉटेल ग्रँड पुरंदर सिंहगड रोड, क्राऊन बेकर्स सिंहगड रोड, मे. ॲग्रोटीस केटरिंग प्रा. लि. ता. आंबेगाव, जि. पुणे, बरकत बिर्याणी हाऊस वाघोली पुणे, रॉयल बिर्याणी हाऊस वाघोली पुणे आणि नॅशनल ३६० बावधन, पुणे यांचा समावेश आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही तपासणी मोहीम सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्न सुरक्षा नियम आणि मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारींसाठी नागरिकांनी १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

Tukaram Munde: अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : 7 हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने निलंबित Read More »

rain

Maharashtra Rain Alert : मुंबईसह ‘या’ जिह्यात पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक भागात गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली आहे. यातच पुढील तीन तासांसाठी हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मुंबई महानगर प्रदेशात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कमी उंचीच्या भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे तसेच झाडे किंवा फांद्या पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सततच्या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. स्थानिक प्रशासन, महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहावे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संबंधित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Alert : मुंबईसह ‘या’ जिह्यात पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा Read More »

fb img 1781585362460

El Nino : ‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

El Nino : ‘एल-निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे. शासनाच्या २०१८ च्या निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याचे आरक्षण प्राधान्याने राखून कालवे व बॅकवॉटर क्षेत्रातील अनधिकृत पाणी उपसा तात्काळ थांबवावा. आवश्यकतेनुसार अशा ठिकाणांवरील वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एल-निनो’चा संभाव्य प्रभाव, पाणीसाठा आरक्षण व कृषी विभागाच्या उपाययोजनांबाबत आयोजित तातडीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, नगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ.प्रदीप पठारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.विरेंद्र बडदे, नायब तहसीलदार भारती घोरपडे तसेच कृषी, जलसंपदा, महापालिका व महसूल विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन शेतीसाठी देण्यात येणारे पाणी आवर्तन तात्काळ बंद करण्यात यावे. जलसंपदा विभागाने पाणीचोरी रोखण्यासाठी तात्काळ भरारी पथके नियुक्त करावीत. कालवे व बॅकवॉटर क्षेत्रात सुरू असलेला अनधिकृत पाणी उपसा त्वरित बंद करावा. आवश्यकतेनुसार संबंधित विद्युत वितरण केंद्रे बंद करून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. महापालिका, नगरपालिकांनी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण भागात उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. स्थानिक परिस्थितीनुसार नागरिकांना दैनंदिन किंवा दिवसाआड पाणीपुरवठा करण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच जलसंपदा विभागाच्या मुख्य व कार्यकारी अभियंत्यांनी विद्यमान पाणीसाठ्याची स्थिती तपासून पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी सविस्तर नियोजन आराखडा तातडीने सादर करावा, असे त्यांनी सांगितले. कालव्यांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करताना मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यास अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अधिक किफायतशीर व पाणी बचतीचे ठरत असेल, तर त्या पर्यायाची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर तपासणी करावी, असे निर्देशही आशिया यांनी बैठकीत दिले. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत योग्य मार्गदर्शन करावे. जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय व समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. उतारावर आडवी पेरणी करण्याबाबत जनजागृती करावी. जिल्ह्यात खते व बियाण्यांची पुरेशी उपलब्धता आहे. मात्र खतांचा काळाबाजार, लिकिंग तर होत नाही ना याची कृषी विभागाने भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी करावी. खत व बियाणे पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी आणि ‘डिजिटल पीक पाहणी’ मोहीम तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या. जिल्ह्यात सुरू असलेली जलसंधारणाची कामे, गाळ काढण्याची कामे व इतर पाणी साठवण क्षमतेत वाढ करणारी कामे जलद गतीने पूर्ण करावीत, जेणेकरून उपलब्ध पावसाच्या पाण्याचा जास्तीत जास्त साठा निर्माण करता येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी सांगितले.

El Nino : ‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया Read More »

img 20260605 wa0011

Shirur Taluka : शिरूर तालुक्यात खळबळ ; कारवाईच्या भीतीने तब्बल 350 किलो खवा शेता शेजारी फेकला

Shirur Taluka : राज्यभर अन्न भेसळविरोधी मोहिमेचा धडाका सुरू असताना शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे तब्बल ३५० किलो खवा शेताशेजारी फेकून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. ३) उघडकीस आली. अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये निर्माण झालेल्या भीतीपोटीच हा खवा टाकून देण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. शिरसगाव काटा येथील राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी लगत असलेल्या शेतकरी विजय वामन काटे यांच्या शेताशेजारील कॅनॉल रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्तींनी खव्याच्या १४ बॅगा टाकून दिल्या. प्रत्येक बॅगेचे वजन सुमारे २५ किलो असल्याने एकूण खव्याचे वजन अंदाजे ३०० ते ३५० किलो असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बुधवारी सकाळी परिसरात तीव्र दुर्गंधी पसरल्याने विजय काटे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खव्याच्या बॅगा पडलेल्या आढळून आल्या. या घटनेची माहिती परिसरात वेगाने पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. विविध ठिकाणी छापे, नमुने तपासणी आणि जप्तीच्या कारवायांमुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठीच हा खवा घाईघाईने फेकून दिला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, फेकून दिलेला खवा नेमका कोणाचा आहे, तो भेसळयुक्त होता का आणि तो कोणत्या ठिकाणाहून आणण्यात आला होता, याचा तपास संबंधित यंत्रणांनी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Shirur Taluka : शिरूर तालुक्यात खळबळ ; कारवाईच्या भीतीने तब्बल 350 किलो खवा शेता शेजारी फेकला Read More »

fb img 1780492492207

FDA Action In Ahilyanagar: अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई ; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त

FDA Action In Ahilyanagar: जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेत राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले असून नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी केले आहे. राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी करून शिवशक्ती ब्रँडच्या आईस्क्रीम गुलकंद व अमेरिकन नट्स या उत्पादनांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. दर्जाहीन असल्याच्या संशयावरून या ठिकाणी ४१ हजार ४४० रुपये किमतीचे एकूण १४८ पॅकेट्स आईस्क्रीम जप्त करण्यात आले. तसेच नेवासा तालुक्यातील कडू गल्ली येथील संतोष किराणा स्टोअर्सची तपासणी करून एसबीजी ब्रँडच्या रिफाइंड पामोलीन ऑईल या खाद्यतेलाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. हा साठा संशयास्पद आढळल्याने २ लाख ४२ हजार ७४० रुपये किमतीचे १ हजार ४९८.४ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार व सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ व नियम २०११ अंतर्गत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, अन्न सुरक्षा अधिकारी उ. र. पाटील व सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी या कारवाया केल्या आहेत. नागरिकांना स्वच्छ व भेसळमुक्त अन्न उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाभर ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात सुरू आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

FDA Action In Ahilyanagar: अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी व नेवासात कारवाई ; आईस्क्रीम व खाद्यतेलाचा साठा जप्त Read More »

rain alert

Ahilyanagar Weather Alert : अहिल्यानगर जिल्ह्यात 3 जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’

Ahilyanagar Weather Alert : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात ३ जून पर्यंत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी केले आहे. मेघगर्जना होत असताना, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच टॉवर्स, ध्वजांचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण, रोहित्र व लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा व कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. घराबाहेर मोकळ्या जागेत असताना वीज चमकल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने कान झाकावेत व डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवून जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल तसेच जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला थांबू नये व योग्य ती दक्षता घ्यावी. वादळी वारा, पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करून आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या वा नियोजित केलेल्या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. धरण व नदी क्षेत्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेऊन धरणाच्या पाण्यात, नदीच्या वा कालव्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये व धोकादायक ठिकाणी स्वतःचे छायाचित्र काढू नये. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मदतीसाठी नजीकचे पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथील ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४० या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा ११२, १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

Ahilyanagar Weather Alert : अहिल्यानगर जिल्ह्यात 3 जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ Read More »

farmers

IMD Rain Alert: आजपासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

IMD Rain Alert: सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये ⁠विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे.

IMD Rain Alert: आजपासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये Read More »

nilesh lanke

Nilesh Lanke: जिल्ह्यातील सरकारी मेडिकल कॉलेजची जागा निच्छित ‘या’ ठिकाणी होणार कॉलेज

Nilesh Lanke : जिल्ह्याच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालया’साठी नगर तालुक्यातील कापूरवाडी येथे २५ एकर जागा निश्चित करण्यात आली असून, जिल्ह्याच्या पहिल्या सरकारी मेडिकल कॉलेजचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. खासदार नीलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून महाविद्यालयासाठी ४४८ पदांची निर्मितीही मंजूर केली आहे. जिल्ह्यात सरकारी मेडिकल कॉलेज व्हावे, यासाठी खासदार डॉ. निलेश लंके गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत होते. दिल्ली ते मुंबई विविध स्तरांवर बैठका घेऊन त्यांनी जिल्ह्याची आवश्यकता शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्यासमोरही त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याची परिस्थिती मांडत मेडिकल कॉलेजची गरज अधोरेखित केली होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर राज्य शासनाने प्रकल्पाला गती देत आवश्यक प्रशासकीय निर्णय घेतले आहेत. महाविद्यालयासाठी सुरुवातीला नालेगाव, अरणगाव आणि कापूरवाडी या ठिकाणांची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर सर्व निकषांचा विचार करून कापूरवाडी येथील २५ एकर जागा अंतिम करण्यात आली आहे. या ठिकाणी भविष्यात अत्याधुनिक सुविधा असलेले मेडिकल कॉलेज, संलग्न रुग्णालय, विद्यार्थी वसतिगृह आणि संशोधन सुविधा उभारल्या जाणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षापासून १०० एमबीबीएस जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून सप्टेंबर २०२६ पासून प्रत्यक्ष अध्यापन सुरू होण्याची शक्यता आहे. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत महाविद्यालयाचे तात्पुरते कामकाज जिल्हा आयुष रुग्णालयातून चालविण्यात येणार आहे. तसेच पुढील सात वर्षांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) मेडिकल कॉलेजकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मेडिकल कॉलेजमुळे जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढणार असून ग्रामीण भागातील रुग्णांना स्थानिक पातळीवरच आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई किंवा इतर शहरांकडे जाण्याची गरज कमी होणार आहे. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा देणारा हा ऐतिहासिक प्रकल्प ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Nilesh Lanke: जिल्ह्यातील सरकारी मेडिकल कॉलेजची जागा निच्छित ‘या’ ठिकाणी होणार कॉलेज Read More »