DNA मराठी

ऑटोमोबाईल

Rohini Khadse

Rohini Khadse: गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा अन्यथा वेळ आली तर …, रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

Rohini Khadse : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता भारतातील सामान्य जनतेलाही बसू लागली आहे. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. मुंबई – पुणे सारख्या शहरांमध्ये गॅसच्या अभावी हॉटेल्स, खानावळी हळूहळू बंद होत आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिली आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या की, मुंबई – पुणे परिसरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. तसेच परिस्थिती आटोक्यात आली नाही तर घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात होईल. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून तोडगा काढावा, हवं तर केंद्राशी बोलून यावर तोडगा काढावा अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला. तर गेल्या अकरा दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण दरम्यान सुरू असणाऱ्या युद्धाचा फटका मोठ्या प्रमाणात भारताला बसताना दिसत आहे. देशातील अनेक ठिकाणी गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. तर आता या मुद्द्यावरून विरोधक केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे.

Rohini Khadse: गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा अन्यथा वेळ आली तर …, रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा Read More »

pratap sarnaik

Pratap Sarnaik: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीचा तात्पुरता परवाना रद्द

Pratap Sarnaik: मुंबई व आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच संबंधित कंपन्यांचे तात्पुरते परवाने रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री यांनी विधानपरिषदेत केली. विधानपरिषदेत नियम ९३ अंतर्गत सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या सूचनेवर उत्तर देताना परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या मोटार वाहन अ‍ॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्वे २०२० नुसार महाराष्ट्रात ई-बाईक (दुचाकी) टॅक्सी वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने ७ ऑगस्ट २०२४ रोजी मान्यता दिली असून राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार “ महाराष्ट्र ई-बाईक-टॅक्सी नियम, २०२४ ” अधिसूचित करण्यात आले असून या नियमांनुसार बाईक टॅक्सी शंभर टक्के इलेक्ट्रिक असणे बंधनकारक आहे. तसेच सर्व अटी व नियमांची पूर्तता करण्यासाठी अर्जदारांना ठराविक कालावधी देण्यात आला आहे.या प्रक्रियेनुसार उबर इंडिया सिस्टिम्स प्रा. लि., रोपेडो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. आणि ॲनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. (ओला) या कंपन्यांना मुंबई महानगर क्षेत्रात ३० दिवसांसाठी तात्पुरता परवाना (Provisional Licence) देण्यात आला होता. या कालावधीत सर्व आवश्यक अटींची पूर्तता करून अंतिम परवाना घेणे अपेक्षित होते.मात्र काही कंपन्यांनी नियमांची पूर्तता न करता बेकायदा वाहतूक सुरू केल्याचे निदर्शनास आले. तसेच काही ठिकाणी बाईक टॅक्सी चालकांकडून अपघात व महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कंपन्यांना परिवहन विभागाने नोटिसा बजावल्या असून काही प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिवहन विभागाने राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना बेकायदा बाईक टॅक्सी वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पथकांमार्फत तपासणी करून दोषी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत १३० दुचाकी वाहनांवर कारवाई करून सुमारे ३३ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला असल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली. राज्य सरकारने बाईक टॅक्सी सेवा नियमानुसार आणि सुरक्षित पद्धतीनेच सुरू राहील यासाठी कठोर उपाययोजना केल्या असून नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Pratap Sarnaik: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीचा तात्पुरता परवाना रद्द Read More »

ayatollah mojtaba khamenei

Ayatollah Mojtaba Khamenei : इराणची कमांड आता अयातुल्ला मोज्तबा खमेनीकडे; इस्रायलवर डागले पहिले क्षेपणास्त्र

Ayatollah Mojtaba Khamenei : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे पुत्र अयातुल्ला मोजतबा खमेनी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर लगेचच इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ल्यांचा पहिला टप्पा सुरू केला, ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणच्या सरकारी प्रसारक, IRIB ने घोषणा केली की अयातुल्ला सय्यद मोजतबा खमेनी यांच्या नेतृत्वाखाली व्यापलेल्या प्रदेशांवर क्षेपणास्त्रांचा पहिला टप्पा डागण्यात आला आहे. इस्रायलने जारी केलेली धमकी काही काळापूर्वी, इस्रायली सैन्याने X वर एक पर्शियन संदेश पोस्ट केला होता, ज्यामध्ये असा इशारा देण्यात आला होता की अली खमेनी यांच्या कोणत्याही संभाव्य उत्तराधिकारीचा पाठलाग केला जाईल. इस्रायलने स्पष्टपणे सांगितले होते की, जो कोणी नवीन सर्वोच्च नेते बनण्याचा प्रयत्न करेल किंवा नियुक्ती प्रक्रियेत सहभागी असेल त्याला लक्ष्य केले जाईल. इराणची धार्मिक संस्था, तज्ज्ञांची सभा, पुढील सर्वोच्च नेत्याची निवड करण्यासाठी बैठक होणार असताना हे विधान आले. अमेरिका युरेनियमवर विशेष कारवाईची योजना ? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणचे युरेनियम जप्त करण्यासाठी विशेष लष्करी कारवाईचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. तीन राजनयिक अधिकाऱ्यांचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्स असे सूचित करतात की या योजनेअंतर्गत, अमेरिका इराणमध्ये जमिनीवर विशेष सैन्य तैनात करू शकते, ज्यांचे प्राथमिक उद्दिष्ट बॉम्ब-ग्रेड समृद्ध युरेनियमवर नियंत्रण मिळवणे असेल. तीन सदस्यीय समितीने कमांड स्वीकारली अयातुल्ला अली खमेनी यांनी ३७ वर्षे इराणवर राज्य केले आणि २८ फेब्रुवारी रोजी तेहरानमध्ये झालेल्या अमेरिका-इस्रायली हल्ल्यात ते मारले गेले. त्यांच्या मृत्यूनंतर, एका आठवड्यासाठीही कोणताही नवीन नेता निवडला गेला नाही, ज्यामुळे तीन सदस्यीय समितीने देशाची सूत्रे हाती घेतली. या विलंबामुळे काही इराणी गटांमध्ये असंतोष वाढत आहे.

Ayatollah Mojtaba Khamenei : इराणची कमांड आता अयातुल्ला मोज्तबा खमेनीकडे; इस्रायलवर डागले पहिले क्षेपणास्त्र Read More »

Trump

Donald Trump यांना मोठा धक्का; 16 लाख कोटी रुपये परत करण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांना मोठा कायदेशीर धक्का बसला आहे, ज्याचे पडसाद जगभरातील बाजारपेठांमध्ये उमटले आहेत. अमेरिकन व्यावसायिक इतिहासात पहिल्यांदाच, अशी मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे, सरकारला स्वतःच्या धोरणांमुळे अब्जावधी डॉलर्सचे परतफेड करावे लागण्याची शक्यता आहे. हा मुद्दा केवळ राजकीय पराभव नाही त्याचा थेट परिणाम अमेरिकेशी आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी व्यापार करणाऱ्या कंपन्यांवर होईल. हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि त्याचा जागतिक व्यावसायिक जगावर कसा परिणाम होईल हे समजून घेऊया. कंपन्यांसाठी मोठा दिलासा न्यू यॉर्कचे संघीय न्यायाधीश रिचर्ड ईटन यांनी अलीकडेच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यांनी स्पष्ट केले की, ज्या कंपन्यांनी सरकारने लादलेले अवैध शुल्क (आयात शुल्क) भरले आहेत त्यांना परतफेड मिळण्याचा अधिकार आहे. हा संपूर्ण वाद १९७७ च्या आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायदा (IEEPA) अंतर्गत लादलेल्या मोठ्या कराशी संबंधित आहे. गेल्या महिन्यातच, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाच्या दुहेरी-अंकी आयात शुल्क रद्द केले आणि त्यांना असंवैधानिक म्हटले. आता, न्यायाधीश ईटन यांनी स्पष्ट केले आहे की परतफेडीची व्याप्ती खटला दाखल करणाऱ्या काही मोजक्या कंपन्यांपुरती मर्यादित राहणार नाही, तर या आणीबाणी कायद्याअंतर्गत शुल्क भरणाऱ्या सर्व आयातदारांना समान प्रमाणात लागू होईल. सरकारी तिजोरीला 16 लाख कोटी रुपयांचे मोठे नुकसान या न्यायालयाच्या निर्णयाचा आर्थिक परिणाम आश्चर्यकारक आहे. आकडेवारीवरून असे दिसून येते की अमेरिकन सरकारने डिसेंबरच्या मध्यापर्यंत या वादग्रस्त शुल्कांमधून तब्बल १३० अब्ज डॉलर्स (अंदाजे १२ लाख कोटी रुपये) जमा केले होते. असा अंदाज आहे की जर डिसेंबरनंतर झालेल्या वसुलीचा समावेश केला तर एकूण परतफेड १७५ अब्ज डॉलर्स किंवा अंदाजे १६.१२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. टेनेसीस्थित फिल्टर उत्पादक अ‍ॅटमॉस फिल्ट्रेशनच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला. ट्रम्प प्रशासनाने ही परतफेड प्रक्रिया मंदावण्यासाठी सर्व कायदेशीर प्रयत्न केले, परंतु यूएस कोर्ट ऑफ अपीलने सरकारचा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला आणि खटल्याचा जलद निपटारा करण्याचे आदेश दिले. न्यायालयात या धोरणात्मक पराभवानंतर सरकार निष्क्रिय बसलेले नाही. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी संकेत दिले आहेत की प्रशासन त्यांची भूमिका आणखी कठोर करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी लागू केलेला नवीन १०% युनिव्हर्सल टॅरिफ आता १५% पर्यंत वाढवण्याची तयारी आहे. बेसंट यांच्या मते, या आठवड्यात हा नवीन कर स्लॅब जाहीर केला जाऊ शकतो. तथापि, सध्याच्या कायदेशीर तरतुदींनुसार, ही नवीन टॅरिफ रचना फक्त १५० दिवसांसाठीच लागू राहू शकते. जुने नियम परत येतील का? अमेरिकन अधिकाऱ्यांकडे आता फक्त पाच महिने आहेत. या काळात, ते जुने टॅरिफ दर पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहेत. ट्रेझरी सेक्रेटरींचा असा विश्वास आहे की कलम ३०१ आणि कलम २३२ अंतर्गत लादलेले टॅरिफ थोडे मंदावले असले तरी ते कायदेशीरदृष्ट्या अधिक मजबूत आहेत.

Donald Trump यांना मोठा धक्का; 16 लाख कोटी रुपये परत करण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय? Read More »

maharashtra government

Maharashtra Government : मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

Maharashtra Government: सामाजिक न्याय  विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ४४९ वसतिगृहांपैकी ४१६ वसतिगृहांच्या नावांना तसेच यापुढे सामाजिक न्याय विभागांतर्गत नव्याने सुरू होणाऱ्या मुलांच्या वसतिगृहांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह” आणि मुलींच्या वसतिगृहांना “सावित्रिबाई फुले शासकीय वसतिगृह” अशी नावे देण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे. सध्या अनेक वसतिगृहांच्या नावांमध्ये ‘मागासवर्गीय’ हा शब्द वापरण्यात आला आहे. ‘मागासवर्गीय’ हा शब्द समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांकडे निर्देश करतो व त्यातून विषमता अधोरेखित होते. त्यामुळे संस्थांची ओळख एका विशिष्ट घटकापुरती मर्यादित राहते आणि समाजाचा दृष्टिकोनही त्यानुसार घडतो. ही बाब लक्षात घेऊन वसतिगृहांच्या नावातील ‘मागासवर्गीय’ हा शब्द वगळून त्यांना महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात विभागांतर्गत एकूण ४४९ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून त्यामध्ये २३१ मुलांची व २१८ मुलींची वसतिगृहे आहेत. या सर्व वसतिगृहांमध्ये एकूण ४६,६७३ विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामध्ये २४,९५८ मुलांची आणि २१,७१५ मुलींची प्रवेश क्षमता आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी ही योजना राबविण्यात येत असून त्यांना निवास व्यवस्था, नाश्ता, दोन वेळचे जेवण, निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य, मुलींसाठी स्वच्छता भत्ता, गणवेश, वैद्यकीय साहित्य, रेनकोट, गमबूट, क्रीडा साहित्य, शैक्षणिक सहली, कार्यशाळा तसेच टीव्ही, अॅक्वागार्ड, वॉटर कुलर आणि फायर फायटिंग यांसारख्या सुविधा पुरविण्यात येतात. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Maharashtra Government : मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय Read More »

Police

Nirbhaya Squad : निर्भया पथकाच्या वाहनातून आलेल्या व्यक्तीचा धिंगाणा अन् मारहाण

Nirbhaya Squad : नवी मुंबईतील खारघर परिसरातील बेलपाडा येथे सोमवारी धक्कादायक प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेतील एक व्यक्ती पोलिस दलातील निर्भया पथकाच्या वाहनातून आला आणि वाहनातून उतरून काही नागरिकांना विनाकारण मारहाण करू लागला, अशी माहिती समोर आली आहे. घटनेदरम्यान परिसरातील नागरिकांनी त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यक्तीने त्यांनाही दम दिल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. महिला अत्याचारासारख्या गुन्ह्यांवर कारवाई करणाऱ्या निर्भया पथकाच्या वाहनातूनच संबंधित व्यक्ती आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित व्यक्ती खरोखर पोलीस कर्मचारी होता की इतर कोणी, तसेच त्याच्या ताब्यात हे वाहन कसे आले, याबाबत स्पष्टता होणे आवश्यक आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत माहिती काय दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nirbhaya Squad : निर्भया पथकाच्या वाहनातून आलेल्या व्यक्तीचा धिंगाणा अन् मारहाण Read More »

israel iran war

Israel-Iran War : परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन जारी

Israel-Iran War : मध्यपूर्व व आखाती परिसरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली आहेत. या भागात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे. ​परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर महाराष्ट्र शासन व परराष्ट्र मंत्रालय यांचे बारकाईने लक्ष असून, त्यांच्या संरक्षणासाठी व आवश्यकतेनुसार त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ​राज्य‌ व जिल्हा पातळीवरील मदत क्रमांक :आपत्कालीन परिस्थितीत किंवा परदेशातील व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत माहिती देण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राचे (२४x७) क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत :​टोल फ्री क्रमांक : १०७०​ फोन : ०२२-२२०२७९९०, +९१-९३२१५८७१४३​ई- मेल : controlroom@gov.in​ तसेच, अहिल्यानगर जिल्ह्यातील जे नागरिक या युद्धजन्य परिस्थितीत अडकले आहेत, त्यांच्याबाबतची माहिती देण्यासाठी व मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ​जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक : ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०​टोल फ्री क्रमांक: १०७७​परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना :१. सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक हालचाल टाळावी.२. भारतीय दूतावास / कॉन्स्युलेटच्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे.३. आपले लोकेशन (ठिकाण) आणि सद्यस्थितीची माहिती कुटुंबाला सतत कळवावी.४. मोबाईलची बॅटरी चार्ज राहील याची काळजी घ्यावी आणि पासपोर्ट-व्हिसासह सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत.५. सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा, अप्रमाणित संदेश किंवा चुकीची माहिती पसरवू नये.६. भारतीय दूतावासाकडे आपली नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. ​विविध देशांतील भारतीय दूतावासांचे २४x ७ आपत्कालीन क्रमांक उपलब्ध : तात्काळ मदतीसाठी इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी), कुवैत, बहरीन, मस्कत, जॉर्डन आणि इराक (बगदाद) येथील भारतीय दूतावासांनी विशेष आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक आणि ईमेल आयडी जाहीर केले आहेत. नागरिकांनी गरजेनुसार या क्रमांकांवर संपर्क साधावा असे सुचवण्यात आले आहे.

Israel-Iran War : परदेशात अडकलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन जारी Read More »

israel iran war

Israel-Iran War : ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय टँकरवर हल्ला; चार जण जखमी

Israel-Iran War : इस्रायल आणि इराण दरम्यान सुरू असणाऱ्या युद्धामध्ये काही भारतीयांना लक्ष्य केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी ओमानच्या मुसंदम किनाऱ्याजवळ एका तेल टँकरवर झालेल्या भयानक हल्ल्याने जगाचे लक्ष वेधले आहे. या संघर्षाचे थेट बळी ठरलेल्या जहाजावर पंधरा भारतीय क्रू मेंबर्स होते. पश्चिम आशियातील तणाव जागतिक व्यापार मार्गांसाठी कसा मोठा धोका बनला आहे हे या घटनेवरून दिसून येते. ओमानच्या किनाऱ्याजवळ भयानक हल्ला मुसंदम द्वीपकल्पाबाहेर झालेल्या या हल्ल्याने त्याच्या भौगोलिक स्थान आणि तीव्रतेमुळे आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले आहे. “स्कायलाईट” हा भव्य पलाऊ-ध्वजांकित तेल टँकर ओमानच्या खासाब बंदराच्या उत्तरेस फक्त पाच नॉटिकल मैल अंतरावर जात असताना अचानक हल्ला करण्यात आला. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने पुष्टी केली आहे की या तणावाच्या काळात ओमानच्या इतक्या जवळ व्यापारी जहाजाला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जहाजावर एकूण 20 क्रू मेंबर्स हल्ल्यानंतर लगेचच, ओमानच्या सुरक्षा एजन्सींनी एक प्रचंड आणि अत्यंत सक्रिय बचाव मोहीम सुरू केली. वृत्तानुसार, जहाजावर 20 क्रू मेंबर्स होते, ज्यात 15 भारतीय आणि 5 इराणी नागरिक होते. सर्व 20 क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे वाचवण्यात आले ही दिलासादायक बाब आहे. या हल्ल्याच्या अचानकपणामुळे आणि स्फोटाच्या आवाजामुळे सर्व क्रू मेंबर्सना गंभीर दुखापत झाली. जखमी सदस्यांवर उपचार सुरुवातीच्या अहवालांनुसार, या हल्ल्यात चार क्रू मेंबर्सना वेगवेगळ्या प्रमाणात दुखापत झाली. काहींना गंभीर दुखापत झाली, तर काहींना किरकोळ. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले आहे. जहाजावर हल्ला करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता की नाही हे सुरक्षा यंत्रणांनी अद्याप निश्चित केलेले नाही. शिपिंग उद्योगासाठी मोठा धोका ओमानच्या इतक्या जवळ झालेला हा हल्ला संपूर्ण आंतरराष्ट्रीय शिपिंग उद्योगासाठी मोठा धोका आहे. मुसंदम द्वीपकल्प हा एक धोरणात्मक आणि संवेदनशील क्षेत्र आहे ज्यातून जगातील तेल व्यापाराचा एक महत्त्वाचा भाग जातो. येथे हल्ला झाल्यास आता कोणताही समुद्री मार्ग सुरक्षित नाही. भारत सरकार या गंभीर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, कारण हजारो भारतीय खलाशी या धोकादायक सागरी मार्गांवर तैनात आहेत.

Israel-Iran War : ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय टँकरवर हल्ला; चार जण जखमी Read More »

iran usa war

Iran USA WAr : इराणची मोठी कारवाई; अमेरिकन विमानवाहू जहाज अब्राहम लिंकनवर हल्ला

Iran USA WAr : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असणाऱ्या युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्युनंतर, इराणने सूडबुद्धीने “ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4” सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत इराणी माध्यमांनी अमेरिकेच्या युद्धनौके अब्राहम लिंकनला टार्गेट केल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेकडून हा दावा स्पष्टपणे नाकारण्यात आला आहे. अमेरिकेने दावे फेटाळल इराणी राज्य वृत्तसंस्था आयआरएनए आणि आयआरजीसीच्या मते, “ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4” चा भाग म्हणून अमेरिकन विमानवाहू अब्राहम लिंकनवर चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, तीच युद्धनौका ज्याने इराणविरुद्धच्या अलिकडच्या लष्करी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम) ने हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आणि म्हटले की क्षेपणास्त्रे जहाजाच्या जवळही आली नाहीत. मुस्लिम जगताविरुद्ध उघड युद्धाची घोषणा इराणी राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचे वर्णन संपूर्ण मुस्लिम जगताविरुद्ध उघड युद्धाची घोषणा म्हणून केले. त्यांनी स्पष्ट केले की, इराण आपल्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येचा बदला घेणे हे आपले पवित्र कर्तव्य आणि कायदेशीर अधिकार मानतो. इराणी सैन्याने घोषणा केली आहे की, ते आता संघर्षाच्या “नवीन आणि धोकादायक टप्प्यात” प्रवेश करत आहे, जिथे जमीन आणि समुद्र दोन्ही ठिकाणी हल्ले तीव्र केले जातील, ज्यामध्ये अमेरिकन आणि इस्रायली तळांना टार्गेट केले जाईल. प्रमुख आखाती शहरांमध्ये घबराट इराणने केलेल्या मोठ्या हल्ल्यांमुळे संपूर्ण आखाती प्रदेश हादरला. रियाध, दुबई, अबू धाबी, दोहा, मनामा, जेरुसलेम आणि तेल अवीव यासारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रचंड स्फोट ऐकू आले. इस्रायली मदत सेवांनुसार, ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान चार जण ठार झाले, ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरली. इस्रायलचे ‘पहिले पाऊल’ ऑपरेशन इस्रायलने खामेनींच्या मृत्यूचे वर्णन त्यांच्या मोठ्या लष्करी रणनीतीचे फक्त “पहिले पाऊल” म्हणून केले आहे. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल नदाव शोशानी यांनी खुलासा केला की संयुक्त गुप्तचर कारवाईत एका मिनिटात 40 वरिष्ठ इराणी कमांडर मारले गेले. इस्रायलच्या सीमेपासून एक हजार मैलांपेक्षा जास्त अंतरावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे हल्ले झाले. इस्रायलचा हा दावा इराणच्या लष्करी नेतृत्वासाठी आणि त्याच्या संपूर्ण सुरक्षा संरचनेसाठी एक महत्त्वाचा आव्हान आहे. जागतिक शांततेवर संकट वाढतोय इराणच्या क्रांतिकारी रक्षकांनी इशारा दिला आहे की, ते अमेरिका आणि इस्रायलला त्यांच्या नवीन आक्रमणाबद्दल पश्चात्ताप करण्यास भाग पाडतील. या लष्करी संघर्षामुळे केवळ मध्य पूर्वेतील शांतताच नाही तर जागतिक शांतता आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यालाही धोका निर्माण झाला आहे.

Iran USA WAr : इराणची मोठी कारवाई; अमेरिकन विमानवाहू जहाज अब्राहम लिंकनवर हल्ला Read More »

Jayant Patil

Jayant Patil : कृत्रिम फुलांवर प्रभावीपणे बंदी घाला ; जयंत पाटलांची विधानसभेत मागणी

Jayant Patil :  राज्यभर नैसर्गिक फुलांचे भाव घसरल्याने फुल उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या परिस्थितीमागे कृत्रिम फुलांचा वाढता वापर हे प्रमुख कारण आहे. याच संदर्भात पावसाळी अधिवेशनात कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मंत्री महोदयांनी कृत्रिम फुलांवर बंदी असल्याचे सांगितले मात्र त्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून केला. जयंतराव पाटील यावर म्हणाले की, फुल उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर ग्रीन हाऊस उभारून नैसर्गिक फुलांची लागवड करतात. त्यासाठी मोठी गुंतवणूक लागते. मात्र बाजारपेठेत कृत्रिम फुलांचा वाढता वापर झाल्याने त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळत नाही. त्यांना प्रचंड आर्थिक फटका बसत आहे. यापुढे शंभर टक्के कृत्रिम फुलांची विक्री थांबवण्यासाठी ठोस उपायोजना करण्याची गरजेचे आहे असे ते म्हणाले. नुकतेच दादर फुल मार्केट येथील फुल विक्रेत्यांना महानगरपालिकेने हटवले. या निषेधार्थ मुंबईतील फुल विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. प्रशासनाने या सर्व घडामोडींकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देत फुल विक्री सुरळीत सुरू करण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत  असे त्यांनी सुचित केले. बायोडिग्रेडेबल नसलेल्या कृत्रिम फुलांवर बंदी असल्याचे अधिक स्पष्ट करण्यासाठी शासनाने स्वतंत्र जीआर काढणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंतराव पाटील यांना उत्तर देताना सांगितले तसेच अशा कृत्रिम फुलांचा वापर करणारे डेकोरेटर्स आणि संबंधित आस्थापने यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची तरतूद करण्यात येईल. फुल मार्केट पूर्ववत सुरू करण्याबाबत महानगरपालिकेला तातडीने आदेश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Jayant Patil : कृत्रिम फुलांवर प्रभावीपणे बंदी घाला ; जयंत पाटलांची विधानसभेत मागणी Read More »