Weather Update: राज्यात पुढील 48 तासांत बदलणार हवामान! ‘या’ भागात वाढणार थंडी; जाणुन घ्या ताजे अपडेट
Maharashtra Weather Update: आता राज्यातील अनेक भागात थंडी वाढत चालली आहे. विदर्भसह पश्चिम महाराष्ट्र मध्ये देखील थंडीने जोर पकडला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक शहरात तापमानात घट पाहायला मिळाली आहे. भारतीय हवामान खात्याने थंडीबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या 48 तासांत राज्यात पुन्हा हवामानात बदल होणार असून थंडीचा कडाका वाढणार आहे. ही थंडीची लाट वर्षअखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पारा घसरणार आहे. सध्या राज्यात थंड वारे पोहोचत असून, त्याचे वर्चस्व वाढले की किमान आणि कमाल तापमानात आणखी घसरण होईल. मध्य प्रदेशसह महाराष्ट्रातही थंडी आणणारे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मुंबईत कमाल तापमानातही घट झाली शहरात सकाळपासून थंड वारे वाहत आहेत. शहरातील सांताक्रूझ हवामान केंद्रात शुक्रवारी 21.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. त्याचवेळी कुलाब्यातील किमान तापमान 23 अंशांवर घसरले, तर कमाल तापमान 30.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले. गेल्या आठवड्यात मुंबईत हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली होती, ते 19.4 अंश होते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तरेकडील वाऱ्यांचे आगमन आणि उत्तरेकडील भागात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पुढील आठवड्यापासून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. IMD मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2-3 दिवस तापमान 21 ते 22 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 25 डिसेंबरनंतर शहराच्या तापमानात घट होऊन तापमान 20 अंशांच्या खाली जाईल. मुंबई आणि उपनगरात हिवाळा साधारणपणे 15 डिसेंबरनंतर सुरू होतो, जेव्हा कमाल तापमानात घट होते. मात्र, सोमवारनंतर कमाल तापमानात किती घसरण होण्याची शक्यता आहे? हे वेस्टर्न डिस्टर्बन्सवर अवलंबून आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार आहे. पुणे शहरात सकाळपासून धुके वाढले आहे. पुण्यात थंडीचा परिणाम दिसून येत आहे. पुणे शहराचे तापमान 15 अंशांच्या खाली गेले आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद विदर्भात झाली. गोंदियाचे तापमान नऊ अंश सेल्सिअस नोंदले गेले. नागपूरचे तापमान 10.6 अंश सेल्सिअस तर नाशिकचे तापमान 15 अंश सेल्सिअस नोंदले गेले. गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात थंडीची तीव्रता वाढली आहे. रब्बी पिकांनाही याचा फायदा होणार आहे.








