DNA मराठी

शेती

rain

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यात धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची आणि गारपिटीची शक्यता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि काही कोकण भागात हवामानाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. वादळी वाऱ्याचा वेग 30 ते 60 किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये गारपीटीचा धोका अधिक आहे. नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा, सांगलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदियासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून आवाहन • मेघगर्जना व पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी झालेल्या पिकांचे सुरक्षित साठवण करावे. • शेतात ठेवलेले उत्पादन ताडपत्रीने झाकून ठेवावे. • वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे शेतातील हलकी संरचना व शेती उपकरणे सुरक्षित ठेवावीत. • शेतामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी तात्काळ निचऱ्याची व्यवस्था करावी. पाणी साचल्यास मुळकुज व बुरशीजन्य रोग वाढू शकतात. सध्या राज्यातील अनेक भागात गहू,मक्का, रबी ज्वारी ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. • काढणी केलेले उत्पादन पावसापासून संरक्षित ठिकाणी ठेवावे. • पुढील 24 तासांत काढणीस तयार असलेली पिके तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. • शेतात मळणीसाठी ठेवलेले धान्य ताडपत्री किंवा प्लास्टिक आच्छादनाखाली ठेवावे. • ज्वारी पीक पिकलेल्या अवस्थेत असून पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ज्वारीचे ताटे पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे कणसे खराब होऊन ज्वारीचे नुकसान होऊ शकते, म्हणून काढणी केलेली ज्वारी सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि शक्य नसल्यास पॉलिथिन पेपरने झाकून संरक्षण करावे.

IMD Rain Alert: पुढील तीन दिवस राज्यात धो धो पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी Read More »

Rain

IMD Rain Alert: 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस

IMD Rain Alert : 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

IMD Rain Alert: 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस Read More »

mla kashinath date

MLA Kashinath Date : शेतकऱ्यांच्या भावना भडकवून राजकीय खेळी करु नका; आमदार काशिनाथ दाते भडकले

MLA Kashinath Date : कुकडी डावा कालवा व पिंपळगाव जोगा डावा कालव्याच्या आवर्तनाबाबत काही घटकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून शेतकऱ्यांच्या भावनांना चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची खंत व्यक्त करत आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकरी बांधवांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या पाण्याच्या प्रश्नाला राजकीय रंग देत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा डाव उधळून लावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व ग्रामस्थांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आमदार दाते सर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन कुकडी व पिंपळगाव जोगा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्या- नंतर मंत्री विखे पाटील यांच्यामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून कुकडी कालव्याद्वारे 5 मार्च दरम्यान तर 25 फेब्रुवारी ते 1 मार्च च्या दरम्यान पिंपळगाव कालव्यांद्वारे पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वेळेत आवर्तन सोडण्यात आले असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकऱ्यांनी अफवांना बळी न पडता प्रशासनावर विश्वास ठेवावा, असे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना न्याय मिळवून देण्याची आपली बांधिलकी कायम राहील, अशी ग्वाहीही आमदार काशिनाथ दाते यांनी दिली. येडगाव धरणातील अपेक्षित पाणीसाठा, तांत्रिक बाबी आणि सर्व लाभक्षेत्रांचा विचार करूनच आवर्तनाचे नियोजन केले जाते. दोन-तीन दिवसांचा विलंब तांत्रिक कारणास्तव होऊ शकतो मात्र 5 मार्चपर्यंत पाणी निश्चितपणे उपलब्ध होईल, यावर कोणीही राजकारण करू नका अस यावेळी आमदार काशिनाथ दाते म्हणाले.

MLA Kashinath Date : शेतकऱ्यांच्या भावना भडकवून राजकीय खेळी करु नका; आमदार काशिनाथ दाते भडकले Read More »

img 20260227 wa0010

Radhakrishnan Vikhe Patil: पालकमंत्री विखे पाटील यांच्या मध्यस्थीने शेतकरी-कामगारांच्या मागण्या मान्य; लाँग मार्च स्थगित

Radhakrishnan Vikhe Patil: अखिल भारतीय किसान सभा व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी, कामगार आणि आदिवासींच्या उर्वरित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मार्ग निघाला असून, आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे राजूर ते अहिल्यानगर निघालेला लाँग मार्च निझर्णेश्वर येथे स्थगित करण्यात आला आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा लाँग मार्च काढण्यात येत होता. या मोर्चामध्ये आदिवासी शेतकरी, कामगार, पोषण आहार तयार करणाऱ्या मदतनीस, वैद्यकीय क्षेत्रातील अर्धवेळ परिचर आपल्या मागण्यांसाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संगमनेर येथून निघालेला लाँग मार्च काल सायंकाळी निझर्णेश्वर येथे पोहोचला होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलकांशी सातत्याने संपर्क साधून मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात मंत्री विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन आंदोलक व विविध विभागांचे मंत्री यांच्यात यशस्वी संवाद घडवून आणला होता. या बैठकीमध्ये आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र, शालेय शिक्षण व कामगार विभागाशी संबंधित असलेल्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. निझर्णेश्वर येथे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी अरुण उंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर उर्वरित मागण्याही सरकारने मान्य केल्या असल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याची प्रशासनाची विनंती आंदोलकांनी मान्य केली. अर्धवेळ परिचारकांच्या मानधनात सरकारने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, शालेय पोषण आहार मदतनिसांचे मानधनही वाढविण्यास सरकारने हिरवा कंदील दिला आहे. भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी आदिवासी भागाला मिळावे म्हणून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वेक्षणाला दिलेल्या आदेशाचे आंदोलनकर्त्यांनी स्वागत केले आहे. बांधकाम कामगारांना आता आरोग्य विमा योजनेतून सर्व सुविधा मिळण्याचा मार्ग सरकारच्या निर्णयामुळे सुकर झाला आहे. आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकारची भूमिका सकारात्मक राहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आंदोलकांना दिलासा दिला. या निर्णयाबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले, तसेच आंदोलकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले आहेत.

Radhakrishnan Vikhe Patil: पालकमंत्री विखे पाटील यांच्या मध्यस्थीने शेतकरी-कामगारांच्या मागण्या मान्य; लाँग मार्च स्थगित Read More »

Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar: अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांनी मांडली शेतकऱ्यांची स्थिती

Vijay Wadettiwar: गेल्या 24 तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली गारपीट आणि दुसरीकडे ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची स्थिती मांडली. विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानीचा पाढा वाचताना वडेट्टीवार म्हणाले की नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर ,नांदेड ,परभणी भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने ज्वारी, गहू, हरभरा ही काढणीला आलेली पिके मातीमोल झाली आहेत. आंबा आणि द्राक्ष बागायतदारांचेही अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने सोलापूर, परभणी, नांदेड, धाराशीव भागात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे असं वडेट्टीवार म्हणाले. मागील अतिवृष्टीची मदत अजून मिळालेली नाही, धानाला बोनस जाहीर करून देण्यात आलेला नाही आणि आता पुन्हा संकट आले आहे. सरकारने नियम-निकष बाजूला ठेवून तातडीने रोख मदत द्यावी आणि पंचनाम्यांचे केवळ आदेश न देता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त होत असताना दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या घराघरांवर नोटिसा चिकटवून दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी सुरू आहे. सहजपूर-जवळा सारख्या 600 लोकसंख्येच्या गावात 1000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करून मोजणी प्रक्रिया राबवली जात आहे. हे लोकशाहीला भूषणावह नाही. धाराशीव, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी 23 फेब्रुवारीला या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला होता. हा प्रकल्प रद्द करावा, अशी जनभावना असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. एकीकडे अस्मानी संकटामुळे शेतकरी खचला आहे, तर दुसरीकडे सुलतानी संकटाप्रमाणे सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांच्या जमिनी हिसकावत आहे. सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विधिमंडळ नेते विजय वडेटीवार यांनी केली. विधानसभा अध्यक्ष यांनी याची दखल घेऊन सरकारला निवेदन करण्याचे निर्देश दिले.

Vijay Wadettiwar: अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांनी मांडली शेतकऱ्यांची स्थिती Read More »

radhakrishnan vikhe patil

Radhakrishnan Vikhe Patil : जलसंपदा विभागाचा ‘रिपोर्ट कार्ड’ मुख्यमंत्र्यांना सादर

Radhakrishnan Vikhe Patil : राज्याला सिंचनात स्वयंपूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाने वर्षभरात केलेल्या कामांचा व निर्णयांचा अहवाल (रिपोर्ट कार्ड) जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. आपल्या विभागाच्या वर्षभराच्या कामाचा असा अहवाल प्रकाशित करणारे डॉ. विखे पाटील हे राज्यातील पहिलेच मंत्री ठरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेती व उद्योगांची प्रगती आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने विभागाने केलेल्या कामांचा या अहवालात समावेश आहे. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात कृष्णा व गोदावरी खोऱ्यात राबवलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती यात देण्यात आली आहे. अहवालातील ठळक वैशिष्ट्ये व वर्षभरातील कामे : १०० दिवसांचा कृती आराखडा : गोदावरी आणि कृष्णा खोऱ्यातील १८ प्रकल्पांतून सिंचन क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट. यातील १० प्रस्तावांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नदीजोड प्रकल्पांना वेग : कोकण-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व पार-गोदावरी या प्रकल्पांच्या कामांना गती. ‘लँड बँक’ची निर्मिती : कृष्णा व गोदावरी खोऱ्यातील बुडीत क्षेत्राबाहेरील तब्बल ५३ हजार २७७ एकर जमीन ‘लँड बँक’ म्हणून निश्चित. अतिक्रमण हटाव मोहीम : कृष्णा लाभक्षेत्रात ४८७ आणि गोदावरी खोऱ्यात ३१९ अतिक्रमणे हटवून जागा मोकळी केली. नवीन धोरणांची अंमलबजावणी : उघड्या कालव्यांऐवजी बंदिस्त पाईपमधून पाणीपुरवठा, फ्लोटिंग सोलर, गाळ काढणे आणि ‘मित्रा’ संस्थेच्या मदतीने नवीन धोरणे राबवली. जलसंपदा पंधरवडा : विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी राज्यात प्रथमच ‘जलसंपदा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला. प्रश्नांची सोडवणूक: वर्षभरात लोकप्रतिनिधींसोबत १५० हून अधिक बैठका घेऊन अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ च्या संकल्पात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, “राज्याची कृषी आणि औद्योगिक प्रगती, पिण्याच्या पाण्याची सुरक्षा आणि पर्यावरण संतुलनासाठी आमचा विभाग कटिबद्ध आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्याला प्रगत करण्यासाठी आम्ही अल्प, मध्यम व दीर्घकालीन उद्दिष्टे ठरवून ती वेगाने पूर्ण करत आहोत”

Radhakrishnan Vikhe Patil : जलसंपदा विभागाचा ‘रिपोर्ट कार्ड’ मुख्यमंत्र्यांना सादर Read More »

leopard

Leopard in Ahilyanagar : अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद

Leopard in Ahilyanagar : गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात बिबट्याचा मोठा वावर वाढला आहे. आता तर बिबट्या थेट मनुष्य वस्तीकडे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे नगर शहराजवळ असलेले भिंगार शहर परिसरात बिबट्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वनविभागाने अखेर त्याला पकडले आहे. अहिल्यानगर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार हा आढळून आला. तसेच मनुष्यवस्ती मध्ये येत बिबट्याने अनेकांवर हल्ले केले असून यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. यातच आता पुन्हा एकदा शहरी वस्ती मध्ये बिबट्या आला असल्याने भीतीचे सावट निर्माण झाले आहे. भिंगार शहरातील वारूळ वाडी परिसरात बिबट्या हा सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. काही नागरिकांनी त्याला पाहताच आरडाओरड केल्याने बिबट्या हा एका इमारतीकडे पळाला त्यानंतर नागरिकांनी तातडीने वनविभागाला फोन द्वारे संपर्क साधत घटनेची कल्पना दिली बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घराच्या छतावर गर्दी करू लागले. दरम्यान भेदरलेला बिबट्या एका घरामध्ये शिरला व बाथरूम मध्ये जाऊन बसला व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नाने त्याला अखेर जेरबंद केले.

Leopard in Ahilyanagar : अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद Read More »

fb img 1770982840504

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Ahilyanagar News: जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आपत्तीपश्चात गरजांच्या मूल्यांकनासाठी केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी एम. विनोद, वंदना श्रीवास्तव, सुहास मोहंती, रोहित कुमार, वैशाली म्हस्के आदी अधिकारी उपस्थित होते. पथकासोबत उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक, शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भास्कर पाटील तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय पथकाने पाथर्डी तालुक्यातील करंजी, देवराई, पारेवाडी तसेच शेवगाव तालुक्यातील वरूर बु. या गावांना भेटी देत नुकसानग्रस्त ठिकाणांची पाहणी केली. करंजी येथे राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त पुलाची, बंधाऱ्याची तसेच पाझर तलावाची पाहणी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे खरडून गेलेली जमीन तसेच पिकांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या शेतजमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून पथकाने परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी ग्रामस्थ रफिक शेख यांच्याशी संवाद साधत नुकसानाची सविस्तर माहिती पथकाने जाणून घेतली. भविष्यात अशी आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना पथकाने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर पथकाने देवराई येथील सिमेंट नाला बंधाऱ्याची, स्मशानभूमीची तसेच पारेवाडी येथे पाण्यामुळे क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचीही पाहणी केली. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पुलांची व बंधाऱ्यांची सविस्तर माहिती घेत आवश्यक त्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. शेवगाव तालुक्यातील वरूर बु. येथे पाण्यामुळे नुकसान झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचीही पथकाने पाहणी करत नुकसानाची माहिती जाणून घेतली. शेवगाव तहसील कार्यालयात आढावा पाहणी दौऱ्यानंतर केंद्रीय पथकाने तहसील कार्यालय, शेवगाव येथे सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानाच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेतला. तसेच नुकसानभरपाई व पुनर्बांधणी संदर्भातील विविध बाबींवर चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

Ahilyanagar News : अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule: राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी, प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक

Chandrashekhar Bawankule: राज्यातील ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या नकाशा तसेच ७/१२ उतारामधील तफावत दूर करण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची मोजणी करून नकाशे आणि अधिकार अभिलेख (७/१२) अद्ययावत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आता जमिनींचे प्रलंबित वाद मिटण्यास मदत तर होईलच शिवाय, प्रत्येक भूखंडाला आता ‘भू-आधार’ क्रमांक (ULPIN) मिळणार आहे. 2 कोटींहून अधिक पोटहिश्शांचा होणार ‘डिजिटल’ कायापालट राज्यात १८९० ते १९३० या काळात पहिली भूमापन प्रक्रिया झाली होती. त्यानंतर १९९२ पासून डिसेंबर २०२४ पर्यंत खरेदी-विक्री, वारस हक्क किंवा वाटणीमुळे तब्बल २ कोटी १२ लाख ७६ हजार ४९९ नवे पोटहिस्से तयार झाले आहेत. मात्र, या सर्व पोटहिश्शांची प्रत्यक्ष मोजणी न झाल्याने सरकारी दप्तरी नकाशे आणि ७/१२ उतारा यांचा ताळमेळ लागत नव्हता. ही अडचण दूर करण्यासाठी जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्या स्तरावरून आता ‘पोटहिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प’ सुरू करण्यात येत आहे. काय आहे ‘भू-आधार’ ? केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला आता Unique Land Parcel Identification Number (ULPIN) म्हणजेच ‘भू-आधार’ क्रमांक दिला जाणार आहे. आधार कार्डाप्रमाणेच जमिनीची सर्व माहिती या एका क्रमांकावर उपलब्ध असेल. यामुळे पीक विमा, बँकांकडून कर्ज मिळवणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे शेतकऱ्यांसाठी अधिक सोपे होणार आहे. शेतकऱ्यांना होणारे थेट फायदे वादातून सुटका: जमिनीचे क्षेत्र आणि हद्दी निश्चित झाल्यामुळे शेतकऱ्यांमधील आपसातील वाद कमी होतील. अचूक नकाशे: ७/१२ उताऱ्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेचा नकाशा उपलब्ध होईल. डिजिटल डेटाबेस: पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी बँकांकडे अचूक डिजिटल माहिती उपलब्ध असेल. खरेदी-विक्री सुलभ: जमिनीच्या व्यवहारापूर्वी मोजणीची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल. अंमलबजावणीसाठी समित्यांची स्थापना या प्रकल्पाच्या सनियंत्रणासाठी राज्य स्तरावर अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. तसेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समित्या या कामाचा आठवड्याला आढावा घेतील. यामध्ये खासगी सर्वेक्षण संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींचे हक्क अबाधित राखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. नकाशे आणि ७/१२ यांचा मेळ बसल्यामुळे ग्रामीण भागातील जमिनींचे अर्थकारण अधिक मजबूत होईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule: राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी, प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक Read More »

ahilyanagar events

Ahilyanagar Events : अहिल्यानगरमध्ये 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव

Ahilyanagar Events :   कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद अहिल्यानगर व एक्सपो इंडियन ओशियन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नेमाने इस्टेट, केडगाव रोड येथे भव्य जिल्हा कृषी महोत्सव ‘कृषीपर्व’ व कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, कृषी उत्पादनांचे प्रदर्शन व थेट खरेदी-विक्रीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे. या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जात आहे. महोत्सवात धान्य महोत्सव, खाद्य महोत्सव, कृषी प्रक्रिया उद्योगांचे प्रदर्शन, महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने, कृषी यांत्रिकीकरण व निविष्ठांचे सुमारे पाचशे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यात जामखेडची ज्वारी, अकोलेचा सुवासिक इंद्रायणी तांदूळ, हातसडीचा तांदूळ, गावरान मटकी, गहू, कडधान्य, फळे व भाजीपाला यांसह विविध कृषी प्रक्रिया पदार्थांची विक्री व प्रदर्शन करण्यात येईल. कृषी क्षेत्रातील आधुनिक बदल लक्षात घेता महोत्सवात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित उपाययोजना व काटेकोर शेती याविषयी माहिती देणारे विशेष स्टॉल असणार आहेत. यासोबतच खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून शिपी आमटी, शिंगोरी आमटी, मांडे, थालपीठ यांसह विविध पारंपरिक गावरान खाद्यपदार्थांचा आस्वाद नागरिकांना घेता येईल. या महोत्सवाच्या कालावधीत आयोजित कृषी परिषदेअंतर्गत कृषी विभागाशी संबंधित अधिकारी व विषयतज्ज्ञांच्या उपस्थितीत मार्गदर्शनपर चर्चासत्रे व व्याख्याने आयोजित केली असून त्यातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती, उत्पादनवाढ, कृषी प्रक्रिया उद्योग व बाजारपेठ व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट, कृषी उद्योजक, विद्यार्थी व नागरिकांनी या जिल्हा कृषी महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Ahilyanagar Events : अहिल्यानगरमध्ये 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव Read More »