DNA मराठी

ऑटोमोबाईल

img 20260326 wa0004

Nilesh Lanke: 4 हजार एकर जमिनीसंदर्भात खा. लंके यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

Nilesh Lanke : श्रीरामपूर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या मालकीची व शेती महामंडळाकडे असलेली सुमारे ४ हजार एकर बागायती जमीन झेड आर टू ग्रुप होल्डिंग कंपनी व झेड आर टू बायो एनर्जी कंपनी लिमिटेड या खाजगी कंपन्यांना देण्याच्या प्रस्तावावर खासदार नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात खा. लंके यांनी नमूद केले आहे की, संबंधित कंपन्यांची रचना, आर्थिक व्यवहार व संचालक मंडळातील परस्पर संबंध अत्यंत संशयास्पद असून या कंपन्यांची ‘शेल’ स्वरूपाची शक्यता नाकारता येत नाही. झेड आर टू ग्रुप होल्डिंग कंपनी व झेड आर टू बायो एनर्जी कंपनी लिमिटेड यांच्यात ६१ टक्के भागभांडवलाद्वारे थेट नियंत्रण संबंध असून दोन्ही कंपन्यांमध्ये समान संचालक कार्यरत आहेत. तसेच या कंपन्यांचे इतर संबंधित संस्थांशीही हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्येही विसंगती आढळून येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अत्यल्प किंवा शून्य उलाढाल असताना कोट्यवधी रुपयांचा नफा दाखविणे, तसेच अचानक मोठ्या प्रमाणात भांडवली वाढ दर्शविणे व त्याबाबत स्पष्ट माहिती न देणे या बाबी गंभीर स्वरूपाच्या असल्याचे खा. लंके यांनी म्हटले आहे. याशिवाय, विमान इंधन निर्मितीसारख्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली तांत्रिक व व्यावसायिक पात्रता संबंधित कंपन्यांकडे नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांशी कोणतेही करार नसताना एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी जमीन मागणी करण्यात येत असल्यामुळे प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्रीरामपूर तालुक्यातील ही जमीन हजारो कोटी रुपयांची मौल्यवान सार्वजनिक संपत्ती असून तिचे हस्तांतरण करताना पारदर्शकता व सखोल तपासणी आवश्यक असल्याचे खा. लंके यांनी अधोरेखित केले आहे. “जनतेच्या मालकीची जमीन कोणत्याही परिस्थितीत संशयास्पद कंपन्यांना देण्यात येऊ नये,” अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. खा. लंके यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केलेल्या मागण्यांमधे संबंधित कंपन्यांची आर्थिक, तांत्रिक व कायदेशीर पात्रता स्वतंत्र उच्चस्तरीय समितीमार्फत तपासावी, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव तात्काळ स्थगित किंवा रद्द करण्यात यावा यांचा समावेश आहे.

Nilesh Lanke: 4 हजार एकर जमिनीसंदर्भात खा. लंके यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन Read More »

strait of hormuz

Strait of Hormuz : आनंदाची बातमी! भारतासह हॉर्मुझमध्ये ‘या’ देशांच्या टँकर्सवर निर्बंध नाहीत

Strait of Hormuz : अमेरिका, इस्राईल आणि इराण दरम्यान सुरू असणाऱ्या युद्धात भारतासाठी इराणकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणने मोठा निर्णय घेत पाच मित्र भारतासह पाच देशातील टँकरला हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’तून जाण्याची परवानगी दिली आहे. इराणचे उप परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची यांनी स्पष्ट केले की, धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली ही सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्यात आलेली नाही. त्यांनी जाहीर केले की, भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान या देशांच्या जहाजांना या मार्गावरून सुरक्षित मार्ग (safe passage) उपलब्ध करून दिला जाईल. अराकची यांच्या माहितीनुसार, या देशांनी इराणकडे तशी विनंती केली होती त्यानंतर परस्पर समन्वयाच्या आधारे ही परवानगी देण्यात आली. हॉर्मुझमधून जाण्याची परवानगी इराणचे उप-परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची यांनी सांगितले की, भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान या देशांच्या जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या देशांनी सुरक्षित मार्गाची मागणी करत इराणशी संपर्क साधला होता आणि त्यानंतर समन्वयाच्या प्रक्रियेद्वारे त्यांना ही परवानगी मंजूर करण्यात आली. शत्रू राष्ट्रांसाठी मार्ग बंद अराकची म्हणाले, “आम्ही सध्या युद्धसदृश परिस्थितीत आहोत. त्यामुळे, आमच्या शत्रू राष्ट्रांच्या आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांना या मार्गावरून जाण्याची परवानगी देण्याचे कोणतेही औचित्य उरत नाही.” त्यांनी पुढे सांगितले, “अनेक जहाज-मालकांनी किंवा ज्या देशांची ही जहाजे आहेत त्या देशांनी आमच्याशी संपर्क साधून, हॉर्मुझमधून त्यांच्या जहाजांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.” “यापैकी काही राष्ट्रांसाठी ज्यांना आम्ही मित्र मानतो किंवा इतर काही विशिष्ट कारणांमुळे आम्ही ज्यांना परवानगी देण्याचे ठरवले आहे, अशा प्रसंगी आमच्या लष्करी दलांनी त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सहकार्य केले आहे. चीन, रशिया, पाकिस्तान, इराक, भारत (भारताची दोन जहाजे काही दिवसांपूर्वीच या मार्गावरून गेली) आणि इतर अनेक देश ज्यामध्ये मला वाटते बांगलादेशचाही समावेश आहेअशी राष्ट्रे आहेत ज्यांनी आमच्याशी संवाद साधला आणि समन्वय प्रस्थापित केला. ही व्यवस्था भविष्यातही कायम राहील, अगदी हा संघर्ष संपुष्टात आल्यानंतरही.”

Strait of Hormuz : आनंदाची बातमी! भारतासह हॉर्मुझमध्ये ‘या’ देशांच्या टँकर्सवर निर्बंध नाहीत Read More »

LPG Gas Price

LPG Cylinders: वेळमर्यादा पूर्वीप्रमाणेच; LPG रिफिल बुकिंगच्या वेळेसंदर्भात स्पष्टीकरण

LPG Cylinders : सरकारच्या निदर्शनास आले आहे की, काही बातम्या आणि सोशल मीडिया पोस्ट्समध्ये एलपीजी रिफिल बुकिंगच्या सुधारित वेळेबाबत दावे केले जात आहेत जसे की पीएमयूवाय जोडणीसाठी ४५ दिवस, नॉन -‌‌ पीएमयूवाय सिंगल बॉटल जोडणीसाठी २५ दिवस आणि नॉन – पीएमयूवाय डबल बॉटल जोडणीसाठी ३५ दिवस. यावर असे स्पष्ट करण्यात येते की, असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रिफिल बुकिंगसाठी सध्याची वेळमर्यादा पूर्वीप्रमाणेच असून ती खालीलप्रमाणे आहे. शहरी भागांसाठी : २५ दिवस ग्रामीण भागांसाठी : ४५ दिवस (जोडणीचा प्रकार कोणताही असला तरी) नागरिकांना असा सल्ला देण्यात येतो की, त्यांनी अशा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा ती पुढे पसरवू नये. तसेच, घाबरून जाऊन अनावश्यक एलपीजी रिफिल बुकिंग करणे टाळावे. देशात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, याचा सरकारकडून पुन्हा एकदा पुनरुच्चार करण्यात येत आहे.

LPG Cylinders: वेळमर्यादा पूर्वीप्रमाणेच; LPG रिफिल बुकिंगच्या वेळेसंदर्भात स्पष्टीकरण Read More »

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : शर्तभंग’ नियमित करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकार्‍यांना; सुधारणा विधेयक मंजूर

Chandrashekhar Bawankule : राज्यातील शासकीय जमिनींच्या व्यवहारातील ‘शर्तभंग’ नियमित करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेले ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक २०२६’ (विधेयक क्र. २८) विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. या नवीन कायद्यामुळे आता छोट्या स्वरूपाचे शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना मिळणार असल्याने ९० टक्के प्रकरणांचा निकाल स्थानिक पातळीवरच लागणार आहे. कायदेशीर तरतुदीचा अभाव होणार दूर आतापर्यंत शासनाने कब्जेहक्काने किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींच्या बाबतीत होणारे शर्तभंग नियमित करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये (MLRC) कोणतीही स्पष्ट कायदेशीर तरतूद नव्हती. हे काम केवळ शासकीय परिपत्रकांच्या आधारे केले जात होते. मात्र, या प्रक्रियेला कायदेशीर आधार नसल्याने अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट होत होती किंवा प्रलंबित राहत होती. ही उणीव दूर करण्यासाठी मंत्री बावनकुळे यांनी संहितेत कलम ३७ ‘अ’ आणि ३२८ ‘अ’ अंतर्गत नवीन सुधारणा सुचवली आहे. नव्वद टक्के प्रकरणे निकाली निघणार महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की,” आजवर अगदी छोट्या शर्तभंगासाठी देखील फाईल्स मंत्रालयात येत होत्या. यामुळे मंत्रालयावर कामाचा मोठा ताण होता आणि सर्वसामान्यांना छोट्या कामांसाठी मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागत होत्या. आता आम्ही अधिकारांचे विकेंद्रीकरण करत आहोत. एक कोटी रुपयांपर्यंतची सुमारे ९० टक्के प्रकरणे आता जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्त स्तरावरच निकाली निघतील. केवळ अति-उच्च मूल्याची प्रकरणेच मंत्रालयाकडे येतील.” विधेयक सभागृहात मांडले असता, त्याचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वपक्षीय आमदारांनी याला पाठिंबा दिला. विधेयक मांडताना बावनकुळे यांनी या बदलाचा प्रशासकीय फायदा सभागृहाच्या लक्षात आणून दिला.

Chandrashekhar Bawankule : शर्तभंग’ नियमित करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकार्‍यांना; सुधारणा विधेयक मंजूर Read More »

Pratap Sarnaik

Pratap Sarnaik: आनंदाची बातमी! एसटी ताफ्यात 3 हजार अत्याधुनिक स्मार्ट बसेसची भर

Pratap Sarnaik : महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत म्हणजेच एसटीच्या ताफ्यात नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या विधिमंडळाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या सोहळ्यास विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या समावेशामुळे एसटीच्या ताफ्यात परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम साधला गेला आहे. लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने नव्या स्मार्ट बसेस दाखल होणार असून, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे. या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यामागे हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या जिजाऊसाहेबांना अभिवादन करण्याची भावना आहे. स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागील संस्कारशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ होय. या मातृशक्तीचा गौरव या नावातून अधोरेखित करण्यात आला आहे. एसटी महामंडळाने यापूर्वी ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘यशवंती’ आणि ‘हिरकणी’ अशा ऐतिहासिक नावांनी बससेवेला वेगळी ओळख दिली आहे. त्या गौरवशाली परंपरेत आता ‘राजमाता जिजाऊ’ या नावाची भर पडल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान अधिक समृद्ध झाला आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी नमूद केले. नव्या बसेसची ठळक वैशिष्ट्ये : या बसेसमध्ये ३×२ आसन रचना असून एकूण ५६ आसन क्षमता आहे, जी सध्याच्या बसेसपेक्षा १६ आसनांनी अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या बसमध्ये ४ सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम तसेच इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार आहे. या बसेस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर शटल सेवेसाठी चालविण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. या योजनेअंतर्गत पहिल्या ५० बसेस नागपूर येथे दाखल होणार असून, तेथून या नव्या सेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आणि आधुनिकतेचा आत्मविश्वास यांचा संगम आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित होईल, अशी अपेक्षा मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

Pratap Sarnaik: आनंदाची बातमी! एसटी ताफ्यात 3 हजार अत्याधुनिक स्मार्ट बसेसची भर Read More »

pune zilla parishad

Pune Zilla Parishad : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे आणि उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक जिल्हा परिषद यांनी जाहीर केले. जिल्हा परिषदेच्या पाचव्या मजल्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित जिल्हा परिषदेची विशेष सभा आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूकीच्यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या समन्वयक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख-मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, भुषण जोशी, जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, पंचायत समितीचे सभापती आदी उपस्थित उपस्थित होते. डुडी म्हणाले, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६९ चे कलम ४५ (२) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व निवडणूक) नियम १९६२ प्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे, असे डुडी म्हणाले. अध्यक्ष पदाकरिता विरधवल कृष्णराव जगदाळे आणि विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, त्यापैकी विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांनी माघार घेतली. तसेच उपाध्यक्ष पदाकरिता विवेक प्रतापराव वळसे पाटील आणि मंगेश गुलाबराव काकडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यापैकी मंगेश गुलाबराव काकडे यांनी माघार घेतली. त्यामुळे अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुरुवातीला डुडी यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता प्राप्त नामनिर्देशन पत्राचे वाचन केले. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता प्राप्त सर्व नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे जाहीर करुन ते मागे घेण्याकरिता १५ मिनीटांचा कालावधी देण्यात आला. सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Pune Zilla Parishad : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील Read More »

1st april

1st April Rules: आयकर कायद्यात बदल अन् शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का; 1 एप्रिलपासून देशात काय बदलणार?

1st April Rules: 1 एप्रिल 2026 पासून देशातील आयकर प्रणालीमध्ये मोठे बदल होणार आहेत. नवीन कायदा, ITR च्या तारखा, TCS-STT दर आणि शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठीही खूप काही बदल होणार आहेत. केंद्र सरकारने 2026 च्या अर्थसंकल्पात आयकर व्यवस्थेत अनेक महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य करदाते आणि गुंतवणूकदारांवर होणार आहे. चला तर मग पाहूया 1 एप्रिल 2026 पासून लागू होणारे 7 मोठे बदल. नवीन आयकर कायदा लागू सर्वात मोठा बदल म्हणजे आता 1961 चा जुना आयकर कायदा संपणार आहे.त्याऐवजी Income Tax Act 2025 लागू होणार आहे. मात्र दिलासा म्हणजेTax Slabs मध्ये कोणताही बदल नाही. नवीन कायद्याचा उद्देश कर प्रणाली अधिक सोप्या भाषेत आणणे आणि कायदेशीर गुंतागुंत कमी करणे. ITR भरण्याची अंतिम तारीख वाढली सरकारने काही करदात्यांना दिलासा दिलेय. ITR-3 आणि ITR-4 भरण्याची अंतिम तारीख31 जुलै ऐवजी 31 ऑगस्ट करण्यात आली आहेय. पण ITR-1 आणि ITR-2 साठी अंतिम तारीख 31 जुलैच राहील. तसेच Tax Audit ची अंतिम तारीख 31 ऑक्टोबरच कायम राहील. Revised Return साठी जास्त वेळ जर ITR भरताना काही चूक झाली तर? आता Revised Return भरण्यासाठी जास्त वेळ मिळणार आहे. आधी अंतिम तारीख 31 डिसेंबर होती आता ती वाढवून 31 मार्च करण्यात आली आहेय मात्र 31 डिसेंबरनंतर Revised Return भरल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. TCS दरांमध्ये मोठे बदल सरकारने काही व्यवहारांवरील TCS (Tax Collected at Source) वाढवले आहेत. मद्य विक्रीवर TCS – 1% वरून 2% करण्यात आलाये तर भंगार (Scrap) विक्रीवर – 1% वरून 2% टीसीएस भरावे लागणार आहेय. याचबरोबर कोळसा, लिग्नाइट आणि लोखंड खनिजांवर 2% टीसीएस असणार आहेय. मात्र दिलासा म्हणजे तेंदू पानांवरील TCS 5% वरून 2% करण्यात आलाय. परदेश प्रवास करणाऱ्यांना दिलासा परदेशात फिरायला जाणाऱ्यांसाठी LRS अंतर्गत विदेशी टूर पॅकेजवर TCS आता फक्त 2% असेल.पूर्वी हा कर 5% ते 20% दरम्यान होता. तसेच शिक्षण आणि वैद्यकीय उपचारासाठी परदेशात पाठवलेल्या पैशांवरही TCS 5% वरून 2% करण्यात आलाय. शेअर बाजारातील F&O ट्रेडर्सना धक्का शेअर बाजारात Futures आणि Options मध्ये ट्रेड करणाऱ्यांसाठी खर्च वाढणार आहेय. Futures वर STT 0.02% वरून 0.05% तर Options वर STT0.1% वरून 0.15% यामुळे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग महाग होणार आहे. Buyback आणि Dividend वर नवीन नियम शेअर बायबॅकवर आता नवीन कर प्रणाली लागू होणार आहेय.1 एप्रिल 2026 पासून Buyback मधील उत्पन्नावर Capital Gains Tax लागेल. पूर्वी ते Dividend मानले जात होते. तसेच Dividend मिळवण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची 20% वजावट आता मिळणार नाही. याचा अर्थ संपूर्ण Dividend रकमेवर कर भरावा लागेल.

1st April Rules: आयकर कायद्यात बदल अन् शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का; 1 एप्रिलपासून देशात काय बदलणार? Read More »

maharashtra government

Medical College : वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

Medical College: मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांना स्वायत्तता देण्यासंदर्भात सविस्तर धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. स्वायत्ततेच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख शासकीय वैद्यकीय संस्थांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन क्षमता आणि आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. समितीत टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. राजेंद्र बडवे, के.ई.एम. रुग्णालयाचे माजी संचालक डॉ. संजय ओक, ग्रॅन्ट वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. तसेच महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे प्रबंधक हे समितीचे सदस्य सचिव असतील. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची सध्याची प्रशासकीय व शैक्षणिक संरचना, स्वायत्त दर्जा देण्याची आवश्यकता,संभाव्य लाभ, तसेच देश-विदेशातील यशस्वी मॉडेल्सचा अभ्यास समिती करणार आहे. यामध्ये एम्स, पीजीआय चंदीगड आणि टाटा मेमोरिअलसारख्या संस्थांच्या व्यवस्थापन पद्धतीचा आढावा घेण्यात येणार आहे. स्वायत्त महाविद्यालयांसाठी संचालक मंडळ आणि शैक्षणिक परिषद यांची रचना, व अधिकार. संचालक/अधिष्ठाता यांचे अधिकार व जबाबदाऱ्या. स्वायत्त व्यवस्थेसाठी आवश्यक आर्थिक व प्रशासकीय यंत्रणेबाबत शिफारस करणे. आर्थिक स्वातंत्र्य, अंतर्गत महसूल निर्मिती, लेखापरीक्षण व्यवस्था, तसेच कर्मचारी व अध्यापकांसाठी नवीन सेवा अटी आणि धोरणे याबाबत समिती शिफारसी करणार आहे. आवश्यक कायदेशीर, प्रशासकीय व धोरणात्मक बदलांबाबतही समिती शासनाला मार्गदर्शन करणार आहे. शासकीय शैक्षणिक संस्थांना स्वायत्तता देताना त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता प्रशासकीय व आर्थिक बाबींमध्ये अधिकारांचे हस्तांतरण सुचवणे. स्वायत्त संस्थेच्या कार्यक्षमतेसाठी देखरेख, मूल्यमापन व उत्तरदायित्व यंत्रणेबाबत शिफारस करणे. धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याकरिता आराखडा तयार करणे आदि कामे समिती करणार आहे. समितीने सविस्तर अहवाल तीन महिन्यांच्या आत शासनाला सादर करायचा आहे. समितीला आवश्यक ती माहिती आणि तांत्रिक सहाय्य वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत (डीएमईआर) उपलब्ध करून देण्यात येणार असून सदस्यांना शासन नियमानुसार मानधन, प्रवास खर्च व इतर भत्ते देण्यात येणार आहेत.

Medical College : वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन Read More »

chhagan bhujbal

LPG Gas: एलपीजी पुरवठा सुरळीत; काळाबाजार रोखण्यासाठी राज्य शासनाकडून कडक कारवाई

LPG Gas : एलपीजी पुरवठा साखळी सुरळीत राहावी आणि काळाबाजार रोखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर दक्षता पथके स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. ८ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रान्वये जिल्हाधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना काळाबाजारावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिली. विधान परिषद नियम ९३ अन्वये उपस्थित सूचनेवर निवेदन करताना मंत्री भुजबळ यांनी सभागृहाला राज्यातील एलपीजी पुरवठ्याच्या अनुषंगाने अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यावाहीची माहिती दिली. मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, मध्य-पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर दबाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा, नियंत्रण आणि दर निश्चित करण्याची जबाबदारी केंद्र शासनाची असून त्यानुसार ५ मार्च २०२६ रोजी तेल कंपन्यांना एलपीजीचा पुरवठा प्रामुख्याने घरगुती वापरासाठी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने ७ मार्च २०२६ पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली असून ती ८५२.५० रुपयांवरून ९१२.५० रुपये करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलिंडरची किंमतही १७२०.५० रुपयांवरून १८३५ रुपये करण्यात आली आहे. दरम्यान, पुरवठा साखळी सुरळीत राहावी आणि काळाबाजार रोखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर दक्षता पथके स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना काळाबाजारावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्याकरीता जिल्हास्तरावर दक्षता/फिरते पथक स्थापन करुन आवश्यक तपासण्या करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत व राज्यात त्याची अंमलबजावणी सुरु आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि समन्वय साधता यावा, यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. तसेच, राज्यस्तरावरील नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुरु आहे तसेच, नागरीकांच्या एलपीजी गॅस पुरवठ्या संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्याकरीता शासनाकडून व्हॉटस अॅप क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Rifil) मोफत उपलब्ध करुन देण्यात येते. सदर योजनेचे ७५,८१,६२१ (प्रधानमंत्री उज्ज्वला योजना -PMUY चे ५२,१७,३९६ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-Non-PMUY चे २३,६४.२२५) एवढे लाभार्थी आहेत. मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत PMUY लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून मिळणारी अनुदान रु. ३००/- वगळून घरगुती गॅस सिलेंडरची उर्वरित रक्कम प्रतिपुर्ती स्वरुपात देण्यात येते तर, Non-PMUY च्या लाभार्थ्यांना संपूर्ण गॅस सिलेंडरची रक्कम प्रतिपुर्ती स्वरुपात देण्यात येते. एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून केरोसिन वितरणाचा पर्यायही राज्य शासनाच्या विचाराधीन असून याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ११ मार्च २०२६ रोजी माहिती देण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील एलपीजी पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १२ मार्च रोजी बैठक घेण्यात आली असून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. केंद्र शासनाने शिल्लक व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाटपाचे राज्य शासनाला अधिकार दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील व्यावसायिक (Commercial) गॅसचा वापर लक्षात घेऊन शिल्लक व्यावसायिक एलपीजी गॅसचे वाटप राज्यातील प्राधान्य क्षेत्रांना करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. शासनाकडून सर्व तेल कंपन्या (BPCL, HPCL,IOCL), गॅस वितरक यांच्या बैठका घेण्यात येत असून एलपीजी पुरवठ्याबाबतचा दैनिक अहवाल सादर करण्याच आदेश देण्यात आले असून त्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच राज्यातील एलपीजी गॅस सिलेंडर पुरवठा नियमित ठेवणे, संभाव्य तुटवडा परिस्थितीचे व्यवस्थापन करणे, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत १३ मार्च रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलीस आयुक्त, सर्व पोलीस अधिक्षक तसेच, सर्व संबंधित कार्यालयांना सूचना दिल्या असून त्याची अंमलबजावणी चालु आहे. केंद्र शासनाच्या सूचनांनुसार व्यावसायिक एलपीजी पुरवठ्यासाठी प्राधान्य क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, स्मशानभूमी, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांना १०० टक्के पुरवठा दिला जात आहे. संरक्षण, शासकीय विभाग, रेल्वे, विमान वाहतूक तसेच पोलीस आणि तुरुंगांच्या उपहारगृहांना ७० टक्के तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची उपहारगृहे, औषध उद्योग, बीज प्रक्रिया आणि मत्स्यपालन क्षेत्राला ५० टक्के पुरवठा देण्यात येत आहे. दरम्यान, रिफायनरीतील एलपीजी उत्पादनही वाढवण्यात आले असून ते ९,००० मेट्रिक टनांवरून ११,००० मेट्रिक टनांपर्यंत नेण्यात आले आहे. जिल्हास्तरावर विशेष समित्या आणि नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून तेल कंपन्या आणि गॅस वितरकांसोबत नियमित बैठकाही घेतल्या जात आहेत. एलपीजी बुकिंग ॲप आणि मिस्ड कॉल सेवेमधील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले असून वाहतूक व वितरणासाठी पोलीस संरक्षणही देण्यात येत आहे. राज्यातील दक्षता पथकांनी जानेवारी ते १५ मार्च २०२६ या कालावधीत २१२९ तपासण्या केल्या आहेत. या कारवाईत १२०८ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून जप्त मालाची किंमत ३३ लाख ६६ हजार ४११ रुपये आहे. याप्रकरणी २३ गुन्हे दाखल करण्यात आले असून १८ जणांना अटक करण्यात आली आहे.

LPG Gas: एलपीजी पुरवठा सुरळीत; काळाबाजार रोखण्यासाठी राज्य शासनाकडून कडक कारवाई Read More »

Pratap Sarnaik

Pratap Sarnaik: ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही परमिट बंधनकारक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सरनाईकांचा मोठा निर्णय

Pratap Sarnaik : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तथापि, प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व ई-बाईकनां यापुढे मोटार वाहन विभागाकडे रितसर नोंदणी करुन परवाना घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की,आतापर्यंत इलेक्ट्रिक रिक्षांना (ई-रिक्षा) प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र परमिट घेण्याची सक्ती नव्हती. मात्र, वाढत्या ई-वाहनांच्या संख्येचा विचार करता केंद्र शासन अधिसूचना क्र. का. आ. २८१२ (अ) दि. ३०/०६/२०१६ अन्वये प्रवासी वाहतुकीत एकसमान नियम लागू करण्यासाठी ई-रिक्षा व ई-बाईक साठीही परमिट (परवाना )प्रक्रिया बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. या निर्णयामुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि इलेक्ट्रिक रिक्षा या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी समान नियम लागू राहतील. तसेच प्रवासी वाहतुकीच्या व्यवस्थेत पारदर्शकता वाढविणे आणि अनियमितता टाळणे हा यामागील उद्देश असल्याचे मंत्री सरनाईक म्हणाले. दरम्यान, परमिट प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी परिवहन विभागाकडून “एक खिडकी योजना ” सुरू करण्याची तयारी सुरू आहे. या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची पडताळणी आणि मंजुरी प्रक्रिया एकाच ठिकाणी सुलभ पद्धतीने पार पाडली जाणार आहे. तथापि, कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता टाळण्यासाठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी परमिट घेणे अनिवार्य राहणार आहे. नवीन नियमानुसार इलेक्ट्रिक रिक्षा व ई-बाईकसाठीही परमिट घेणे आवश्यक राहील, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले आहे. या निर्णयामुळे प्रवासी वाहतुकीच्या व्यवस्थेत अधिक शिस्त येईल, नियमांचे पालन सुनिश्चित होईल आणि भविष्यात प्रवाशांना सुरक्षित व नियंत्रित सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

Pratap Sarnaik: ई-रिक्षा व ई-बाईकसाठीही परमिट बंधनकारक; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सरनाईकांचा मोठा निर्णय Read More »